सुश्री नीलांबरी शिर्के
☆ पागोळ्यातून गळता पाणी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के☆
☆
पाऊस कोसळे येथे
पाऊस कोसळे तेथे
छपरावर पाऊस पडता
पगोळीतून धार वहाते
*
पागोळ्यातून गळता पाणी
वाटतसे अभंग वाणी
खळखळ वाहत जाता
जलप्रवाही जाती मिळोनी
*
जल प्रवाह वाढत जाता
नदी नाल्या येतसे पूर
पालख्या जमती जैश्या
जरी एरवी असती दूर
*
जल ओढ्यानदीतले ते
सागरास जाऊन मिळते
वारीत पालख्या जमता
मग भक्तीचा सागर बनते
*
या सागराची गोड गाज
विठ्ठल पांडुरंगाचा गजर
वैकुंठरूपी पंढरीत आता
सारा उसळेल रत्नाकर
*
इथे शब्दांचीच रत्ने
नामगजरी अभंगात
भक्तिधन ज्याचे त्याचे
नाही इथे जात पात – –
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈