सुश्री दीप्ती कुलकर्णी
क्षण सृजनाचे
☆ जीवनपट… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆
माझे वडील संस्कृत चे माध्यमिक शिक्षक व गाढे अभ्यासक होते. जुन्या अकरावीचे संस्कृत व पी.टी. घेत. करवीर पीठात त्यांनी उत्तम अध्ययन केले. त्यांना पीठाचे शंकराचार्य पद स्वीकारा म्हणत होते पण घरच्या जबाबदाऱ्या मुळे त्यांनी ते स्वीकारले नाही. वृद्धत्वात ते थोडे विकलांग झाले नि ते पाहून मला ही कविता स्फुरली.
– दीप्ती कुलकर्णी
☆ जीवनपट… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆
जीवनाच्या या पटावरी
कितीतरी प्यादी येती जाती
माझे,माझे म्हणती सारे
फोलता हि नच ,कुणा ही ठावे
क्षणभंगुरता कळेल का परी
उरते अंती मृत्तिका जरी
यात्रिक सारे सममार्गावरी
नियतीचीही मिरासदारी
नियतीचीही सर्व खेळणी
कुणा छत्र,कुणी अनवाणी
श्वासासंगे श्वास येई रे
दुजा न कोणी सांगाती
जीवनाच्या या पटावरी
कितीतरी प्यादी येती जाती ||
© सुश्री दीप्ति कुलकर्णी
हैदराबाद
मो.नं. ९५५२४४८४६१
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈