सुश्री नीलांबरी शिर्के
☆ तगमग… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
नभ अंधारून येता
काळजात धडधड
पिकलेल सारं सोनं
आहे शेतात उघड
*
शेतामघे राबताना
सुखस्वप्नांना पेरलं
डोळ्यापुढे तेच स्वप्न
प्रत्यक्षात साकारलं
*
आता करूनी मळणी
नेणे घरामघे रास
याच्यापुढे ओठामधे
येई सुखाचाच घास
*
अचानक अंधारून
येता अवकाळी ढग
नको नको कोसळाया
जीवांमाजी तगमग
*
डोळ्यापुढे गुरं ढोरं
आईबाप आणि पोर
काळजीचे ढग सारे
भवताली धरी फेर
*
राबतसे पोटासाठी
धान्य जगा पुरवितो
स्वार्थ परमार्थ साधत
तोच जगणे जगतो
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈