सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
(१)
वाखरीतले रिंगण
उद्या विठ्ठल दर्शन
पांडुरंग भेटीलागी
कासावीस झाले मन
*
वारीतून चालताना
टाळ चिपळ्याची धून
आता लागलीसे आस
कधी होईल दर्शन
*
माय चंद्रभागा स्नान
होई शिणवटा दूर
भूमिवरचे हे वैकुंठ
अजी हेच पंढरपूर
*
आधी कळस दर्शन
मग पुंडलीक पायरी
देवळात प्रवेशता
उभी माऊली सामोरी
*
स्पर्श होत माऊलीचा
सारा शीण गेला दुरी
डोळाभरून पहाते
पांडुरंगा परोपरी
*
भेट घेता विठ्ठलाची
रखुमाई बोलावते
ठेवी डोईवर हात
मन भरूनिया येते
*
शांत शांत होता मन
सरे सारी धाकधूक
परतूनी कधी येणे
पांडुरंगाला ठाऊक
*
विठ्ठल विठ्ठल
कवयित्री : नीलांबरी शिर्के
(२)
*
पेपरात पाहताना
भक्त रिंगण सोहळा
गेले वारीमधे मन
पाहते तो याची डोळा
*
टि व्ही लावता घरात
दिंड्या पताकांची दाटी
सावळ्याची घडो वाटे
याच जन्मी डोळा भेटी
*
मनी भेटीलागी आस
विठू हाच नित ध्यास
वारीमधे मिसळून
वाटे झेलावा पाऊस
*
पावसात चिंब व्हावे
भक्तिरसात नहावे
रिंगणाच्या सोहळ्यात
देहभान विसरावे
*
विसरावे वाटे सारे
संसाराचे व्यापताप
परतूनी आल्यावर
मन होई शांत शांत
*
व्याप सारे सांभाळाया
माऊलीच देते बळ
विठ्ठल, विठ्ठल मुखी नाम
माझे जगण्याचे बळ
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के