सुश्री उषा जनार्दन ढगे
चित्रकाव्य
☆ रंगवीन मी
☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆
रंगवीन मी
आज पुन्हां एकदा मनावर
नक्षीदार रांगोळी रेखीन मी
आणखी एकदा नशीब नवं
भाळावर कोरून घेईन मी..
पुन्हां एकदा हरविलेल्या स्वप्नांना
आज नयनांत साठवेन मी
हसर्या भाकिताच्या स्वागतासाठी
सुखःदुःखाच्या पथारी मागे टाकीन मी..
निर्भेळ स्वच्छ जळाचा
तो एक अदृश्य रंग असेन मी
स्वैर भावनांशी समरस होऊन
गुंगून हरवून जाईन मी..
पलीकडच्या अंधाराचाही
तो एक अंदाज घेईन मी
सावलीत माझ्या मलाच
परि शोधीत राहीन मी..
पुन्हां एकदा नव्याने
नवीन स्वप्ने रंगवीन मी
नवीन स्वप्ने रंगवीन मी..!
© सुश्री उषा जनार्दन ढगे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈