सुश्री वर्षा बालगोपाल
चित्रकाव्य
☆ जन्मांतरीचे साथी…
☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
किती भाग्य थोर लिहिले आपल्या माथी
तू आणि मी, आपण जन्मांतरीचे साथी॥
☆
किती हिवाळे उन्हाळे अन पावसाळे
पाहिले आपण आनंदाने सोबतीने
दिस कष्टाचे जरी केल्या सुखाच्या राती
तू आणि मी, आपण जन्मांतरीचे साथी॥
☆
एक झालो आपण सुखाच्या या संसारी
हसत लावल्या दु:खा सुखाच्या झालरी
दोन वाती असूनही एक झाली ज्योती
तू आणि मी, आपण जन्मांतरीचे साथी॥
☆
मुले नातवांसवे सजे संसाररथ
प्रेमजिव्हाळ्याच्या हिरवळीचा हा पथ
दूरदेशी सारे पण, हात तुझा हाती
तू आणि मी, आपण जन्मांतरीचे साथी॥
☆
चल जाऊ मंदिरी प्रार्थूया ईश्वराला
मुलांना यश किर्ती जोगवा पदराला
विनात्रास जिणे त्यांचे ही आम्हा पावती
तू आणि मी, आपण जन्मांतरीचे साथी॥
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈