श्री सुनील देशपांडे
📚 क्षण सृजनाचा 📚
☆ काळरात्र… ☆ श्री सुनील देशपांडे ☆
कोयनानगर – ज्या भूमीवर माझं बालपण, शालेय शिक्षण झालं ती स्वप्ननगरी १९६७ मध्ये ११ डिसेंबर या दिवशी भूमिगत (!) झाली. त्याच्या आठवणी अजूनही मधून मधून डोके वर काढतात आणि कधी कधी काव्यरूपातही उमटतात.
☆ काळरात्र … ☆ श्री सुनील देशपांडे ☆
☆
ती काळरात्र होती, भूमीतुनी उसळली.
तोडून काळजाचा, लचका, निघून गेली
ती काळरात्र होती, फाडून भूमी आली.
गाडून स्वप्ननगरी, कोठे निघून गेली ?
*
झोपेत साखरेच्या, देऊन वेदनांना,
क्रूर हसत होती, ती काळरात्र होती.
कित्येक चांदण्यांना, विझवून ती निमाली,
की कृष्णविवर कोठे, शोधून लुप्त झाली?
*
कित्येक भक्त होते, देवास प्यार झाले.
ती काळरात्र मग का, देवाकडून आली?
कित्येक संत गुरुजन, मंत्रून भूमि गेले.
तप पुण्य त्या जनांचे, उधळून ती परतली.
*
कित्येक वर्ष सरले, तो काळ निघून गेला.
पण काळजावरी ती, दुश्चिन्ह कोरूनी गेली.
☆
— श्री सुनील देशपांडे
© श्री सुनील देशपांडे
पुणे, मो – 9657709640 ईमेल : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈