सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
क्षण सृजनाचे
☆💦 भाऊबीज 💦 ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆
कुठे गेला अवचित
भाऊ राया दूरवर…
राहिली ना भाऊबीज
असे मनी हुरहुर…|
कसे आता सांगू कुणा
दुःख मनातले माझ्या…
विस्कटल्या वाटा साऱ्या
माहेरच्या तुझ्याविना…|
परतीच्या तुझ्या वाटा
अशा – कशा हरवल्या….
आशेच्या साऱ्याच लाटा
विरुनिया आता गेल्या…|
नको जाऊ विसरून
बहिण -भावाचे नाते….
तुझे – माझे बालपण
अजूनही खुणावते…|
– शुभदा भास्कर कुलकर्णी
माझा पाठचा भाऊ शशिधर माझ्यापेक्षा आठवर्षाने लहान असल्याने त्याला लहानपणी सांभाळून घेणं ही मला माझी जबाबदारी वाटायची. आम्ही मोठे होत गेलो तसा तो माझा मित्र, खेळातला सवंगडी होत गेला. आम्हा दोघांच नात दृढ, घट्ट होत गेलं. माझ्या लग्नानंतर, त्याच्याही लग्नानंतर आमच नातं थोडही सैल झालं नाही. आमची सुख-दु:ख आम्ही वाटून घेतली. आधार दिला. मी त्यावेळी भाऊबीजेला इथे नव्हते. दुसरे दिवशी येणार,असल्याने सर्व भावंडानी माझ्याकडे नंतर भाऊबीज करायची ठरले. पण… शशीच्या अचानक जाण्याने मनं सुन्न, बधिरस झालं. भाऊबीज राहून गेल्याची हुरहूर आजही आहे. ते माझं दु:ख मी त्यावेळी नकळत कागदावर मोकळ करायचा प्रयत्न केला. अन् थोडं हलकं वाटलं. आज भाऊबीज, माझ्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचल्या असतील का?.. 😢
© शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे.३८.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈