सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– ना निगराणी,नाही पाणी – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
अष्टमीचा चंद्र नभी
शोभा आणीतसे नभा
तशी तु ग चंद्रभागा
पंढरीची जणू गंगा—-
☆
तुझ्या पावन स्नानाने
वारकरी प्रफुल्लित
विठ्ठल विठ्ठल म्हणत
जाती विठू मंदिरात—-
☆
माऊलीच्या पायी डोई
होई सार्थक जन्माचे
वाळवंटी फडकती
झेंडे वारकरी स्वमानाचे—–
☆
चंद्रभागा होई तृप्त
वारकऱ्यांच्या भेटीने
तिचे अंगण भरले
विठू भक्तांच्या दाटीने—–
☆
दाटीतून घुमतसे
साऱ्या संतांचाही घोष
विठु ,ज्ञाना, तुका नामा
तिला दिसे आसपास
त्याच्या नाम दर्शनाने
होय तीज समाधान
मैलोनमैल वहायाचे
क्षणी विसरते श्रम—–
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈