सुश्री नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆  विरुपा…. कवयित्री – सुश्री आश्लेषा महाजन ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

माझ्या सुदैवानेच कवयित्री आश्लेषा महाजन यांची विरुपा ही कविता वाचनात आली. आणि स्पदनांनी मनातल्या जाणिवा जागृत केल्या. काही विचार मनात आले . मला या कवितेतून जे जाणवले, कळले , समजले  ते मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.

☆ कविता  – विरुपा ☆

इथे फक्त काळोख डोहातला अन्

फणा कालियाचा विषारी निळा

इथे जीवघेणी मिठी प्राक्तनाची

तथा प्राणमोही व्यथांचा टिळा

*

इथे लौकिकाचा जगद्व्याळ गुंता

तथा संभ्रमांची न येथे क्षती

कसोटी सदाचीच कर्तव्य मूढा

तुझ्या उद्धृतांची कुठे संगती?

*

कधीची उभी अष्टवक्रा विरुपा

तुझ्या दर्शनाचीच तृष्णा खरी

कुठे गुंतला व्यापतापामध्ये तू

कळेना कशी हाय! कुब्जा तरी —

*

तुझ्या पंचप्राणातुनी फुंकलेली

हवी सानिका- सुर -संमोहिनी

किती येरझारे जरी या ललाटी

उपेक्षाच मी जन्महिना कुणी —

*

असू दे तुझी वेद -शास्त्रे- पुराणे

नको त्यातली गूढ अर्थांतरे

हवा मृण्मयी देह बुद्धीस माझ्या

तुझा सावळा मानवी स्पर्श रे!!!

कवयित्री – सुश्री आश्लेषा महाजन

रसग्रहण

आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी परिस्थितीच्या किंवा विचारांच्या वादळाला सामोरे जावे लागते. त्यावेळी सभोवती संपूर्णपणे अंधःकार दाटलेला भासतो. आजूबाजूची प्रत्येक गोष्ट न् गोष्ट त्या अंधाराशी संधान बांधून त्या अंधाराची भयावहता वाढवणारी वाटू लागते .मनाला हतबलता ,अगतिकता ,विवशता या भावनांशिवाय दुसरे काहीच सुचत नाही. संपूर्ण परिस्थिती या अंधाराशी नाळ बांधून आली आहे असे वाटत राहते. या कवितेतील “ती” म्हणजे विरूपा! तिच्या मनातल्या अशा भावनांशी समरस होऊन तिचे मनोगत कवयित्रीच्या संवेदनशील मनातून उलगडू लागते. तिच्या जाणीवांना कवयित्रीने बोलते केले आहे.

विरुपा

इथे फक्त काळोख डोहातला अन्

फणा कालियाचा विषारी निळा

इथे जीवघेणी मिठी प्राक्तनाची

तथा प्राणमोही व्यथांचा टिळा

कवितेचे विरूपा हे शीर्षक अतिशय लक्षवेधी!! कवितेतील आशयाकडे सजगतेने, सूचकतेने बघण्याचे भान वाचकांच्या मनात जागवणारे. या विरूपेच्या अवती भोवती फक्त आणि फक्त काळोखच जाणवतो आहे .कुठेही थोडासाही आशेचा कवडसा ,बदलत्या परिस्थितीचा किरण दृष्टिक्षेपात येत नाही. हा काळोख ही असा तसा नाही तर डोहातला. परिस्थितीचे गांभीर्य जाणवून देणारा.. अगम्य , गूढ वातावरण निर्माण करणारा—-अशा या गूढ डोहात दाटलेला काळोख न हलणारा, अचल असा. त्यात काहीही बदल होणार नाही याची जणू ग्वाही देणारा ..आशावादास तिलांजली देणारा हा काळोख पुरेसा नाही म्हणूनच की काय तेथे कालिया ही  आपला विषारी निळा फणा उभारून तयार आहे. तिला डसण्याचा ,दंश करण्याचा निग्रही निर्धार/विचार त्याच्या मनात आहे. हा काळोख, कालियाचा दंश नशिबात लिहिलेलाच आहे.मनात दहशत निर्माण करणारा आहे.कारण या डोहातुन तरुन जाण्यासाठी आवश्यक असलेली प्राक्तनाची मिठी /प्राक्तनाची साथ ही आधाराची नसून केवळ जीवघेणीच आहे.अर्थात दैवाची हवीहवीशी वाटणारी साथ मिळणार नाही याची जाणीव झाली आहे.

संपूर्ण आयुष्याला प्राणमोही /प्राणघातक व्यथांचा टिळा लाभलेला आहे.कुठून ही कुणाची ही कसली ही मदत नाही हे स्पष्टपणे दिसून आले आहे.त्यातून सुटका कशी आणि कुणी करावी?? हा प्रश्न अनुत्तरित राहणार याची खात्री होते.

इथे लौकिकाचा जगद्व्याळ गुंता

तथा संभ्रमांची न येथे क्षती

कसोटी सदाचीच कर्तव्य मूढा

तुझ्या उद्धृतांची कुठे संगती?

लौकिकार्थाने जगताना जगव्यापी गुंत्याचा सामना करावाच लागतो .असे करताना मनाला पडणाऱ्या संभ्रमांनाही इथे क्षती नाही,अंत नाही. ते क्षितिजापर्यंत पसरलेले आहेत .ते वारेमाप ,अपरंपार आहेत. समजूतींना भेद व छेद देणारे आहेत .त्या संभ्रमांना सोडून व आपलेसे करून जगण्याचे ठरवले तर कर्तव्यदक्ष व कर्तव्य मूढ मनाची कसोटी ही सदाचीच आहे. कर्तव्यदक्ष मन हे बरेचदा कर्तव्याच्या मूळ व मूढ कल्पनेशी परंपरेने व पारंपरिकतेने गुंतले जाते हे सत्य ही कवयित्रीने स्पष्ट केले आहे. या सर्वाला अपवाद विरळाच!! देवावर श्रद्धा असणाऱ्याने त्याच्या (देवाच्या) वचनांचा /बोलांचा आधार घ्यावा म्हटले तर त्याचीही संगती न लागण्या सारखी परिस्थिती दृष्टीस पडते .त्याच्या वचनांची संगती आजूबाजूच्या परिस्थितीशी मेळ साधत नाही . किंबहुना बरेचदा फारकतच दिसून येते .अशा वेळी सर्व बाजूने विवश झालेली अष्टवक्रा विरुपा मात्र कधीची ताटकळत उभी आहे त्याच्या दर्शनाच्या प्रतीक्षेत!! तिच्या मनाला आणि मनात त्याच्या दर्शनाची आस आहे . तिला त्याच्या रुपाची ओळख व्हावी याची तहान, तृष्णा लागलेली आहे .आणि जगात इतर बाबी जरी भ्रामक असल्या तरी तिची आस ही मात्र एकमेव खरी गोष्ट आहे हे ती ठासून सांगते आहे. बाकी सारे संभ्रमाचे राज्य याची जाणीव ती करून देते. तिच्या प्रतिक्षेला अजूनही फळ आलेले नाही, त्याचे प्रत्यक्ष दर्शन तिला झालेले नाही. त्यामुळे ती म्हणते की जगाच्या व्यापा-तापामध्ये तू गुंतलेला आहेस ,गुंतून पडला आहेस .अशावेळी माझ्यासारख्या विरूपेचे/कुब्जेचे अस्तित्व ,तिचे मन तुला कसे कळणार ?अशी कुणी “एक” आहे याचे भान तरी तुला कसे असणार? हे सर्व जाणूनही ती त्याला त्याच्याकडून तिला जे काही हवे आहे ते स्पष्टपणे सांगण्याचा प्रयास करते.

तुझ्या पंचप्राणातुनी फुंकलेली

हवी सानिका- सुर -संमोहिनी

किती येरझारे जरी या ललाटी

उपेक्षाच मी जन्महिना कुणी —

तिच्या मनातल्या “त्याने” मनापासून अगदी पंचप्राण लावून फुंकलेल्या बासरीतून उमटलेल्या सुरांची संमोहिनी तिला हवी आहे ,ती तिला खुणावते आहे. तिला इतर काहीही नको. त्या सूर संमोहिनीत तिला तिचा जीव ,तिचे अस्तित्व विसरायचे आहे. तिला त्या सुरांच्या अस्तित्वात तिचे अस्तित्व मिसळून टाकायचे आहे .तिला कल्पना आहे की हे सारे अगदी सोपे, सहज नाही .यासाठी तिच्या ललाटी किती जन्म लिहिले असतील कोण जाणे !ही सुर संमोहिनी लाभण्याकरता तिला अनेक जन्म घ्यावे लागतील ही!! कदाचित नुसत्या येरझारा ही घालाव्या लागतील आणि तरीही हाताला काहीच लाभणार नाही. “जन्म हिन कुणी “असे आणि हेच वास्तव तिच्या नशिबी असेल .त्या सूर संमोहिनीचे सौभाग्य तिला लाभणारं ही नाही कदाचित..

असू दे तुझी वेद -शास्त्रे- पुराणे

नको त्यातली गूढ अर्थांतरे

हवा मृण्मयी देह बुद्धीस माझ्या

तुझा सावळा मानवी स्पर्श रे!!!

जीवनातील साऱ्या सत्याला सामोरे जाण्याची तिच्या मनाची तयारी आहे.. सर्व जाणूनही ती त्याला म्हणते वेद ,शास्त्र , पुराणे यातील तत्त्व, वचने, त्यातील ईश्वराचे अस्तित्व, जगण्याचे तत्वज्ञान, द्वैत अद्वैताची विस्तृत चर्चा, त्याचे अनुभव, गूढ गर्भित अर्थ तसेच, त्यांच्या अर्थांतरात तिला  स्वारस्य नाही.मत मतांतरे जाणून घेण्याची तिला अजिबात आस नाही .या सर्व ज्ञानाचा मोह तिला अजिबात नाही. मातीत मिसळणाऱ्या तिच्या नश्वर देह बुद्धीला मात्र आस आहे ती तिला भावलेल्या त्या सावळ्या रूपा सारखी वर्तणूक असणाऱ्या मानवी स्पर्शाची.. अर्थात वेद,शास्त्रातले तत्त्वज्ञान कागदोपत्री न राहता ते प्रत्यक्षात आचरणाऱ्या, ते जगणाऱ्या मानवाची. केवळ कल्पना ,संकल्पना यात अडकून न राहता जगण्याचे प्रत्यक्ष भान असणारा मानवी स्पर्श तिला हवा आहे . कुब्जा /विरूपा हे प्रतीक आहे प्रत्येक मानवाच्या मनाचे .त्याला सूज्ञ व सम्यक विचारांनी जगणाऱ्या मानवाचीच प्रतीक्षा आहे . दुर्दैवाने ते दुर्मिळ आहे असे वाटते. माणसाने माणसातच देव शोधावा, पहावा आणि तो सुदैवाने त्याला मिळावा यासारखे सद्भाग्य ते कोणते! हा सारा मला वाटलेला अर्थ आहे. तो व्यक्त करावासा वाटला मनापासून इतकेच ..

ही कविता वाचकांना अंतर्मुख करते ,विचार करायला लावते. कुठेही ,काहीही स्पष्टपणे न सांगता किंवा त्याकडे निर्देशही न करता अपेक्षित परिणाम साधणारी ही कविता मनाला भुरळ घालते हे मात्र नक्की. त्याची वृत्तबद्धता ,समर्पक शब्दांची योजना त्या कवितेला लय ताल आणि गेयता ही प्राप्त करून देते हे विशेष.

© सुश्री नीलिमा खरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments