श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
पुण्यात्मा…
श्री आशिष बिवलकर ☆
☆
अखेर संपली ती झुंज,
तुटली श्वासांची माळ |
घाला घालून गेला,
निर्दयी झाला काळ |
*
निष्प्राण देह उरला मागे,
तो ही झाला चितेच्या स्वाधीन |
हातात काहीच नसते आपल्या,
मनुष्य जन्म असतोच पराधीन |
*
आठवणींच्या शिवाय,
काही ना उरले आता मागे |
मागे वळून पाहता,
स्मृती पटलावर गुंतले धागे |
*
दुःखाचे कोसळले आभाळ,
आसवांचा बांध फुटला |
हळ हळ करत व्यक्त,
जो तो आज आतून तुटला |
*
देवाची सेवा करता करता,
देवाच्या घरी तो गेला |
मोक्ष प्राप्ती प्रारब्ध जीवाचे,
जन्म मृत्यूचा फेरा पूर्ण केला |
*
सुन्न झाले आज मन,
सुन्न झाली ही मती |
ईश्वरा प्रार्थना एकच,
दे पुण्यात्म्यास सद्गती |
☆
(श्री महागणपती देवस्थान बदलापूरचे पुजारी आणि आमचे सहकारी प्रशांत पांडे यांचे काल दुःखद निधन झाले.. अतिशय सुस्वभावाने त्यांनी माणस जोडली.. All in one कोणतही काम असलं तरी स्वतःहून मदतीला पुढे येणं हा त्याचा स्वभाव…कधीही भरून निघणारी हानी झाली..त्यांना माझ्याकडून ही शब्दरूपी श्रद्धांजली..ॐ शांती…शांती…शांती 🙏)
☆
© श्री आशिष बिवलकर
दि. 04 मार्च 2025
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈