सुश्री नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ व्यथेला शब्द लाभावे… कवयित्री : सुश्री आश्लेषा महाजन ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

☆ कविता ☆ व्यथेला शब्द लाभावे

व्यथेला शब्द लाभावा,

अशी बांधीव ती नाही 

तुला देऊ कशी लाही? 

तशी आटीव ती नाही…

 *

मनाच्या खोल अंधारी 

स्मृतींचा कालवा दाटे 

तमा पिंजून एखादा 

दिठीला काजवा भेटे…

 *

क्षणाला लख्ख बिल्लोरी 

उजेडा, अर्थ दे ना तू 

धुनीसाठी हवी ऊर्जा,

असे अंतस्थ हा हेतू…

 *

नको वरपांग काहीही,

उरातिल आर्त उसळू दे 

मनाच्या मंथनापोटी 

खरा उद्गार मिसळू दे…

 *

व्यथेला शब्द लाभाया,

युगे तिष्ठूनिया पाही

लिपीला भार का व्हावा?

अनर्था, बोल ना काही…

 *

— आश्लेषा महाजन.

Mob. 9860387123

रसग्रहण 

 व्यथेला शब्द लाभावा,

अशी बांधीव ती नाही 

तुला देऊ कशी लाही? 

तशी आटीव ती नाही..

“व्यथेला शब्द लाभावे “हे काव्यशीर्षक वाचताच स्मृतींचा कालपट क्षणाचा कालावधी न सरताच नजरेसमोर तरळतो. प्रत्येकाच्या काळजात व्यथेची कथा नांदतच असते. या व्यथेला बोल, शब्द लाभावेत व ती तिच्या परिमाणासकट परिणामांना व्यक्त करणारी असावी असा आंतरिक घोष कानी निदादतो. व्यथेची भावना तशी सार्वत्रिकच आहे. प्रत्येक जण कधी ना कधीतरी तिला सामोरा गेलेला असतो. व तो दाहक अनुभव, ती अनुभूती माणसाच्या काळजाला निरंतर छळत राहते. साहजिकच कवितेच्या अंतरंगाकडे हृदय आकृष्ट होते. कवयित्रिच्या शब्दभात्यातले सुयोग्य शब्दबाण आपल्या व्यथेला घायाळ करतील आणि तिचे ते शब्दरूप पाहायला मिळेल अशी सुप्त इच्छा वाचकाच्या मनात मूळ धरू लागते. व्यथेची व्याप्ती व्यक्त करायला शब्द लाभावेत, ते पुरेसे यथार्थ व अर्थपूर्ण असावेत ही भावना कवितेत व्यक्त होताना दिसते. असामान्य वाटणारी प्रत्येकाची व्यथा निराळी! तिचा भार अर्थवाही शब्दांनी वाहून न्यावा ही कामना प्रत्यक्षात येणे सहज सोपे नाही हे वास्तव कविता वाचताना ध्यानात येते. कवयित्री म्हणते व्यथेला शब्द लाभावा, ती अबोल राहू नये, तिने व्यक्त व्हावे, तिला व्यक्त करावे. व्यथा भोगणाऱ्याला ती व्यक्त करण्यासाठी तसेच खुद्द व्यथेलाही शब्द लाभावेत असा अर्थ अभिप्रेत असावा. मनातली ही इच्छा फलद्रूप व्हावी. पण यासाठी तिचे रूप, स्वरूप व्यक्त करण्याजोगे दृष्यमान असायला हवे ना ! तिचे मनात वसत असलेले रुप कल्पनेच्या कुंचल्यातून व शब्दमाध्यमातून व्यक्त करणे वा तिचे वर्णन करणे हे कठीणच! ही व्यथा बांधीव, एकसंध नाही. विस्कळीत, दुभंगलेली, पसरलेली, इत:स्तत: विखुरलेली आहे. जणू काही ती सर्वव्यापी आहे. तिची जमवाजमव करून तिला शब्दरूप देणे गरजेचे आहे. हे आकळले तरी ते प्रत्यक्षात कसे घडवून आणावे, कसे घडावे? व्यथेला शब्दात बांधणे म्हणजे शब्दांकित करणे तसेच “बांधून टाकणे” हाही अर्थ अभिप्रेत असावा. व्यथेला शब्द लाभावा असे जरी वाटत असले तरी तिच्या रूपामुळे तिला तो लाभणार नाही असा काहीसा सूचक निर्देश निदर्शनास येतो. या व्यथेची लाही, तिचा लहानसा कण कसा कुणाला द्यावा?कारण ती आटीव म्हणजे आटलेली, घट्ट झालेली, संपृक्त नाही. अजून ती धगधगती आहे, लाहीसम तडतडणारी आहे, बेचैन करणारी आहे, प्रवाही आहे. नानाविध व्यथा असल्याने तिचे रूप एकसमान नाही.

मनाच्या खोल अंधारी 

स्मृतींचा कालवा दाटे 

तमा पिंजून एखादा 

दिठीला काजवा भेटे…

कुठेही कसेही न सामावणाऱ्या अदृश्य, अथांग अशा मनाच्या आत आत अगदी तळघरात, खोल खोल अंधारात स्मृतींचा कालवा दाटलेला आहे. कालवा या शब्दाचा सुंदर अर्थ मनाला भावतो. मानवनिर्मित प्रवाह म्हणजे कालवा. येथे व्यथेचा प्रवाह हा कालव्यासम आहे हा अर्थ अभिप्रेत आहे. अर्थात ही व्यथा मानवनिर्मित आहे हे लक्षात आणून दिले आहे. तसेच अंतरंगात कालवाकालव करणारा तो कालवा. व्यथेचे मूळ व कूळ, तिची उत्पत्ती व व्याप्ती दर्शवणारा हा शब्द!! व्यथेचा हा काळाकुट्ट तम अंतरंगात व्यापून उरलेला आहे. तो काळोख अगदी पिंजून काढला तर नजरेला एखादा काजवा जो क्षणिक आणि स्वयंप्रकाशी आहे तो कधीतरी भेटतो. येथे “पिंजून काढणे” हा वाक्प्रचार म्हणजे खूप प्रयत्न केल्यावर गवसणे. कवितेतील आशयाला हा एकदम समर्पक आहे. एखादा आशेचा किरण व्यथा भोगताना अथक प्रयत्नाने कधीतरी खुणावतो ही भावना व्यक्त केली आहे. तसेच व्यथा दूर करण्यासाठी स्वतःच्या प्रयत्नांचे महत्त्व सांगितले आहे.

क्षणाला लख्ख बिल्लोरी

उजेडा, अर्थ देना तू 

धुनीसाठी हवी ऊर्जा,

असे अंतस्थ हा हेतू…

काजव्याच्या सानुल्या उजेडाकडे कवयित्री याचना करते आहे की हे उजेडा! त्या विविक्षित क्षणाला लखलखीत बिल्लोरी अर्थ दे. अर्थात त्या अंधारात लाभलेल्या उजेडाने आयुष्याला चमक, झळाळी लाभो. बिल्लोरी या शब्दातून केवळ चमकदार उजेड अंतर्भूत नाही तर तो इंद्रधनु सम सतरंगी असावा अशी भावना व्यक्त केली आहे. या प्रकाशामुळे जगण्याचे अर्थपूर्ण भान येऊ दे, आयुष्याला चांगला मार्ग मिळू दे असा भावार्थ!! आणि हे सर्व गरजेचे आहे कारण ही धुनी पेटती राहावी, यासाठी तिला ऊर्जेची गरज आहे. येथे धुनी ही शरीराची आहे. ती पेटलेली आहे, धगधगती आहे हे लक्षात येते. तसेच जगण्याचा जो यज्ञ, धुनी आहे त्यात समिधा म्हणून अर्पण करण्यासाठी जगण्याचीच ऊर्जा लाभावी. आशेच्या अर्थपूर्ण ऊर्जेचा एखादा तरी किंचितसा स्त्रोत लाभावा अशी मनीषा व्यक्त केली आहे, कारण अंतरंगात स्थित असणारा, नेहमी वसणारा हा आंतरिक हेतू आहे. अंतस्थ म्हणजे आतला, खोल मनाच्या गाभ्यातला हेतू!!जगण्याची इच्छा सोडलेली वा सुटलेली नाही. व्यथेच्या अटळ स्थानाचे भान राखून जीवन आशेच्या किरणावर जगण्याचा प्रयत्न आहे.

नको वरपांग काहीही 

उरातील आर्त उसळू दे 

मनाच्या मंथनापोटी

खरा उद्गार मिसळू दे….

कवयित्रीला कुठले ही काही ही वरवरचे, उथळ, वरपांगी, सकृतदर्शनी आहे असे दिसणारे, खोलवर विचार न करणारे काहीही नकोय. दुसऱ्याच्या व्यथाभावनेला लाभणारे वरवरचे सहानुभूतीपर शब्द ही नकोत. अर्थात व्यथा भोगताना कुणाच्या अर्थहीन निरुपयोगी सहाय्याची अपेक्षा कवयित्रीला नाही. आपल्या वेदनेवर तिला स्वतःच आधार शोधायचा आहे. यासाठी उरातील, काळजातील आर्त भावना उसळून येऊ देत. व्यथा या नेहमी उरात दडलेल्या, दडविलेल्या असतात हे सत्य लक्षात घेतले आहे. त्या उसळून येऊन एक प्रकारे त्यांचा उद्रेक व्हावा व तसे झाल्याने व्यथेच्या भोगातून बाहेर पडण्याची प्रखर व तीव्र जाणीव स्वतःला असल्याशिवाय व झाल्याशिवाय व्यथेपासून सुटका नाही, यावर दुसरा उपाय नाही. मनाचे मंथन यातून सखोल चिंतन अपेक्षित आहे. जीवनात समाधान मिळावे व ते मिळवण्यासाठी व्यथेच्या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळावा. काय करायचे याचे विश्लेषण करून त्यातून निष्कर्ष काढणे हे गरजेचे आहे. असे झाले तर तो खरा अर्थपूर्ण उद्गार लाभेल. उद्गार या शब्दाचा अर्थ अभिव्यक्ती करण्यासाठी योग्य वचन, बोल उक्ती मिळणे हा आहे. या शब्दयोजनेतून मनाच्या मंथनाप्रती मनात असलेली कवयित्रीची तळमळ किती प्रांजळ आहे हे लक्षात येते. ताकदीचा व खरा उद्गार लाभला व मनाच्या मंथनात मिसळला तरच मार्ग मिळेल, मार्ग दिसेल याची खात्री आहे.

व्यथेला शब्द लाभाया 

युगे तिष्ठूनिया पाही 

लिपीला भार का व्हावा?

अनर्था, बोल ना काही…

व्यथेची भावना, तिची तीव्रता व खोली सापेक्ष आहे. तिची जाण संपूर्णपणे होणे सर्वथा अशक्य आहे याचे सजग भान कवयित्रीला आहे. त्यामुळे व्यथा व व्यथेला स्वतःला व्यक्त करण्यासाठी, बोलके होण्यासाठी यथार्थ शब्द लाभावेत अशी अपेक्षा केली आहे. यासाठी व्यथा युगानुयुगे तिष्ठत उभी आहे असे कवियत्रीने म्हटले आहे. यातून कालातीत असलेली व्यथा काळाशी सुसंगतपणे व्यक्त होणे अशक्यप्राय आहे हे कळते. व्यथेला अभिव्यक्त करण्याची घाई न करता योग्य शब्द-भाव-रसनिष्पत्ती होईपर्यंत थांबायची तयारी आहे. अगदी युगानुयुगे वाट पाहायची तयारी आहे. वाट पाहत राहून ही, तिष्ठत असूनही ते शब्द, ते बोल मिळू शकत नाहीत. “तिष्ठत” शब्दातून आतुरतेने बराच काळ वाट पाहणे हे जाणवून दिले आहे. लिपीला म्हणजे लिखाणाच्या सूत्रबद्ध पद्धतीला, अक्षरांना व्यथेचा भार होतोय. अर्थात ती अक्षरेही असमर्थ ठरत आहेत व्यथा व्यक्त करण्यासाठी !कवितेतील आशय अगदी खोलवरपणे लक्षात येतो व मनाला भिडतो ही. तसेच लिपीने का व कशासाठी व्यथेचा भार वाहायचा असा मूलभूत प्रश्न पडला आहे. अशा परिस्थितीत कवयित्री मनात व जीवनात भरून राहिलेल्या अनर्थालाच काही बोलायची विनंती करते आहे. लिपी तर बोलत नाही, बोलू शकत नाही तर अनर्था आता तूच बोल असे अतिशयोक्तीपूर्ण मागणे कवयित्रीने केले आहे.

व्यथेची सार्वत्रिक भावना व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द लाभणे अत्यंत अवघड आहे कारण व्यथा ही भावना समजून घ्यायची आहे, तिचे दृश्यरूप दृष्टीस पडत नाही. अत्यंत संवेदनशील मनाचा आविष्कार या कवितेत जाणवतो. उचित, वेचक व वेधक शब्दांचा समर्पक प्रयोग, भावनेचा स्तर कळावा म्हणून योजलेले विविध साहित्यिक अलंकार कवितेतील आशयाला पूरक व पुष्टी देणारे आहेत. व्यथेला शब्द लाभावा, मनाचा खोल अंधार अशी अनेकानेक चेतनागुणोक्तीची उदाहरणे या कवितेत सुंदर रीतीने मांडली आहेत. त्यांना चेतना प्रदान करून त्यांचे व्यक्ती स्वरूप वर्णिले आहे. काळोखाला पिंजणे मधील अतिशयोक्ती अलंकार, स्मृतींचा कालवा मधील रूपक तसेच कवितेला असलेली लयबद्धता असे अनेक काव्यविशेष मनाला मोहविणारे आहेत. हे वियद्गङ्गा वृत्त आहे. कवितेचा “काव्यप्रकार” म्हणून मोल वृद्धिंगत करणारे आहेत. कवयित्रीने कवितेतून व्यथेला शब्द लाभावा असे म्हणताना तिला बोलके केले आहे. तिच्या मूकपणात तिचे अस्तित्व प्रकर्षाने लक्षात येते.

मनाचा वेध घेणारी ही कविता आहे. वाचक जेव्हा आपल्या मनाची नाळ कवितेशी जुळवतो तेव्हा ती सार्वत्रिक होते आणि यातच त्या कवितेचे महत्त्व अधोरेखित केले जाते. अशी ही नितांत सुंदर भावपूर्ण कविता मनात रेंगाळत राहील व निरंतर स्मरणात राहील या बद्दल दुमत होणे नाही.

© सुश्री नीलिमा खरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments