सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ अजून मी आहे… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री  ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

रसास्वाद  : ज्योत्स्ना तानवडे

समाजात गैर रूढी, परंपरा चुकीच्या धारणा खोलवर रुजलेल्या आहेत. त्या विरुद्ध अनेक समाजसेवी कार्यकर्ते अतिशय तळमळीने कार्य करीत असतात. पण त्यांना म्हणावे तसे यश येत नाही. तरीही मोठ्या निर्धाराने ते आपला लढा सुरूच ठेवत असतात. अशाच एका कार्यकर्त्याची तळमळ मांडली आहे डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी अजून मी आहे या त्यांच्या एका वेगळ्या विषयावरच्या अतिशय सुंदर कवितेतून. आज आपण त्या कवितेचा रसास्वाद घेणार आहोत.

☆ अजून मी आहे ☆

अजून मी आहे

आयुष्याचा आनंद घेतो आहे

जीवनाचा थांग शोधतो आहे

समाजाचे पांग फेडतो आहे

 

माणुसकीला काळे फासणाऱ्या

स्त्री-भृणहत्या रोखण्याचे

गुर्मीत लडबडलेले

पुरुषप्राधान्य झुगारून देण्याचे

माणसाला माणसापासून तोडणारी

जाती-जमातीतील तेढ मिटविण्याचे

———

———

किती किती स्वप्ने पाहिली आयुष्यभर

मोराच्या पिसाऱ्याच्या डोळ्यातून

 

काहींची चाहूल लागली

चोरपावलांची

काही दूर पळाली

नाठाळ (व्रात्य) पोरासारखी

तर काही आभासच राहिली

रणरणत्या वाळवंटातील मृगजळासारखी

आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर

हेलकावायला माझ्या या

चक्रवाकासारख्या आर्त मनाला

 

कधी संभ्रम पडला सश्यासारखा

माकडीणीच्या पिलासारखी

उराशी कवटाळलेली

माझी तत्वच तर मिथ्या नाहीत

चकव्यात भेलकावणाऱ्या

फसव्या रस्त्यांसारखी?

तरीही मोठ्या शर्थीने

दीपस्तंभासारखा पाय रोवून

तसाच उभा राहिलो

त्या स्वप्नांना

त्या तत्वांना

त्या आदर्शांना

उराशी कवटाळून अजूनही

दुर्दम्य आशेने कन्याकुमारीच्या.

जाळी तुटली तरी

परत विणत राहणाऱ्या

कोळ्याचा आदर्श मनी धरून.

 

म्हणूनच म्हणतो

अजून मी आहे

अपयशातूनही

आयुष्याचा आनंद घेतो आहे

गटांगळ्या खात खात

जीवनाचा थांग शोधतो आहे

अवहेलनेतूनही

समाजाचे पांग फेडतो आहे

 

हो

अजून मी आहे

 

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

 

अजून मी आहे

आयुष्याचा आनंद घेतो आहे

जीवनाचा थांग शोधतो आहे

समाजाचे पांग फेडतो आहे

मुक्तछंदातील ही कविता प्रथम पुरुषी एकवचनातील आहे. कवी समाजाच्या भल्यासाठी झटणारा एक प्रामाणिक, तळमळीचा कार्यकर्ता आहे. तो त्याच्या वाटचालीविषयी आपल्याशी संवाद साधतो आहे.

तो आयुष्याचा मनापासून आनंद घेतो आहे. मानवी जीवनाचा थांग सहजासहजी लागणे शक्य नसते. पण तो जिद्दीने असा थांग शोधतो आहे. समाजाप्रती प्रत्येकाची काही कर्तव्ये असतात. कवी आपली अशी कर्तव्ये करण्याचा मनापासून प्रयत्न करतो आहे. प्रत्येकाने वैयक्तिक जीवन आनंदात जगताना समाजासाठी असलेले आपले कर्तव्य सुद्धा उत्तम रीतीने पार पाडायला हवे. दोन्हीचा छान समन्वय साधायला हवा.

कवी अशी वाटचाल बऱ्याच काळापासून करतो आहे. हे ‘अजून’ या शब्दातून स्पष्ट होते आहे. निवृत्तीचे वय होत आले, बरीच वाटचाल झाली तरी त्याने आपली सामाजिक भूमिका बदललेली नाही. तो पूर्वीच्या जोमाने अजूनही काम करीत आहे.

कवीने इथे अन्योक्ती अलंकाराचा छान वापर केलेला आहे. स्वतःचे मनोगत सांगत असताना ही कविता समाजातील थोर कार्यकर्त्यांना उद्देशून पण आहे. त्यांच्या प्रती आदर दाखवणारी आहे.

माणुसकीला काळे फासणाऱ्या

स्त्रीभृणहत्या रोखण्याचे

गुर्मीत लडबडलेले

पुरुषप्राधान्य झुगारून देण्याचे

माणसाला माणसापासून तोडणारी

जाती- जमातीतील तेढ मिटवण्याचे

———-

किती किती स्वप्ने पाहिली आयुष्यभर

मोराच्या पिसाऱ्याच्या डोळ्यातून

मन व्यथीत करणाऱ्या असंख्य दुष्प्रवृत्ती समाजात आहेत. त्यातून असंख्य वाईट घटना घडतात. स्त्रीभृणहत्या हा तर मानवतेला लागलेला फार मोठा कलंक आहे. पुरुषप्रधान समाज व्यवस्थेने स्त्रीवर सतत अन्याय, अत्याचार केलेले आहेत. जाती-जमातीत तेढ निर्माण करून माणसाला माणसापासून तोडणारी विघातक कृत्ये केली जातात. कवीने या फक्त या तीन स्वप्नांचा उल्लेख केला आहे आणि त्यानंतर दोन ओळी नुसत्याच मोकळ्या सोडल्या आहेत. त्यांना फार मोठा अर्थ आहे. समाजाच्या  भल्यासाठी काम करण्याच्या अनुल्लेखित अशा असंख्य गोष्टी आहेत ज्यांची यादी खूप मोठी आहे. हेच त्या दोन ओळी दर्शवितात.

समाजात इतर वाईट कृत्ये, अत्याचार, स्वकेंद्रित व्यवस्था अशा अनेक अपप्रवृत्ती, आपत्ती आहेत. त्यांना संपवण्याची, समाज धारणा बदलण्याची अशी कितीतरी स्वप्ने कवीने पाहिलेली आहेत. मोराच्या पिसाऱ्यात जसे हजारो डोळे असतात तसेच कवीने असंख्य दृष्टीने, विविध अंगाने ही स्वप्ने पाहिली आहेत. त्याची तीव्रता मोराच्या पिसाऱ्यातील डोळे ही उपमा अतिशय सुंदरपणे स्पष्ट करते. या गोष्टींमुळे कवीच्या  मनात खूप आर्तता दाटलेली आहे.

काहींची चाहूल लागली

चोरपावलांची

काही दूर पळाली

नाठाळ ( व्रात्य )पोरासारखी

तर काही आभासच राहिली

रणरणत्या वाळवंटातील मृगजळासारखी

आशा निराशेच्या हिंदोळ्यावर

हेलकावायला माझ्या या

चक्रवाकासारख्या आर्त मनाला

कवीने पुन्हा पुन्हा काही स्वप्नं बघीतली. त्यातल्या काहींची चाहूलही लागली. आता ती स्वप्ने खरी होतील अशी आस वाढली आणि ती स्वप्ने एखाद्या नाठाळ पोरासारखी दूर निघून गेली. एखादे नाठाळ ( व्रात्य ) पोर कसे करते, त्याला एखादी गोष्ट कर किंवा करू नकोस असे कितीदाही बजावले तरी ते अजिबात ऐकत नाही. तशीच ही स्वप्नेही फक्त वाकुल्या दाखवतात आणि सत्यात न येता नाहीशी होतात. त्यांना ‘नाठाळ’ ही अगदी छान आणि समर्पक उपमा कवीने योजलेली आहे.

रणरणत्या वाळवंटात दिसणारे मृगजळ हे सत्य नसतेच. तो फक्त आभास असतो. तसाच काही स्वप्नांचा फक्त आभासच होता. त्यामुळे कवीच्या पदरी निराशाच येते.चक्रवाक जसा पावसासाठी आर्ततेने वाट पाहत असतो तसेच कवीचे मन आर्तपणे आशा निराशेच्या हिंदोळ्यावर नुसतेच झुलत राहते. पण हाती काही गवसत नाही.

कधी संभ्रम पडला सशासारखा

माकडीणीच्या पिलासारखी

उराशी कवटाळलेली

माझी तत्त्वच तर मिथ्या नाहीत

चकव्यात भेलकावणाऱ्या

फसव्या रस्त्यांसारखी ?

तरीही मोठ्या शर्थीने

दीपस्तंभासारखा पाय रोवून

तसाच उभा राहिलो

त्या स्वप्नांना

त्या तत्त्वांना

त्या आदर्शांना

उराशी कवटाळून अजूनही

दुर्दम्य आशेने कन्याकुमारीच्या.

जाळी तुटली तरी

परत विणत रहाणाऱ्या

कोळ्याचा आदर्श मनी धरून

ससा जसा बिळातून बाहेर जाताना बावचळतो. बाहेर कोणी नाही ना, कोणत्या दिशेला जावे, नक्की काय करावे अशी त्याची संभ्रमावस्था होते. तशीच इथं स्वप्नं सत्यात येत नसल्याने आता नक्की काय करावे अशी कवीची संभ्रमावस्था होते आहे. माकडीण जशी पिलाला उराशी अगदी कवटाळून धरते तशीच कवीने आपली स्वप्ने निगुतीने जपलेली आहेत. पण ती खरी होत नाहीत हे बघून शेवटी कवीला आपली तत्त्व तर खोटी नाहीत ना अशी शंका वाटू लागते. एखाद्या चकव्यातल्या कोणत्याही वाटेने गेले तरी शेवटी पहिल्याच ठिकाणी परत येणे होते. वाट पुढे जातच नाही. तसंच काहीसं स्वप्नांच्या बाबतीत झाल्याने कवीला संभ्रम पडला आहे. तरीही त्याने जिद्द सोडलेली नाही.

दीपस्तंभ जसा कितीही लाटा आदळल्या तरी ठाम रहातो तसाच कवी सुद्धा कितीही अडथळे आले, समाजाचा विरोध अंगावर आला तरी खचून न जाता आपल्या विचारांवर ठाम आहे. त्याचबरोबर दीपस्तंभ जसा मार्ग दाखवण्याचे काम करतो तसाच कवी सुद्धा समाजाला योग्य विचार, योग्य मार्ग दाखवण्याचे मोठे काम करतो. आपली तत्त्व, आपली स्वप्नं, आपल्या आदर्शांना त्याने अजूनही आपल्या उराशी तसेच घट्ट कवटाळून धरलेलं आहे. दुर्दम्य आशावादाचे प्रतीक म्हणजे कन्याकुमारी. तशीच आशा कवीच्या मनात अजूनही शाबूत आहे. आशा निराशेची बरीच पायपीट झाली. तरीही कवी खचलेला नाही. निराश झाला नाही. ती स्वप्ने खरी करण्यासाठीचा त्याचा लढा अद्यापही तसाच सुरू आहे. हे वास्तव ‘अजूनही’ या शब्दातून सामोरे येते. कितीदाही जाळी तुटली तरी पुन्हा पुन्हा ती विणत रहाणाऱ्या कोळ्याचा आदर्श त्याच्या मनावर पूर्णपणे ठसलेला आहे. त्यामुळे कवी अजूनही आस न सोडता धडपडतोच आहे.

 म्हणूनच म्हणतो

अजून मी आहे

अपयशातूनही

आयुष्याचा आनंद घेतो आहे

गटांगळ्या खात खात

जीवनाचा थांग शोधतो आहे अवहेलनेतूनही

समाजाचे पांग फेडतो आहे

 

हो

अजून मी आहे .

म्हणूनच कवी सांगतो आहे की ,” मी हार मानलेली नाही. अजूनही मोठ्या जिद्दीने मी माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करत आहे. कितीही अपयश आले तरी त्यातूनही धडा शिकत नव्या जिद्दीने आयुष्याचा आनंद घेतो आहे. या जीवन प्रवाहात कितीही जरी गटांगळ्या खाव्या लागल्या तरी, मी त्यात तग धरून आहे आणि त्याचा थांग अजून शोधतोच आहे. या माझ्या प्रयत्नांना समाजाने नावे ठेवली, मला अपमानित केले तरीही मी माझी कर्तव्यं सोडलेली नाहीत. समाजाच्या सुखासाठी मी धडपडतोच आहे आणि समाजऋण फेडायचा आटोकाट प्रयत्न करतो आहे.” म्हणूनच शेवटी कवी मोठ्या  उमेदीने सांगतोय,”  मी हरलेलो नाही. मी अजून आहे.”

समाजातील अन्याय्य प्रथा बंद व्हाव्यात, समाजमनात चांगला बदल व्हावा, समाज पुन्हा एक होऊन जवळ यावा यासाठी प्रामाणिकपणे धडपडणारा कवी हा असंख्य लहानथोर समाजसेवकांचे प्रतिनिधित्व करतो आहे. अशी माणसे शेवटपर्यंत ध्यास न सोडता या अन्यायाविरुद्ध लढत रहातात. यातूनच अनेक वाईट अन्यायकारक गोष्टी बंद झालेल्या आहेत. म्हणूनच इथे कवीही जिद्द न सोडता ‘मी अजून आहे’ असे सांगतो आहे.

एखाद्या कुटुंबावर काही संकट आले, कुणी काही त्रास देत असेल, अन्याय करत असेल तर घरातील वडीलधारी व्यक्ती घरातल्यांना समजावते,” घाबरू नका. मी अजून आहे.” तशीच भूमिका हे समाजसेवक बजावत असतात. समाजहितासाठी ते सदैव तत्पर असतात. पाठीराखे होतात. हेच वास्तव कवी  इथे सांगतो आहे.

कवितेची सौंदर्य स्थळे :–  समाजाच्या भल्यासाठी अतिशय तळमळीने काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याचे हे मनोगत यथार्थ वर्णन करण्यासाठी कवीने ‘चक्रवाकाची आर्तता’ ही उपमा दिली आहे. परमोच्च आर्तता म्हणजे चक्रवाक. त्यामुळे या शब्दातून कवीचीही आर्तता अचूक लक्षात येते. कवी अनेक प्रश्नांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो आहे, हे सांगण्यासाठी मोराच्या पिसाऱ्यातील डोळ्यांची सुंदर उपमा दिलेली आहे.

समाज बदलण्यासाठी कवी जी स्वप्ने बघतोय त्यांचेही खूप अचूक आणि समर्पक शब्दात वर्णन केलेले आहे. ही स्वप्न काहीही झाले तरी खरी होत नाहीत हे सांगतोय ‘नाठाळ’ शब्द. त्यातून व्रात्य, नाठाळ मुलासारखी अजिबात न ऐकणारी ही स्वप्नं  कवीला सतत सतावतात हे लक्षात येते. ही स्वप्न आभासीच ठरतात. तरीही ती चोर पावलांनी चाहूल देत असतात. असे असूनही यामुळे खचून न जाता कवी ठाम राहतो कसा तर, दुर्दम्य आशावादी कन्याकुमारी सारखा, दीपस्तंभासारखा ठाम राहतो. या सर्व उपमा कवितेच्या सौंदर्यात भर घालत सखोल अर्थ उलगडून दाखवतात.

या कवितेतील ‘अन्योक्ती’ अलंकारांमध्ये मुळे ही कविता कवी बरोबरच अशा सर्व थोर सामाजिक कार्यकर्त्यांबद्दल आदर दाखविणारी झाली आहे.

अशा या अतिशय आशयघन कवितेमध्ये कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी एका अत्यंत तळमळीने समाजासाठी कार्यरत असणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याची आंतरिक तळमळ मांडलेली आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

१०/०८/२०२३

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments