सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– “चल झुल्यावर झुलू जरासे…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
चल झुल्यावर झुलू जरासे
काही मनातले बोलू जरासे
झुलता झोका इकडून तिकडे
एकमेकांना सावरू जरासे
☆
विश्वास ठेवुनी दोर फांदीवर
निर्धास्तपणे राहू जरासे
शाल धुक्याची ओढून देही
गुरफटून तयात जाऊ जरासे
☆
झुलता झोका मागे पुढती
मागोव्यातच हरवू जरासे
भविष्यातील स्वप्नांनाही
रंग मनातील भरू जरासे
☆
आजूबाजूचे हिरवेपणही
मनात आपण पेरू जरासे
ती हिरवाई तशीच रुजवून
आयुष्याला भिडू जरासे
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈