श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
– करावी कीव …पण कोणाची? – ☆श्री आशिष बिवलकर ☆
☆
घडली घटना,
गेले जीव |
ढिसाळ व्यवस्थेची,
करावी कीव |
*
मोडले संसार,
फुटल्या बांगड्या |
पुसली कुंकू,
विस्कटल्या घड्या |
*
तुटली आधाराची काठी,
हरवले पित्याचे छत्र |
होत्याच नव्हतं झालं,
नियतीचा घाव विचित्र |
*
पाच लाखाची मदत,
गेल्या जीवाची किंमत |
बजबजल्या भ्रष्टाचाराची,
वाढलीय हिम्मत |
*
अधिकारी मोकाट,
मालक निर्धास्त |
चौकशीच्या फेऱ्या,
लाल फीत सुस्त |
*
निगरगट्ट नेत्यांची वरात,
आरोप प्रत्यारोपांच्या फैरी |
सामान्य माणसांच्या,
जीवावर उठलेले हेच वैरी |
*
फॅक्टरी इन्स्पेक्टर,
प्रदूषण मंडळ |
सगळेच खाणारे,
एकमेकांना बळ |
*
दोन दिवसाची बातमी,
मिडियाला खुराक |
पुन्हा दुसरी घटना,
कुठे बसेना चपराक |
*
कुटुंबाला दुःख,
कोसळले आभाळ |
अकाली तो गेला,
कुटुंबाची पुढे आबाळ |
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈