चित्रकाव्य
आजी-आजोबा… (चित्र एकच… काव्ये तीन) ☆ श्री प्रमोद जोशी आणि श्री प्रमोद वामन वर्तक ☆
श्री प्रमोद जोशी
[1] – पावलं अद्वैताची…
☆
लांबी,खोली माहीत नाही,
तुझी साथ पुरेल !
अश्वत्थाम्याचीही जखम,
फुंकरीने भरेल !
☆
पाठ मोडेल वाट्टेल तेव्हा,
गाठ कशी सुटेल?
फांदी मोडेल एखादवेळ,
देठ कसा तुटेल?
☆
“रिअर व्ह्यू मिरर”मधे,
साहचर्यच दिसतंय !
पुढचं दृष्यच अज्ञाताचं,
वर्तमाना हसतंय !
☆
गारव्यासाठी पाण्यात पाय,
टाकू एकाचवेळी !
कुणी आधी,कुणी नंतर,
अशी नकोय खेळी !
☆
यौवनाहून खरं प्रेम,
मुरू लागलंय आता !
जरा नजरेआड होता,
झुरू लागलंय आता !
☆
हिशेब संपत आला तरी,
देवाणघेवाण चालू !
गाठ पुन्हा घट्ट करतात,
शेला आणि शालू !
☆
धूप-कापूर राख होताच,
निखारेही विझोत !
चारी पावलं अद्वैताची,
एका वेळीच निघोत !
☆
पुढचे जन्म दोघांचे ना,
दोघानाही ठाऊक !
पाण्यात शिरण्याआधीच पावलं,
का होतात गं भावूक !
☆
कवी : प्रमोद जोशी. देवगड.
मो. 9423513604
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्री प्रमोद वामन वर्तक
[2] -भूल पाण्याची ! …
☆
पाहून हिरवे पाणी नदीचे संथ
भूल पडे आम्हां म्हाताऱ्यांना,
होता स्पर्श हळूवार पाण्याचा
विरून जातील सर्व यातना !
☆
देत घेत आधार एकमेकांना
उतरू एक एक नदीची पायरी,
या वयात चल पुन्हा अनभवू
सारी बालपणीची मजा न्यारी !
☆
वेडे जरी म्हणाले जन आपणांस
पाठ फिरवूनी तसेच पुढे जाऊ,
साथ सोबत असता एकमेकांची
का करावा उगाच त्यांचा बाऊ ?
☆
कवी : प्रमोद वामन वर्तक,
आणि ही आणखी एक — [3] -आनंदी श्वास !
☆
झाले पोहून मनसोक्त
अथांग भवसागरी,
आस ती दोघां लागली
सवे जाण्या पैलतीरी !
☆
साथ दिलीस मजला
अडल्या नडल्या वेळी,
भिन्न शरीरे आपली
पण एक पडे सावली !
☆
मागे वळून नाही बघणे
तोडू सारे माया पाश,
चल सोबतीने घेऊया
अखेरचे आनंदी श्वास !
अखेरचे आनंदी श्वास !!
☆
© प्रमोद वामन वर्तक
दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈