सुश्री नीलिमा खरे
काव्यानंद
☆ माणूस… कवी – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆
आपण सध्याच्या युगात वेगवेगळे “डेज” साजरे करत असतो.आज १जुलै चा दिवस डॉ.बी सी.राय यांचा जन्म दिवस.. हा दिवस
“डॉक्टर्स डे” मानला जातो . आजचा दिवस समाजातील वैद्यकीय व्यावसायिक लोकांप्रती आदरभाव व कृतज्ञता व्यक्त करण्याचा!! किमान या एका दिवशी तरी आपण सारे मनापासून,अंत: करण्यापासून त्या सर्वांप्रती व्यक्त होऊ या.
वैद्यकीय व्यवसाय हा थेट माणसाच्या जीवनाशी निगडीत असल्याने समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.
संपूर्णपणे ज्ञानाधिष्ठित असा हा व्यवसाय. वेळेवर व योग्य औषधोपचार झाल्यास संबंधित माणूस जगण्याची /आजारातून बरा होण्याची शक्यता निर्माण होते.बहुतांश डॉक्टर या पेशाकडे केवळ अर्थार्जनाचा व समाजात मानाने व प्रतिष्ठित पणे जगण्याचा दृष्टिकोन ठेवून जगत नसतात.तर एक माणूस म्हणून समाजासाठी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करण्यात आनंद मानत असतात.आपले विधित कार्य करत असताना डॉक्टर लोकांना ही समाजाने त्यांच्या विषयी काही भावना जपाव्यात असे वाटले तर त्यात गैर काहीच नाही.
पुण्यातील अनुभवी,ज्येष्ठ व प्रथितयश स्री रोग तज्ञ डॉ. निशिकांत श्रोत्री हे मान्यवर साहित्यिक ही आहेत.त्यांनी स्वतःच्या भावना “माणूस”या कवितेतून व्यक्त केल्या आहेत.
आज या कवितेचा आस्वाद घेऊ या. त्यातील भाव भावना, कवितेतील आंतरिक तळमळ ,कळकळ समजून घेऊ या. त्यातून कवीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही आपल्याला समजून येणार आहे.
☆ माणूस ☆
*
नका देऊ देवत्व मजला म्हणू नका राक्षस
भावभावनांतुन हिंदोळत साधा मी माणूस
*
माझे ते जवळी होते अपुले जाणून
कोणाला ना दूर लोटले परके मानून
सेवा हे तर ब्रीद मानले आशा नाही फलास
कधि सावरलो कधी घसरलो परी ना हव्यास
*
देवपूजा करीत आलो मनात ठेवुन भक्ती
मानवसेवा माधवसेवा नाही मनी विरक्ती
मानवतेला कर्म जाणुनी मानिली न तोशीस
भुकेजल्या पाहुनी भरविला मम मुखीचा घास
*
निज आत्म्याचे दर्शन मजला सकलांच्या अंतरी
परमात्म्याची जाण काही नाही मजला जरी
सकल जनांच्या नेत्री मोद बघण्याचा ध्यास
अन्य काही आशा नाही रुचली मन्मनास
©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
रसग्रहण
“माणूस” हे कवितेचे शीर्षक कवितेचा विषय व आशय अगदी सुस्पष्ट करते. त्यामुळे वैयक्तिक माणूस म्हणूनही या कवितेशी आपला संबंध सहजपणे जुळून येतो. डॉक्टर श्रोत्रींनी जीवनाशी संबंधित अनेक भावनांना त्यांच्या कवितांमधून स्पर्श केला आहे .आज माणूस या कवितेतून ते त्यांच्या स्वतःविषयीच्या /स्वतःच्या मनातल्या भावना आपल्यासमोर मांडत आहेत. कवी पेशाने स्त्रीरोगतज्ञ आहेत .
अनेक स्त्रियांच्या प्रसुतीचे वैद्यकीय कार्य डॉक्टर या नात्याने त्यांनी समर्थपणे पार पाडले आहे. अनेक वेळेला अडल्या-नडल्यांचे ते जणू देवच ठरले असतील किंवा तसे भासले असतील. तसेही वैद्यकीय
व्यवसाय हा संपूर्णपणे माणसाच्या जीवनाशी थेट निगडित असल्याने डॉक्टरांकडे “पृथ्वीवरील देव” या भूमिकेतून आपण सर्वसामान्य जण बघत असतो. खरंतर असे देवत्व बहाल झाले असता /लाभले असता कुणी ही माणूस सुखावून जाईल,आनंदून जाईल.परंतु सत्याशी प्रामाणिक असलेला आणि जाणीवेने जाणींवाविषयी आणि जाणिवांशी बध्द असलेला डाॅ. श्रोत्री सरांसारखा कवी माणूस या भूमिकेशी फारकत घेताना दिसतो.या विषयीचे विचार अत्यंत स्पष्टपणे कवीने कवितेतून मांडले आहेत.
नका देऊ देवत्व मजला म्हणू नका राक्षस
भावभावनांतुन हिंदोळत साधा मी माणूस
मी केवळ डॉक्टर आहे म्हणून मला देवत्व बहाल करू नका असे कवी स्पष्ट करत आहे . कवी पुढे म्हणतो की कदाचित काही लोक ,काही माणसे यांच्या मते ते (डॉक्टर किंवा माणूस म्हणून ) राक्षस किंवा दानव ही असू शकतील. कारण काही वेळेला रुग्णाच्या भावनेशी ,परिस्थितीशी डॉक्टरांना काही घेणे दिले नसते असे समजणारे ही खूप लोक समाजात वावरत असतात. त्यांच्याकडे निर्देश करून कवी म्हणतो की असे जर वाटत असेल तर मला राक्षस मात्र म्हणू नका. मी देवही नाही व राक्षस ही नाही. तर मी एक सर्वसामान्य माणूस आहे ज्याने वैद्यकीय ज्ञान प्राप्त केले आहे .व त्या ज्ञानार्जनामुळे वैद्यकीय व्यावसायिक म्हणून समाजात वावरत आहे, त्या दृष्टीने कार्यरत आहे. कवी पुढे म्हणतो की मी सर्वांसारखाच भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलणारा माणूस आहे.चांगले /वाईट ,भले /बुरे अशा भावनांना सामोरे जाणारा मी ही एक सर्वसामान्य माणूस आहे हे अत्यंत स्पष्टपणे मान्य केले आहे..द्विधा मनस्थितीचा कदाचित खुद्द कवीला सामना करावा लागलेला असू शकतो हे सूचित केले आहे. मनात आलेल्या/ उद्धवलेल्या भावनांचा प्रांजळपणे / प्रामाणिक पणे स्वीकार करणे /ते मान्य करणे यासाठी मनाची एक विशिष्ट धारणा लागते ती या कवितेतून आपल्याला प्रत्ययास येते. खरंतर ही भावना व्यक्त करून कवीने आपण एक चांगला माणूस आहोत हे जाणवून दिले आहे. अशाप्रकारे देव नाही व राक्षस नाही परंतु एक अतिशय निरपेक्ष भावनेने वैद्यकीय क्षेत्रात काम करणारा माणूस म्हणून समाजाने आपल्याकडे पहावे अशी माफक अपेक्षा कवीने या ध्रुवपदातून व्यक्त केली आहे. ती सूज्ञ माणसाला नक्कीच रास्त वाटेल.
माझे ते जवळी होते अपुले जाणून
कोणाला ना दूर लोटले परके मानून
सेवा हे तर ब्रीद मानले आशा नाही फलास
कधि सावरलो कधी घसरलो परी ना हव्यास
कवितेच्या पहिल्या कडव्यातून कवी म्हणतो/ आपल्याला सांगतो की अपुले ज्यांना जाणले म्हणजे जे कवीला आपले वाटले व ज्यांना कवी आपला वाटला ते लोक कवीच्या नेहमीच जवळ होते. “अपुले” या शब्दावरील हा श्लेष अतिशय समर्पक आणि कवितेतील आशयाला पुष्टी देणारा. कवी मनाची प्रगल्भता व साहित्यिक जाण नेमकेपणाने दाखवणारा ही!!
कवीने सर्वांना अपुले जाणून जवळ केले, कुणालाही परके म्हणून दूर लोटलेले नाही . सर्वांना आपले मानून सर्वांशी एकसमान व्यवहार केला. त्यांना वैद्यकीय सेवा प्रदान केली ती रुग्ण आणि डॉक्टर या भावनेने व माणूस व माणुसकीच्या नात्याने सुध्दा.. हे सर्व करण्याचे कारण म्हणजे समाजातील गरजू लोकांची सेवा हेच जीवन असे ब्रीद कवीने मानले आहे. अशा वेळी सेवा करेल त्याला मेवा मिळेल अशा आशयाची वृत्ती मात्र कदापी मनात ठेवलेली नाही .फळाची आशा मनात कधीच धरली नाही.”आशा नाही फलास” मधील दुसरा श्लेषात्मक अर्थ असा की फळाला आशा लाभली नाही. कदाचित गरजू लोकांनी कवीच्या मनातील वैद्यकीय व्यावसायिक व माणूस म्हणून जगण्याची भावना जाणली नाही .तशा प्रकारे कधीतरी निराशाही वाट्याला आली असावी .कवी प्रांजलपणे कबूल करतो अशा वातावरणाचा/परिस्थितीचा सामना करावा लागला तेव्हा कधी तरी कवी त्याच्या निरलस मनोवृत्ती पासून दूर झाला.लोकांच्या वागणूकीने बैचेन झाला.तरी ही त्याने कुणाकडून कसली ही अपेक्षा केली नाही.त्याच्या ब्रीदापासून/ ध्येयापासून तो कधी थोडा घसरला असला तरी बाजूला सरला नाही.व कुठल्याही प्रकारचा हव्यास मनात ठेवलेला नाही. निरपेक्षपणे /तटस्थपणे आपले सेवेचे कार्य कवीने अव्याहत चालू ठेवले.वर उल्लेख केल्याप्रमाणे या कडव्यात योजलेले दोन ठिकाणचे श्लेष अलंकार व जाणून,मानून तसेच फलास, हव्यास मधील यमक सुंदर तऱ्हेने जुळले आहे.साहजिकच यामुळे कवितेला लाभलेली नादमयता मनाला मोहविते.अतिशय साधे,सहज सोपे शब्द पण अर्थ आशयपूर्ण आहे.
देवपूजा करीत आलो मनात ठेवुन भक्ती
मानवसेवा माधवसेवा नाही मनी विरक्ती
मानवतेला कर्म जाणुनी मानिली न तोशीस
भुकेजल्या पाहुनी भरविला मम मुखीचा घास
उच्च शिक्षण घेतले आहे किंवा माणसाला जीवनदान देण्याचे पुण्य किंवा मह्तकार्य करतो आहे अशी भावना मनात येऊन स्वतः देव असल्याची भावना कवीच्या मनात कधीच डोकावली नाही.करता करविता देव आहे ,जी अदृश्य शक्ती आहे तिच्या प्रती त्याने मनोमन श्रद्धा जपली आहे. त्याची मनापासून पूजा केली, त्यामागील खरा भक्ती भाव जपून ,जाणून व ठेवून .हे सर्व केवळ उपचार म्हणून नव्हे. स्वतःचे नेमस्त काम करता करता ते करण्याची प्रेरणा देणारा, ताकद देणारा जो ईश्वर त्याच्या प्रती अगदी मनोमन, खरेपणाने श्रद्धा भाव कवीने जपलेला लक्षात येतो.
मानव सेवा करता करता माधव सेवा म्हणजे कृष्ण सेवा/ कृष्णाची भक्ती ही केली.मानवसेवा हीच माधवसेवा म्हणजे ईशसेवा ही भगवान श्री सत्यसाईबाबांची सुप्रसिद्ध शिकवण कवीने आचरणात आणली आहे.पण महत्वाचे म्हणजे हे करताना मनाला विरक्तीची भावना मात्र जाणवली नाही.माणूस म्हणून जगण्याची ही प्राथमिक जाणीव कवीने कसोशीने पाळली. रुग्ण सेवा करताना जरी कधी काही निराशा जनक प्रसंग उद्भवले असले तरीही त्यापासून दूर होण्याचा विचार चुकून सुद्धा कवीच्या मनात आलेला नाही. त्या क्षेत्रापासून/ त्या व्यवसायापासून विरक्ती घेण्याचा विचार कधीच मनात आलेला नाही. विरक्ती या शब्दावरील श्लेषही अतिशय सुंदर . आध्यात्मिक विरक्ती व व्यावसायिक विरक्ती असे हे दोन अर्थ अतिशय चपखलपणे येथे कवीने मांडलेले आहेत. त्यातील भावार्थाची सखोलता मनाला स्पर्शून उरणारी. व्यावहारिक पातळीवरील जीवन जगण्याचा आटोकाट व प्रामाणिक प्रयत्न कवीने केला आहे हे सहजपणे लक्षात येते.मानवतेला कर्म मानल्यामुळे त्या प्रतीचे कर्तव्य निभावताना कुठल्याही प्रकारची वेगळी तोशीस स्वतः ला लागत आहे अशी भावना कधीही कवीच्या मनात उद्भवलेली नाही. मानवतेचे कर्म हा कवीच्या जीवनाचा धर्म बनला.
“भुकेजल्या पाहुनी भरविला मम मुखीचा घास” या चरणातील “भुकेजल्या” या शब्दावरील श्लेष अतिशय मार्मिक व मर्मभेदी आहे. भुकेजला म्हणजे केवळ अन्नाच्या दृष्टीने नव्हे तर जो गरजवंत आहे, जो गरजू आहे ,ज्याला कुठल्या तरी प्रकारची भूक आहे तो भुकेजला असा व्यापक अर्थ येथे अभिप्रेत असावा असे वाटते. या ठिकाणी वैद्यकीय व्यवसायातील सेवेची ज्याला गरज आहे तो भुकेजला.. अशा व्यक्तिला सेवा तर दिलीच पण वेळ प्रसंगी स्वतःच्या मुखातील घासही भरवला. “मुखातील घास “या शब्द योजनेतील श्लेष ही अतिशय समर्पक आहे व विलक्षणही आहे. लौकिक अर्थाने “मुखीचा घास” म्हणजे कुणा गरजवंताला /भुकेल्या व्यक्तिला खायला देणे. असे करताना कदाचित देणाऱ्याला स्वतःच्या तोंडचा घास काढून भुकेल्या व्यक्तिला द्यावा लागेल.
येथे या बरोबरच दुसरा अर्थ असा की जी वैद्यकीय सेवा रुग्णाला प्रदान करुन कवीने त्या बद्दलचा मोबदला म्हणून अर्थार्जन केले असते व त्याला स्वतःच्या व त्याच्याशी संबंधित इतरेजनांच्या मुखात घास घालता आला असता तो त्याने बाजूला सारला/ त्यागला म्हणजे मोफत रुग्णसेवा देली.
या दुसऱ्या कडव्यात ही वर निर्देश केलेले श्लेष अलंकार उत्तम. भक्ती, विरक्ती आणि तोशीस,घास मध्ये यमक छान साधले आहे.
मानवसेवा,माधवसेवा मधील “मा”चा अनुप्रास लक्षवेधी आहे.साध्या , सोप्या व सुयोग्य साहित्यिक अलंकारांच्या वापरातून कवीने त्याच्या मनातली भावना अतिशय उच्च प्रतीवर नेऊन ठेवलेली आहे.
निज आत्म्याचे दर्शन मजला सकलांच्या अंतरी
परमात्म्याची जाण काही नाही मजला जरी
सकल जनांच्या नेत्री मोद बघण्याचा ध्यास
अन्य काही आशा नाही रुचली मन्मनास
तिसरे कडवे म्हणजे आचरणातली व आचरणाची परिसीमा ठरेल अशी.कवीने ही भावना स्पष्ट पणे विशद / व्यक्त केलेली जाणवते. स्वतःच्या आत्म्याचे जो खरतर अदृश्य आहे पण त्याची जाण आहे आणि जो प्रत्येकाला प्रिय आहे त्याचे दर्शन कवीला सगळ्यांच्या अंतरी झाले. सगळ्यांच्यात त्याने स्वतःला पाहिले . स्वतःचा आत्मा प्रत्येकाला सर्वात जास्त प्रिय असतो.त्या विषयीची भावना /आसक्ती वेगळीच असते.तो भाव, तसे प्रेम इतरांच्या आत्म्यात पाहणे हे खरं तर दुरापास्त.. सर्व साधारणतः कुणी तो विचार ही करणार नाही.परंतु कवीने मात्र जाणीवपूर्वक तो विचार केला व प्रत्यक्षात आणण्यासाठी जीवाचे रान केले.अर्थात स्वतः कवी व इतरेजन यांच्यात भेदभाव केला नाही.स्वत:ला स्वतः साठी जे अपेक्षित असते तोच भाव आजूबाजूच्या , संपर्कात आलेल्या लोकांसाठी ठेवला असा भावार्थ. इतरांच्या अस्तित्वाशी, त्यांच्या भाव भावनांशी अतिशय प्रामाणिक पणे तो समरस होऊन गेलेला आहे.हे सर्व घडताना कवी मान्य करतो की त्याला परमात्म्याची /ईश्वराची जाण जराही नाही. म्हणजे ईश्वराविषयी /त्याच्या अस्तित्वाविषयी त्याला ज्ञान नाही हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा कवीने बाळगला आहे /दर्शवला आहे.परोपकारी वागण्याने इतरांना आनंद दिल्याने परमात्मा प्राप्त होतो ,मोक्ष मिळतो अशी जन सामान्यांची समजूत असते.प्रत्यक्षात असे होते का, परमात्मा खरंच अस्तित्वात आहे का याची जाणीव कवीला नाही . अर्थात कवीने अशा प्रकारचा कुठला मोह मनात बाळगला नाही.स्वत:चा लाभ ही कल्पना ही कवीच्या हृदयात नाही.केवळ सद्भाव व विवेकी विचारांना प्राधान्य देणे हे कवीने महत्वाचे मानले आहे.सर्वांच्या डोळ्यात आनंद बघणे ,सर्वांना सुखी बघणे हाच एक ध्यास कवीच्या मनाने घेतलेला आहे .इतर कसलीही आशा नाही .धन, संपत्ती, पैसा अडका, कीर्ती, प्रसिद्धी त्याच्या मनाला रुचलेली नाही .त्यांची आस नाही.केवळ या साऱ्या गोष्टींकडे पाहून कवीने रुग्णसेवेचे व्रत आचरले नाही.स्वत:च्या कृतीने दुसऱ्या च्या डोळ्यात आनंद पाहणे हा सर्वश्रेष्ठ आनंद आहे अशी कवीची मनोधारणा आहे.आयुष्यभर जतन केलेले तत्वज्ञान कवीने अंत:करणापासून आचरणात आणले आहे.विचाराला आचाराची जोड दिली आहे. “निज आत्म्याचे दर्शन मजला संकलांच्या अंतरी” हा चरण वाचताना श्री शंकराचार्यांनी विशद केलेला अद्वैतवाद प्रकर्षाने आठवतो.मी व समोरची व्यक्ती ही मीच अशी भावना/भूमिका कवीने निरंतर मनात जाणीवपूर्वक जपलेली आहे.व महत्वाचे म्हणजे तसेच आचरण ही कायम केले आहे.ते ही कुठल्याही प्रकारची स्वार्थ भावना मनात न ठेवता!! तसेच दुसरा श्लेषात्मक अर्थ आत्मा व परमात्मा ही एकच आहेत. त्यांच्या अस्तित्वाचा अद्वैत भाव कवीने जाणला आहे.म्हणून कवी स्पष्ट करतो की त्याला परमात्म्याची कुठल्याही प्रकारे जाण जराही नाही.कारण कवीने स्वतःचा आत्मा परिपूर्ण परिपक्व पध्दतीने जाणला आहे.त्या विषयी कसलाही, कुठलाही संदेह अगदी कणभर सुध्दा त्याच्या मनात नाही.त्यामुळे आत्म्याला जे योग्य वाटते,पटते ते कवी मनापासून करतो आहे.त्या आत्म्याला दुसऱ्याच्या डोळ्यातील आनंद पहाण्यात आनंद/मोद होत असल्याने त्याच्या वागण्यात बदल होत नाही.स्वत:च्या आनंदाच्या शोधात व तो प्राप्त करण्यात कवी मनापासून प्रयत्न करत आहे.असे वागताना साहजिकच दुसऱ्या आत्म्याला/परमात्म्याला (पर -दुसरा)ही आनंद लाभणार याची कवीला खात्री आहे.इतरे जनांना आनंद देताना आत्म्याला परमोच्च आनंद मिळणार हे कवी जाणून आहे.
या तिसऱ्या व अंतिम कडव्यात योजलेले श्लेष,यमक अलंकार अतिशय परिणाम कारक आहेत.कवितेतील भावनेला वाचकांपर्यंत समर्थ पणे पोहचवितात.
माणूस या संकल्पनेशी बांधिलकी जपत कवीने आयुष्यात आपला मार्ग कसा अनुसरला व त्यानुसार निरंतर मार्गक्रमणा केली हे या कवितेत सांगितले आहे. स्वतःच्या जगण्याबद्दलचे व त्याविषयीच्या दृष्टिकोनाचे स्वरूप साध्या ,सुलभ पण तरीही परिणामकारक शब्दात कवीने व्यक्त केले आहे. जगण्याचा आशावाद आणि आदर्शवाद जपताना कवीने स्वतः एक आदर्श घालून दिला आहे असे वाटते, नव्हे खात्री पटते.अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्ती/माणूस जर खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगला तर साऱ्या मानव जातीचे कल्याण/ हित व तदनुषंगिक संपूर्ण समाजाचे कल्याण होईल हे निर्विवाद. डॉक्टर श्रोत्री यांच्यासारख्या वैद्यकीय व्यावसायिक व्यक्तीने कर्म करताना त्यातील धर्म भाव सश्रद्ध भावनेने कसा जगावा/जपावा याचा वस्तुपाठ घालून दिला आहे.वैद्यकीय व्यावसायिक व्यक्ती, जागरूक कवी मन व या दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम या कवितेत आपल्याला दिसून येतो..
जगण्याचा परिपूर्ण पाठ देणारी व आयुष्याला दिशा देणारी अशी ही कविता आहे. ही सर्व स्तरावर नक्कीच पोहोचली पाहिजे असे वाटते.
मला येथे आवर्जून एक निरीक्षण/मत नोंदवायचे आहे.रसग्रहणासाठी जेव्हा ही कविता पहिल्यांदा वाचली तेव्हा साधी, सोपी वाटली.तेव्हा यात एवढा खोल व गहन अर्थ सामावलेला आहे हे लक्षात आले नाही.परंतु जसं जसं रसग्रहण लिहायला सुरुवात केली तेव्हा यात मांडलेला जीवनाचा /जीवन विषयक दृष्टीकोनाचा पैस ध्यानात आला..वरवर साधी वाटणारी ही कविता तिच्या अंतरंगात शिरल्यावर किती प्रांजळ, सुसंगत, सुसंवादी, सुसंस्कृत विचार धारा उलगडून दाखविणारी आहे हे लक्षात आले.ही जाणीव या कवितेचे बलस्थान आहे हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.चांगल्या/उत्तम काव्याचे हे यश आहे हे निश्चित.. अर्थात याचे सर्व श्रेय कवीला!!
© सुश्री नीलिमा खरे
१४-६-२०२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈