श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ क्षण सृजनाचे : जन्म – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

मी जन्म १- कविता लिहिली, त्या गोष्टीला दहा वर्षं होऊन गेली.  सालातील शेवटच्या आकड्यांची उलटापालट झाली. १९७६ साल. या वर्षी खरोखरच गुलबकावलीचं फूल माझ्या उदरात वाढत होतं. प्रेशस बेबी म्हणून जसं खूप कौतुक होतं, तसंच देखभाल, काळजीही खूप होती. डॉ. श्रीदेवी पाटील या त्या काळातल्या निष्णात आणि लौकिकसंपन्न डॉक्टर होत्या. त्यांच्या दवाखान्यात महिना-दीड महिना बेड रेस्टसाठी रहावं लागलं होतं. मला तसं काहीच होत नव्हतं, पण तसं डॉक्टरांना म्हंटलं की त्या म्हणायच्या, `तुला काही होतय म्हणून नव्हे, काही होऊ नये म्हणून दवाखान्यात ठेवलय.’ या काळात मला कथांचे अनेक विषय मिळाले आणि त्यानंतर काही काळाने मी कथालेखन सुरू केलं.

अखेर प्रसूतीचा काळ जवळ आला. मी दिवसभर कळा देत होते. पण फारशी काही प्रगती नव्हती. संध्याकाळची पाच- साडे पाचची वेळ असेल. मला कळा येण्याचं इंजक्शन दिलं आणि लेबर टेबलवर घेतलं. दोन कळातलं अंतर कमी होत होतं, पण म्हणावी तशी प्रगती नव्हती.

एवढ्यात हॉस्पिटलच्या दारात एक रिक्षा उभी राहिली. त्यातून दोन महिला उतरल्या. एकीचा चेहरा वेदनेने पिळवटलेला. दुसरी तिला धरून आता आणत होती. ती बहुधा तिची आई असावी.

तिला पाहिल्याबरोबर नर्सनी मला लेबर टेबलवरून खाली उतरवलं आणि तिला टेबलवर घेतलं. आकांती वेदनेनं ती किंचाळली. एकदा… दोनदा… आणि नर्सच्या हातात तिचं बाळ होतं. मी विस्मित होऊन तिच्याकडे पाहत राहिले. कळा द्यायचीच विसरून गेले. नंतर तिला रूममध्ये हलवलं आणि मला टेबलवर घेतलं. मी कळा देत होते पण डोळ्यापुढे मात्र तिची प्रसूती होती. मनात शब्द उतरत होते-

 

पापणीवर उतरणारा गडद अंधार

प्रकाशाची भिरभिरणारी वलयं

त्यात विरघळून गेलेली.

झुलत्या पुलावरची अरुंद निसरडी वाट

अजूनही सरत नाही.

दोन्ही बाजूच्या खोल डोहात पसरलीय

गूढ, भयाण आकारहीन सावली.

पायातलं सारं बळ ओसरलय..

प्राण कासावीस झालेत, श्वास कोंडलेत.

दूरच्या सुरक्षित निवांत किनार्‍यावरून वळलेल्या नजरा कुजबुजताहेत,

इतकं का अवघड आहे सारं?

थोडं सोसायला हवं…सोसायलाच हवं.

एवढा बाऊ कशासाठी?

काहीच कळत नाही… उमजत नाही. अपराध्यासारखं वाटतय.

पण अंगातलं सारं त्राण सरलय.

आणि इतक्यात…

मायेने ओलावलेला गहिरा स्वर

अंगभर थरथरत जातो संजीवनी होऊन.

सारी वाटचाल सरलीय… आता फक्त वितीचं अंतर

एवढी एकच कळ… एवढंच… थोडा धीर धर…

मरगळलेल्या प्राणात पेटतात पुन्हा चैतन्याचे पलिते

जीवाच्या कराराने घेतली जाते एक साक्षात्कारी झेप

आणि त्याच सुरक्षित किनार्‍यावर टेकतात पाय

छातीशी बिलगलेल्या नन्ह्या फरिश्त्याचं वरदान घेऊन.

तिने बाळाला जन्म दिला होता. मी कवितेला. असा त्यावेळी माझ्या बाळाच्या जन्माआधी माझ्या `जन्म’ कवितेचा जन्म झाला होता.

 

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Shekhhar Palakhe

इतक्या नाजुक सुंदर भावना खुपच सुंदर रीतीने शब्दबध्द झाल्या आहेत!!! त्या अवस्थेत सुद्धा हे असं सृजनशील मन जागृत ठेवणं ही एक कला आहे!!! तुकल्पनाशकिती ला सलाम आणि सादर प्रणाम!!!