चित्रकाव्य
– भंगारवाला… –
☆ श्री सुनीत मुळे ☆
(हायफाय हॉलबाहेर बेपर्वा श्रीमंतीनं फेकलेल्या अर्ध्या रित्या पाण्याच्या बाटल्या भंगारवाला झाडांच्या मुळात ओतत होता. एक संवेदनशील फोटो आणि काव्य रचना…)
☆
वरवर बघता वाटत असेल,
याचा धंदा केवळ भंगार !
उपेक्षेच्या जगण्यालाही,
याने केला आहे शृंगार !
☆
वजन कमी करण्यासाठी,
पाणी ओततो मुळावर !
आतमधे सजली माणसं,
अतृप्तीच्या सुळावर !
☆
भंगारवाला नसेल तर,
बकाल होईल सगळं जग !
ए.सी.ची तर वृत्ती अशीच,
आत गारवा,बाहेर धग !
☆
ओझं कमी करण्यासाठी,
ओतलं नाही वाटेल तिथं !
त्याचा सद् भाव ओतत गेला,
तहानलेली झाडं जिथं !
☆
सावलीवरती हक्क सांगत,
झाडाजवळ थांबत नाही !
माझ्यामुळेच जगलंय असं,
स्वतःलाही सांगत नाही !
☆
“निष्काम कर्म ” गीतेमधलं,
कळलेला हा पार्थ आहे !
“जीवन”देऊन,भंगार घ्यायचं,
केवढा उंच स्वार्थ आहे !
☆
पाणी विकत घ्यायचं आणि,
अर्ध पिऊन फेकून द्यायचं !
कृतज्ञता / कृतघ्नता,
याचं भान केव्हा कसं यायचं?
☆
डिग्रीपेक्षा नेहमीच तर,
दृष्टी हवी अशी साक्षर !
भंगारवाला अंतर्धान नि,
अवतीर्ण होतो ईश्वर !
☆
कवी : अज्ञात
प्रस्तुती : सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈