सुश्री उषा जनार्दन ढगे
चित्रकाव्य
– हसरा नाचरा – ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆
☆
फिरूनी वर्षानी बरसतो श्रावण
सर्वत्र विलसे भक्तिमय वातावरण
मृद्गंध शीतल मृदुल पुष्पपरिमळ
हिरवळ उल्हासित भासे चिरतरुण..
☆
पानांतून वर्षिते थेंबांची सांकळ
ओसंडित स्वच्छंद दिगंत रमणीय
अमिषे भारावते मन होतसे निस्पंद
गर्भार धरती स्फूर्त नि सारेच मृण्मय
☆
घनमेघांच्या पंक्ती विहरती अंबरी
मधूनशी डोकावी कमान इंद्रधनूची
झुळझुळतो निर्झर तृप्त वनराजी
बीजांकुरास ओढ पृथेच्या वात्सल्याची..
☆
रुणझुणत भक्तीसरींत येतो श्रावण
फुलवून पिसारा नाचे मोदित मोर
हिरवाईत विसावते सृष्टी दिसे मनोहर
चिंबणार्या मनास खुणवितो चितचोर..
☆
फिरत रहाते कालचक्र असे हे भूवरी
बागडते अद्भुत सृष्टी वसुंधरेवरी
पाहून गमते सारे सार्थ साकल्यापरी
विस्मये भासते कधी तटस्थ चित्रापरी..!
☆
चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे
© सुश्री उषा जनार्दन ढगे
ठाणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈