सुश्री शोभना आगाशे
काव्यानंद
☆ सायंकाळी रानात चुकलेले कोंकरू… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆
☆ सायंकाळी रानात चुकलेले कोंकरू... स्व. वि. दा. सावरकर ☆
कां भटकसी येथें बोले। कां नेत्र जाहले ओले
कोणी कां तुला दुखविलें। सांग रे
धनी तुझा क्रूर की भारी । का माता रागें भरली
का तुझ्यापासुनी चुकली । सांग रे
हा हाय कोंकरु बचडें। किती बें बें करुनि ओरडे
उचलोनि घेतलें कडें। गोजिरें
कां तडफड आतां करिसी। मी कडें घेतलें तुजसी
चल गृहीं चैन मग खाशी। ऐक रे
मी क्रूर तुला का वाटे। हृदय हें म्हणुनि का फाटे
भय नको तुला हें खोटें। ऐक रे
हा चंद्र रम्य जरि आहे। मध्यान् रात्रिमधी पाहे
वृक वारुनि रक्षिल ना हें। जाण रे
तो दूर दिसतसे कोण। टपतसे क्रूर बघ यवन
गोजिरी कापण्या मान। जाण रे
कमी कांही न तुजलागोनी। मी तुला दूध पाजोनी
ही रात्र गृहीं ठेवोनी। पुढति रे
उदईक येथ तव माता। आणिक कळपिं तव पाता
देईन तयांचे हातां। तुजसि रे
मग थोपटुनी म्यां हातें। आणिलें गृहातें त्यातें
तो नवल मंडळींना तें। जाहलें
कुरवाळिति कोणी त्यातें। आणि घेति चुंबना कुणि ते
कुणि अरसिक मजला हंसते। जाहले
गोजिरें कोंकरु काळें। नउ दहा दिनांचे सगळें
मऊमऊ केश ते कुरळे। शोभले
लाडक्या कां असा भीसी। मी तत्पर तव सेवेसी
कोवळी मेथी ना खासी। कां बरें
बघ येथें तुझियासाठीं। आणिली दुधाची वाटी
परि थेंब असा ना चाटी। कां बरें
तव माता क्षणभर चुकली। म्हणुनि का तनू तव सुकली
माझीही माता नेली। यमकरें
भेटेल उद्यां तव तुजला। मिळणार न परि मम मजला
कल्पांतकाल जरि आला। हाय रे
मिथ्या हा सर्व पसारा। हा व्याप नश्वरचि सारा
ममताही करिते मारा। वरति रे
ह्या जगीं दु:खमय सारें। ही बांधव, पत्नी, पोरें
म्हणुनिया शांतमन हो रे। तूं त्वरें
तरि कांही न जेव्हां खाई। धरुनियां उग्रता कांही
उचटिलें तोंड मी पाही। चिमुकलें
हळु दूध थोडके प्यालें। मग त्वरें तोंड फिरवीलें
कोंकरुं बावरुन गेले। साजिरें
स्वातंत्र्य जयांचे गेलें। परक्यांचे बंदी झाले
त्रिभुवनीं सुख न त्यां कसलें। की खरें
लटकून छातिशीं निजलें। तासही भराभर गेले
विश्व हें मुदित मग केलें। रविकरें
घेउनी परत त्या हातीं। कुरवाळित वरचेवरतीं
कालच्या ठिकाणावरती। सोडिलें
तों माता त्याची होती। शोधीत दूर शिशुसाठीं
दगडांचे, तरुंचे पाठीं। हाय रे
हंबरडे ऐकू आले। आनंदसिंधु उसळले
स्तनी शरासारखें घुसलें। किती त्वरें
डोलतो मुदित तरुवर तो। सप्रेम पक्षी हा गातो
तोकडा प्रतिध्वनि देतो। मुदभरें
हे प्रभो, हर्षविसी यासी। परि मला रडत बसवीसी
मम माता कां लपवीसी। अजुनि रे
कवी – वि दा सावरकर
रसग्रहण
नवतरुण सावरकरांनी ही कविता १९०० साली म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी लिहिली आहे. ओवी या करूणरसाला पोषक अशा छंदात ही कविता बांधलेली आहे. हे काव्य जरी करूणरसाने युक्त असलं तरिही, कवीने एक सुखान्त प्रसंग यात रेखाटला आहे. हे शब्दचित्र त्यांनी इतकं हुबेहुब रंगवलं आहे की, चलचित्राप्रमाणे तो प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर घडताना आपण पाहू शकतो. ‘तरि कांही न जेव्हां खाई। धरुनियां उग्रता कांही
उचटिलें तोंड मी पाही। चिमुकलें’ या ओळी वाचताना तर याची प्रचिती येऊन, वाचकाच्या चेहर्यावर हसू आल्यावाचून रहात नाही.
ही कविता वाचताना मला शाळेतलं स्वभावोक्ती अलंकाराचं ‘मातीत ते पसरले अति रम्य पंख, केले उदर वरी पांडुर निष्कलंक’ हे प्रसिद्ध उदाहरण आठवलं. पण इथे केवळ शब्दचित्र नाही तर, त्याच्या अनुषंगाने, कवीचे हळुवार मन, त्यांचे प्राणी प्रेम, कणव, पशुहत्येला असणारा त्यांचा विरोध यांचं दर्शन होतं. कवीच्या हृदयात दडलेलं मातृवियोगाचं दुःख व त्या दुःखाला असलेली अध्यात्मिक किनार यांचंदेखील या निमित्तानं प्रकटीकरण होतं. फक्त वैयक्तिक दुःखाला नाही तर, पारतंत्र्यात राहणाऱ्या सार्या भारतीयांच्या दुःखाला पण ही कविता स्पर्शून जाते.’त्रिभुवनीचं सुख सुद्धा स्वातंत्र्य गमावलेल्यांना आनंद देऊ शकत नाही’ असं कवी सांगतात.
सावरकरांना शब्दप्रभू किंवा भाषाप्रभू का म्हटलं जातं याची प्रचिती याही कवितेत येते. उदाहरणार्थ, ‘वृक वारुनि रक्षिल ना हे’ (म्हणजे मी तुझी भूक भागवून तुझे रक्षण करीन) किंवा ‘
विश्व हे मुदित मग केले। रविकरें’ (सकाळ झाली, ही साधी गोष्ट किती गोड शब्दात सांगितली आहे). कोंकराला आई भेटल्यानंतर फक्त त्या दोघांनाच वा कवीलाच आनंद झालेला नाही तर, या आनंदात निसर्ग सुद्धा सहभागी झाला आहे, ‘डोलतो मुदित तरुवर तो। सप्रेम पक्षी हा गातो’ असं कवी म्हणतात.
अशी छंदबद्ध व यमक, स्वभावोक्ती अशा अलंकारांनी नटलेली तसेच जाता जाता सहजपणे ‘संसार दुःखमय आहे’, विश्वाचा पसारा मिथ्या आहे’ अशी त्रिकालाबाधित सत्य सांगणारी कविता सावरकर एवढ्या कोवळ्या वयात लिहितात यावरूनच त्यांच्या बुद्धीची झेप दिसून येते. त्रिवार नमन!!
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
दूरभाष क्र. ९८५०२२८६५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈