सुश्री उषा जनार्दन ढगे
कवितेचा उत्सव
☆ – ज्ञानज्योती सावित्री – ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆
शिक्षित महिला महाराष्ट्राची
महिलांची धीट मुक्तीदात्री
कर्तृत्ववान सेविका कवयित्री
उज्वल ज्ञानज्योती फुले सावित्री…
तूच तनया तन्मया विलक्षण
मायावी आदिशक्तीचेच स्वरुप
नारी जुलमाच्या प्रतिकारार्थ
ओलांडलेस उंबर्याबाहेरचे माप…
स्वत्वासाठी सन्मानासाठी झटली
हक्कासाठी लढणारी तू मानिनी
नसशीस कुणी तू दुर्बल अनुगामी
थोर अन्विता सबल नारी स्वाभिमानी…
डावलूनी अन्याया सार्थ हिम्मतीने
स्वःप्राणाने न्याय-तुतारी फुंकली
असूरी अज्ञान ध्वांतास पळवाया
धीराने जिद्दीने उंच मशाल धरिली…
पिडीती कर्मठ उच्चवर्ण सनातनी
परि सावित्रीबाई नाही डगमगली
या पाखंडी समाजकंटकांसमोरी
जागृत राहूनी मान नाही तुकविली..!
© सुश्री उषा जनार्दन ढगे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈