सुश्री वर्षा बालगोपाल
चित्रकाव्य
☆ प्रति बिंब स्वत:च्या… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
दंड थोपटूनी असे का आज
वृक्ष वृक्षापुढे उभे ठाकले
दंडच त्यांना ठोकला पाहिजे
का माणसासम वागू लागले॥
☆
डोळे उघडून पहावे जरा
हे हात हातात घेत आहेत
डोळेझाक तू करू नकोस रे
तुला छान धडा देत आहेत॥
☆
छत्र तुझ्या घरावरचे डोले
सावली करण्या उन्हेही झेले
छत्र जणू वडिलधार्ंयांचे हे
डोई हात फिरवत राहिले॥
☆
कर निश्चय झाडे लावण्याचा
प्राणवायू प्रमाण जपण्याचा
कर चैतन्याचे फिरती पाठी
घ्यावा मंत्र निरोगी आयुष्याचा॥
☆
प्रति आयुष्याच्या व्हावे कृतज्ञ
सांजेस अंतरंगी डोकवावे
प्रति बिंब स्वत:च्या सत्कर्माचे
त्यात स्वच्छ नी सुंदर दिसावे॥
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈