चित्रकाव्य
माडाचे मनोगत… श्री प्रमोद जोशी ☆
(देवगडचे कवी श्री प्रमोद जोशी यांच्या बागेत ५०.. ६० वर्षे वयाचा माड आहे. त्या माडावर सुतार पक्षांनी १-२ नाही, तर १७-१८ भोके पाडली आहेत. तरीही अजून माड नारळ देतोच आहे— त्या माडाचा फोटो आणि जोशींनी त्या माडावर स्वतः केलेली “ माडाचे मनोगत “ ही कविता — (हा फोटो कृपया मोठा करून पहावा).
☆
कणा पोखरला तरी,
अजूनही आहे ताठ!
जगण्याची जिद्द मोठी,
जरी मरणाशी गाठ!
☆
माझ्या कण्याकण्यामधे,
किती रहातात पक्षी!
जणू बासरी वाटावी,
अशी काढलेली नक्षी!
☆
त्यांच्या टोचायच्या चोचा,
मला पाडताना भोक!
त्यांची पहायचा कला,
माझा आवरून शोक!
☆
वारा येतो तेव्हा वाटे,
त्यांचे कोसळेल घर!
सरावाचा झाला आहे,
त्यांच्या टोचण्याचा स्वर!
☆
जाता गाठाया आकाश,
नाही जमीन सोडली!
पूल करून देहाचा,
माती-आकाश जोडली!
☆
वय जाणवते आता,
माझा नाही भरवसा!
जगण्याच्या कौलातून,
मरणाचा कवडसा!
☆
घरं सोडा सांगताना,
करकरतो मी मऊ!
पाखरानो शोधा आता,
माझा तरूणसा भाऊ!
☆
सावळांचा भारी भार,
आता मला पेलवेना!
तरी निरोपाचा शब्द,
काही केल्या बोलवेना!
☆
पंख फुटलेले नाही,
नाही डोळे उघडले!
अशा पिल्लासाठी माझे,
प्राण देहात अडले!
☆
जन्म माहेरीचा सरे,
आता चाललो सासरी!
भोकं म्हणू नका देहा,
मी त्या कान्ह्याची बासरी!
☆
© श्री प्रमोद जोशी
देवगड.
9423513604
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈