डॉ. निशिकांत श्रोत्री
📚 क्षण सृजनाचा 📚
☆ धुंद वाऱ्या… ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆
स्मृतीरंजन संगीत रचनेचे
साधारणपणे १९८६ च्या दरम्यानची घटना असावी. दूरदर्शनवर शब्दांच्या पलीकडले या कार्यक्रमात विनय देवरुखकर यांनी संगीतबद्ध केलेल्या काही गीतांचा कार्यक्रम होता. पुढे काही दिवसांनी त्यातील एका गीताच्या बाबतीत काही समस्या निर्माण झाल्यामुळे ते गीत विनय वापरू शकत नव्हता; तथापि त्याला त्या गीताला दिलेली संगीत रचना अतिशय आवडली होती. म्हणून त्याने मला त्याच चालीवर एक नवीन गीत लिहून द्यायचे आवाहन केले. त्या चालीतून प्रेमवेड्या प्रेयसीची आर्तता जाणवत होती. नकळतच क्षणार्धात माझ्याकडून पुढील ‘धुंद वाऱ्या’ हे गीत प्रसवले गेले.
☆ धुंद वाऱ्या ☆
धुंद वाऱ्या थांब येथे दूर तू जाऊ नको
गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||ध्रु||
*
गुपित जपले मन्मनी जे ते उगा पसरू नको
लाजरीचा रंग गाली तू नभ देऊ नको
दाटले माझ्या मनी साऱ्या जगा सांगू नको
गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||१||
*
भाव माझे तूच नेता मी सख्या सांगू कशी
शीळ होता बोल माझे मी मुकी राहू कशी
भाववेडी स्वप्नगंधी छेड तू काढू नको
गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||२||
*
अंतरी दाटून माझ्या तू तुला विसरून जा
विरून येथे तूच माझे स्वप्नही होऊन जा
आण माझ्या प्रीतिची रे अंतरी मोडू नको
गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||३||
☆
हे गीत माझ्या मनाची पिल्ले या काव्यसंग्रहात समाविष्ट होते. अत्यंत गुणी गायक आणि संगीतकार चंद्रशेखर गाडगीळ याच्या वाचण्यात हे गीत आले. त्याला ते इतके आवडले की त्याने ते सूरबद्ध केले आणि मला घरी बोलावून ते ऐकविले. ती स्वररचना माझ्या अगदी हृदयात जाऊन पोहोचली.
पुढे आकाशवाणीवर हेच गीत जानेवारी महिन्याच्या स्वरचित्रे साठी निवडले गेले आणि त्याला स्वरबद्ध करण्यासाठी विलास आडकर यांच्याकडे ते सोपविले गेले. अतिशय सुरेल आणि भावपूर्ण अशा चालीत त्यांनी ते माधुरी सुतवणे यांच्याकडून गाऊन घेतले. खूप गाजले हे गीत.
तरीही या गीताची चंद्रशेखर गाडगीळ याने दिलेली चाल माझ्या मनातून जात नव्हती. एवढी उत्कृष्ट स्वररचना अशीच वाया जावी हे मनाला पटत नव्हते. अशा घालमेलीतच पुलाखालून बरेच पाणी गेले. अखेरीस, साधारण पंधरा वर्षांनंतर चंद्रशेखर गाडगीळ याच्या स्वररचनेवर मी आणखी एक गीत लिहायचे ठरवले.
गीत लिहून झाले आणि आकाशवाणीवर माझ्या काही गीतांना स्वरबद्ध केल्यानंतर माझ्या खूप जवळ आलेले आकाशवाणीचे आणि एकेकाळी ‘प्रभात’ फिल्म कंपनीत असलेले ज्येष्ठ संगीतकार सुरेश देवळे घरी आले. आल्या आल्या त्यांनी विचारले, ‘डॉक्टर, एखादे नवीन गीत?’
नुकतीच प्रसविलेले गीत मी त्यांना वाचून दाखविले:
☆ चांदण्याच्या राजसा रे ☆
*
चांदण्याच्या राजसा रे वाकुल्या दावू नको
प्रीत सजता आज माझी दृष्ट तू लावू नको ||ध्रु||
*
मन्मथाने धुंद केले कुच मनी मी बावरी
स्पर्श ओठांनाच होता हरवले मी अंतरी
भान जाता हरपुनीया जग तू आणू नको
प्रीत सजता आज माझी दृष्ट तू लावू नको ||१||
*
रोम रोमा जागवी तो स्पर्श मी विसरू कशी
चिंब झालेल्या मनाची प्रीत मी लपवू कशी
प्रेमवेडी आर्त होता संयमा शिकवू नको
प्रीत सजता आज माझी दृष्ट तू लावू नको ||२||
*
रात्र सजवीता अनंगे लाजुनी राहू कशी
धुंद झाला देह माझा अंतरी वेडीपिशी
आज माझ्या राजसाची पापणी लववू नको
प्रीत सजता आज माझी दृष्ट तू लावू नको ||३||
☆
‘छान आहे डॉक्टर, द्या मला; मी याला चाल देणार आहे, ’ त्यांनी माझ्या हातातून गीताचा कागद ओढूनच घेतला.
मी त्यांना ते गीत रचण्यामागील माझी भूमिका सांगितली, ‘चंद्रशेखरच्या चालीसाठी रचले आहे मी हे गीत. ’
‘त्याकरता तुम्ही आणखी एक गीत बनवा हो, ’ देवळे काही मागे हटायला तयार नव्हते.
अखेरीस चाल देण्यासाठी ते गीत ते घेऊन गेलेच. पुढे त्यांनी ते गीत आकाशवाणीवर गाऊन देखील घेतले.
मला मात्र स्वस्थ वाटेना. चंद्रशेखरची चाल काही मला स्वस्थ बसू देईना. दुसऱ्याच दिवशी मी पुन्हा हातात लेखणी घेतली नी त्या स्वररचनेच्या मीटरमध्ये नव्याने गीत रचले:
☆ रात्र तू विझवू नको ☆
*
पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रा क्षितिजावरी उतरू नको
अंतरी बेभान मी रे रात्र तू विझवू नको ||ध्रु||
*
चांदण्याने आज तुझिया रंग मी भरले इथे
उर्मीच्या मम कुंचल्याने प्रेम हे साकारले
धुंदिचा बेरंग माझ्या करुनिया जाऊ नको
अंतरी बेभान मी रे रात्र तू विझवू नको ||१||
*
आर्त झालेल्या मनातुन सूर हे धुंदावले
छेदुनीया मुग्धतेला अंबरी झेपावले
प्रेम भरलेल्या सुरांना बेसुरी गाऊ नको
अंतरी बेभान मी रे रात्र तू विझवू नको ||२||
*
फुलविली मी मुग्ध कलिका रात्र सजवीली नभी
भान हरुनी रातराणी गंध दरवळते जगी
फुलून येता मन्मनी तिज निर्दळी बनवू नको
अंतरी बेभान मी रे रात्र तू विझवू नको ||३||
☆
आणि आता जगदीश कुलकर्णी यांनी या गीतावर उत्कृष्ट स्वरसाज चढविला आहे.
मी आता मात्र विचार करतोय, माझ्या ज्येष्ठ स्नेही आणि मार्गदर्शिका कै. संजीवनी मराठे यांच्या ‘नकळता निघून जा’ या गीताला जर चार संगीत दिग्दर्शकांनी स्वरसाज चढवला आहे तर माझ्या गीतांना देखील तसे झाले तर बिघडले कोठे? उलट हा तर माझा मानच आहे.
तरीही मला चंद्रशेखर गाडगीळची स्वररचना वाया नाही जाऊ द्यायची. बघू कोणच्या स्वररचनेचा कोणत्या गीतासाठी कसा योग येतो आहे ते!
☆
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम. डी. , डी. जी. ओ.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈