श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
– जीवनचक्र … – ☆श्री आशिष बिवलकर ☆
☆
बुडापासून अस्तित्व केले नष्ट,
पुन्हा उगवण्याची जिद्द आहे |
येणाऱ्या प्रत्येक आव्हानांशी
लढायला पुन्हा एकदा सिद्ध आहे |
*
कित्येकदा छाटले कापले,
तरी जगण्याची आशा आहे |
शून्यातून उभे राहण्याची,
देहबोलीत भाषा आहे |
*
उन वारा पाऊस थंडी
झेलायाची हिम्मत आहे |
जमिनीत घट्ट रोवणाऱ्या
मुळांची किंमत आहे |
*
ज्यांनी काटले छाटले,
भविष्यात त्यांनाही छाया आहे |
निसर्गत: परोपकार अंगी,
प्रत्येक प्राणीमात्रासाठी माया आहे |
*
सोसलेल्या घावांच्या वेदना,
फक्त अंतरालाच ठाऊक आहे |
पुन्हा नव्याने अंकुरताना,
मन थोडेसे भावुक आहे |
*
मातीत उगवायचे, मातीत मिळायचे
जीवनाच्या चक्राची रीत आहे |
प्रत्येक क्षण चैतन्याने जगायाचा,
हेच जीवनाचे गीत आहे |
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈