प्रा. भारती जोगी
काव्यानंद
☆ शतजन्म शोधतांना – (नाट्यपद) – स्वा. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆
संगीत नाटकांच्या वैभवशाली परंपरेत सुवर्णाक्षरांनी कोरलेलं नाव म्हणजे सावरकरांनी, मा. दीनानाथ मंगेशकर यांच्यासाठी लिहिलेली अजरामर नाट्यकृती “ संन्यस्त खड्ग ! “ १८ सप्टेंबर १९३१ या दिवशी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. आता शतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे याची!
या नाट्यकृतीतल्या… वैश्विक अनुभूती आणि एका वेगळ्याच विरहानुभूतीचा स्पर्श लाभलेल्या, भैरवी रागातल्या अवीट आणि अमीट सुरांची झालर असलेल्या एका नाट्य पदाचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. खरंतर सावरकरांच्या भावना, कल्पना आणि विचारांचं… उदात्त, उन्नत आकाश दोन बोटांच्या चिमटीत धरणं, सामावणं शक्यच नाही. पण तरीही हे शिवधनुष्य… काही क्षणांपुरतं का असेना… पेलून बघणार आहे…
नाट्यपद…
शत जन्म शोधितांना। शत आर्ति व्यर्थ झाल्या।
शत सूर्य मालिकांच्या। दीपावली विझाल्या |
*
तेव्हा पडे प्रियासी| क्षण एक आज गांठी |
सुख साधना युगांची| सिद्धीस अंती गाठी।
*
हा हाय जो न जाई| मिठी घालू मी उठोनी |
क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी |
हे नाटक गौतम बुद्धांच्या काळाशी संबंधित आहे. बुद्धांच्या सांगण्यावरुन ‘शाक्य’ सेनापती विक्रमसिंह आणि शाक्य जनता, शस्त्र त्याग करून संन्यास घेतात. काही काळ जातो. दरम्यान विक्रमाचा मुलगा वल्लभ सुलोचना नावाच्या युवतीशी प्रेमविवाह करतो. लग्नाला वर्ष उलटल्यानंतर वल्लभ आणि सुलोचना यांच्या मिलनाचा / भेटीचा योग येतो. आणि… तो बहुप्रतिक्षित मधुर मिलनाचा क्षण येतो… पण हाय रे दैव!
त्याचवेळी, कोसल देशाचा राजा… विद्युतगर्भ याने आक्रमण केल्याची वार्ता येते आणि शाक्य राष्ट्राला वाचवण्यासाठी, वल्लभालाही पाचारण केले जाते. कपिलवस्तुचा पाडाव टळावा म्हणून संन्यस्त खड्गाला आवाहन केले जाते. वल्लभही मग संन्यास धर्माचा संन्यास घेत… युद्धात उतरतो. म्हणून नाटकाचं नाव.. “संन्यस्त खड्ग!!”
मिलनाच्या क्षणीच झालेली ताटातूट, त्यामुळे सुलोचनेच्या मनाची झालेली अवस्था, विरह वेदनेचे, हतोत्साहित, विकल, असहाय असे मनोभाव… सगळ्याच… विभाव, अनुभाव आणि संचारी भावांसह, रस निष्पत्ती पर्यंत पोहोचविणारं हे नाट्यपद!!
सुलोचना आपल्या प्रिय सखीला… नलिनीला, वल्लभाच्या ऐनवेळी असं निघून जाण्याने, तिच्या मनात उठलेलं भावनांचं वादळ, विचारांचा कल्लोळ… कथन करते आहे…. ते शब्दांकन म्हणजे हे पद!
सुलोचना अगतिक होते आणि म्हणते… असा पती लाभावा म्हणून मी शत जन्म शोधत राहिले गं! त्यासाठी मी शत-शत/अगणित, आरती केल्या. परमेश्वराच्या आळवण्या केल्या. तो भेटावा म्हणून शतजन्म वाट पाहिली. पण सखी, बघ ना, काय झालं…
‘शत आर्ति व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या! ‘
… या ओळींमध्ये शब्द.. शत सूर्य मालिका…. सावरकरांचं विश्वाच्या भव्यतेचं आकर्षण आणि विराटतेची ओढ व्यक्त झाली आहे. उत्तुंग कल्पना शक्ती, आशयातील भावोत्कटता जाणवते आहे. त्यातूनच सुलोचनेची मनोवस्था डोळ्यासमोर येते. ‘ दीपावली विझाल्या ‘ यातला विझाल्या हा अगदी अनवट असा शब्द प्रयोग…. तिच्या मनातले, मिलनोत्सुक आशेचे… शत-शत दीप विझले.. हे सूचित करतो… अगदी प्रत्यक्षानुभूतीच दिलीयं!
पुढील ओळीत सुलोचना म्हणतीये…
‘ तेव्हा पडे प्रियासी, क्षण एक आज गांठी!
सुख साधना युगाची, सिद्धीस अंति गाठी!‘
… या ओळी म्हणजे… यमक आणि श्लेष या दोन्ही अलंकाराच्या गाठभेटीचा उत्तुंग आणि उत्कट क्षण!!
प्रिय मिलनाचा, शत जन्म वाट पाहिलेला क्षण, आज गांठी आला, गाठला एकदाचा, प्राप्त झाला, मिळाला…. असं वाटतंय! आणि मनात एकच विचार येतोयं की… शतजन्माच्या माझ्या साधनेने, सिध्दी गाठली. साधना आणि सिद्धीची गाठ पडली!! प्रिय आराधना, तपस्या, साधना सफल झाली.
गाठी या शब्दांत, यमक आणि श्लेष या भाषालंकारांचा उपयोग करून… या पदातल्या, सुलोचनेच्या भावनांची अगदी… ये हृदयीचे, ते हृदयी…. म्हणजे प्रेक्षक वृंद हृदयी… गाठी घातली अंती… हीच भावना येते.
शेवटच्या दोन ओळी तर… कल्पनेची उत्तुंगता, आशयघनता, शब्दकळा, आणि भावनोत्कटता या सगळ्याचाच परिपूर्ण, परिपक्व, परिणाम म्हणावा !
सुलोचना सांगतीये… अगदी सजीव, सगुण, साकार दर्शन… त्या एका कृतीची साक्षात्कारी अनुभूती देत की…
हा हाय जो न जाई, मिठी घालू मी उठोनी
क्षण तो क्षणात गेला, सखी हातचा सुटोनी!!
… सखी, बघ ना, तो मधुर मिलनाचा क्षण आला… मी उठून माझ्या वल्लभाला मिठी घालायला गेले… आणि… आणि, निमिषार्धात्.. तो क्षण.. क्षणात निसटून गेला गं माझ्या हातून.. अगदी काही कळायच्या आत!… किती ही वैश्विक अनुभूती! आध्यात्मिक किनार लाभलेली! कुठेतरी याच ओळी आठवतात… ‘ पाया पडू गेले तव, पाऊलचि ना दिसे!!! ‘
विरहाची काळ हा प्रदीर्घ भासतो, मात्र मिलनाचा काळ अत्यल्प भासतो.. असंही सुचवलयं ! ‘ क्षण तो क्षणात गेला…. ’ या सावरकरांच्या ओळीचं खरं मोल जाणून, भाषाप्रभू पु. ल. म्हणतात… ‘ या एका ओळीसाठी सावरकरांना नोबेल द्यायला हवं. ‘
हा खरा गौरव आहे त्या… ओळी सुचलेल्या क्षणांचा, सुलोचनेच्या हातून निसटलेल्या त्या हुरहुर लागलेल्या क्षणांचा !
या पदाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे… हे मिलनाच्या आधीचं नाही तर नंतरचं विरह गीत आहे. हे गाणं आपण ऐकतो तेव्हा एक विचित्र हुरहुर लागते. भैरवी रागातल्या सुरांची झालर असलेलं हे नाट्यपद… ‘आर्ति व्यर्थ झाल्या’ मधली आर्तता आणि ‘ क्षण तो क्षणात गेला ’ मधली क्षणभंगुरता स्पष्ट करतं… प्रेक्षकांच्या हाती मात्र खूप काही, मनाच्या गाभाऱ्यात स्थिरावून गेलं… असंच म्हणावसं वाटतं.
© प्रा. भारती जोगी
पुणे.
९४२३९४१०२४.📚📖🖋️
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈