सौ. उज्ज्वला केळकर
चित्रकाव्य
– कविता स्मरण… – शांता शेल्के ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆
☆
☆
मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले
जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले
जखम जिवाची हलके हलके भरून यावी
तसे फिकटले, फिकट रंग ते मग ओसरले
☆
घेरित आल्या काळोखाच्या वत्सल छाया
दुःखाचीही अशी लागते अनवट माया
आक्रसताना जग भवतीचे इवले झाले
इवले झाले आणिक मजला घेरित आले
☆
मी दुःखाच्या कुपीत आता मिटते आहे
एक विखारी सुगंध त्याचा लुटते आहे
सुखदुःखाच्या मधली विरता सीमारेषा
गाठ काळजातली अचानक सुटते आहे
☆
जाणिव विरते तरीही उरते अतीत काही
तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही
आतुरवाणी धडधड दाबून ह्रुदयामधली
श्वास आवरून मन कसलीशी चाहुल घेई
☆
हलके हलके उतरत जाते श्वासांची लय
आता नसते भय कसले वा कसला संशय
सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा
मी माझ्यातून सुटते, होते पूर्ण निराशय……
☆
रचना : शांता शेळके
प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈