श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
सांज झाली सख्या रे...
श्री आशिष बिवलकर ☆
☆
सांज झाली सख्या रे,
दिनकर गेला अस्तासी |
कातरवेळ छळते मज,
घोर जडला हृदयासी |
*
दिल्या घेतल्या वचन सुमनांची,
झालीत आता निर्माल्य |
वाटेवर एकटाच सोडून गेलास,
हृदयी दिलेस शल्य |
*
तुच घातलीस हृदयास फुंकर,
ओवाळून टाकला रे जीव तुझ्यावर |
घाव देऊन दूर गेलास,
व्रण चिघळतात रोज सांजवातेवर |
*
पक्षीही परतले पुन्हा घरट्यात,
किलबिलाटही नकोसा तो मना |
भयाण शांततेची ओढ लागली,
कुणास सांगू रे विरह वेदना |
*
धावून येतोय तिमिर अंगावर,
किर्रर्र आवाज घुमतोय भोवती |
सहवास नकोय कुणाचा,
एकांत हाच वाटतोय खरा सोबती |
*
सुगंध दरवळतोय रातराणीचा,
नाही उरलीय गंधातली गोडी |
अर्ध्यावर साथ का रे सोडलीस,
सुटता सुटत नाही रे कोडी |
*
नक्षत्रांची रास नभांगणात,
खिजवतोय मज शुक्रतारा |
प्रीत आपली विरून गेली,
लोचनातून वाहतेय धारा |
*
दोर कापलेत परतीचे,
माझ्याशीच मी लढतेय |
उतरला साजशृंगार सारा,
तुझ्याचसाठी रे सख्या झुरतेय |
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈