सुश्री तृप्ती कुलकर्णी

🎞️ चित्रपटावर बोलू काही 🎞️

☆ दि बुक थिफ … दिग्दर्शक – ब्रायन पर्सिवल ☆ परिक्षण – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

युद्धातल्या खऱ्या रम्यकथा…

मार्कस झुसॅक यांच्या कादंबरीवर आधारित

दिग्दर्शक – ब्रायन पर्सिवल

सध्या आपण रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाच्या बातम्या ऐकतो आहोत, पाहतो आहोत आणि या युद्धाचे इतर देशांवर होणारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, गंभीर-किरकोळ स्वरूपाचे परिणामदेखील पहात आहोत, अनुभवत आहोत. यावरून माझ्या एकच लक्षात आलं की आता युद्ध ही संकल्पना कुठल्याही ठराविक भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा सामाजिक सीमेपुरती मर्यादित राहिलेली नाही. तर ती पृथ्वीच्या कुठल्याही एका बिंदूपासून सुरू होऊन हळूहळू संपूर्ण पृथ्वीला कह्यात घेते… आणि एका विषयापासून सुरू होऊन इतर अनेक विषयांनाही कवेत घेते. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ या तीनही काळांचा संबंध युद्ध या संकल्पनेशी घट्ट रुजलेला आहे. त्यामुळे आधी घडून गेलेल्या काही युद्धांच्या कथा जरी अत्यंत विनाशकारी असल्या तरी आजही पुन्हा पुन्हा आठवल्या जातात. त्यावर पुन्हा पुन्हा चर्चा घडत राहते. आणि हळूहळू या कथा निरनिराळ्या साहित्यकृतींचं ही आकर्षण ठरतात.

दुसरं महायुद्ध हे आजही अनेकदा चर्चिलं जातं, आणि त्याबरोबरच चर्चिला जातो तो या युद्धाचं केंद्रस्थान असलेला, अनेकांच्या दृष्टीने खलनायक ठरलेला हिटलर. याच हिटलरच्या कारकिर्दीतील एका युद्धघटनेवर आधारित ‘द बुक थीफ‘ हा चित्रपट नुकताच पाहण्यात आला. आणि हा चित्रपट पाहताना आणि पाहून झाल्यावरही कित्येक काळ यातले अनेक प्रसंग माझ्या मनात रुंजी घालत राहिले.

युद्धस्य कथा रम्या: असं जे म्हटलं जातं ते का म्हटलं जात असावं… संपूर्ण मानवी सृष्टीचा संहार करणाऱ्या युद्धामध्ये रम्य असं काय असतं, असा माझा प्रश्र्न… केवळ पराकोटीचं साहस, वीरता, आपल्या धर्माचे रक्षण, देशप्रेम दर्शवण्याची एक संधी, की कुणा एकाची अर्तक्य साम्राज्यलालसा. यापलीकडे युद्ध नक्की काय सांगतं… जे सर्वसामान्य लोक या सगळ्यापासून पूर्णपणे अलिप्त असतात आणि आपलं मानवी जीवन शांततेनं, प्रेमानं जगू इच्छितात त्या लोकांच्या मनात या युद्धकाळामध्ये नक्की काय विचार मंथन चालू असतं? ते या युद्धाकडे नक्की कोणत्या दृष्टीने बघत असतात? आपल्या देशाविरुद्ध लढण्यासाठी उभ्या असणाऱ्या देशाप्रती, तिथल्या समाजातल्या असंख्य लोकांप्रती त्यांच्या नक्की काय भावना असतात? हे युद्ध झाल्यानंतर कोणीही जिंकलं किंवा कोणीही हरलं तरी या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने त्यांच्या जगण्यात काय फरक पडतो? आणि या युद्धांच्या घटनांचं जे वार्तांकन केलं जातं… युद्धभूमीवरील वार्तांकनाने देशन् देश पेटून उठलाय असं सांगितलं जातं, ते खरंच तसं असतं का… या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थोड्याफार प्रमाणात का होईना हा चित्रपट देतो. भले मग चित्रपट या माध्यमातलं कलात्मक आणि काल्पनिक स्वातंत्र्य या दोन गोष्टी जरी गृहीत धरल्या तरीदेखील या चित्रपटात युद्धकाळात दिसणारे सर्वसामान्यांचे जीवन आणि त्यांच्या माणूस म्हणून एकमेकांप्रती असलेल्या भावना या अतिशय प्रामाणिक आणि खऱ्या वाटतात. आणि म्हणूनच यातल्या अनेक घटना माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला महत्त्वाच्या वाटतात आणि मनावर खोल परिणाम करतात.

मुळात या चित्रपटाची कथा आपल्याला सांगतो तो निवेदक साक्षात मृत्यू आहे. आणि आपण करत असलेल्या कामाबद्दल तो अतिशय तटस्थपणे सांगत आहे. आपण आजपर्यंत कितीतरी खलनायकांसाठी अतिशय आज्ञाधारकपणे काम केलंय हे तो खुलेपणाने मान्य करतो. पण त्याच वेळेस एका सर्वसामान्य घरातल्या सर्वसामान्य लहान मुलीच्या तो प्रेमात पडलाय याचं त्यालाही वाटणारं आश्चर्य तो व्यक्त करतो.

आणि मग सुरु होते कहाणी लीझल नावाच्या मुलीची. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक व्यथांचा जन्मच हिटलरच्या काळ्या कारकीर्दीत होऊ लागतो. आपले सख्खे नातेवाईक गमावण्यापासून ते आपण ज्यांच्याकडे आश्रित म्हणून राहायला आलो आहोत त्यांनाही गमावण्यापर्यंत अनेक प्रसंग घडत जातात. पण असं असलं तरीही ही कहाणी फक्त मृत्यूच सांगत नाही, तर या प्रत्येक मृत्यूमधलं जीवनदेखील आपल्याला सांगते आणि ज्या लीझल नावाच्या मुलीची ही कथा आहे त्या मुलीला अंधारी आणि अधांतरी अवस्थेत हे जीवन सापडतं तरी कुठे? तर ‘पुस्तकांमध्ये’.

आश्चर्यचकित झाला असाल कदाचित; पण तरीही हेच उत्तर आहे. आणि हेच वैशिष्ट्य आहे या चित्रपटाचं. आपल्याला वाचता येत नाही हे माहीत असूनसुद्धा ही मुलगी आपल्या भावाच्या मृत्युनंतर त्याच्या कबरीजवळ पडलेलं ‘कबर कशी खोदावी?` हे सांगणारं एक पुस्तक चोरते. ते पुस्तक चोरताना ते नक्की कशाचं आहे आणि आपल्याला त्याचा काय उपयोग आहे यापैकी कश्शाचाही विचार तिच्या मनात येत नाही. तिच्या दृष्टीने फक्त एकच गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे ते पुस्तक तिच्या भावाच्या कबरीजवळ त्याची कबर खोदताना पडलेलं आहे. आणि त्यामुळेच आपल्या भावाचा एक छोटा फोटो ती त्या पुस्तकात ठेवून देते आणि ते पुस्तक जिवापाड जपते.

पुढे मग ती हे पुस्तक वाचायला कशी शिकते, ते शिकताना तिला काही अडथळे आले तर त्यावर कशी मात करते, हे सगळं पाहणं अतिशय हृद्य आहे. याबरोबरच पुस्तक वाचण्याचा तिला लागलेला लळा हा तिला पुस्तक-चोर बनवतो. पण ही चोरी तिला तिच्या आयुष्यात किती समृद्ध बनवते हे या चित्रपटातून अतिशय उत्तमरित्या मांडलेलं आहे. पुस्तक वाचनाच्या तिच्या वेडामुळेच तिच्या घरी आश्रयासाठी लपून राहिलेला ज्यू तरुण, मॅक्स तिचा घट्ट मित्र बनतो आणि तिने आता वाचनाबरोबर लिहिलं पाहिजे हे आग्रहानं तिला सांगतो. मॅक्स आणि लीझल यांच्यातले प्रसंग मला सर्वांत जास्त भावले…  मग तो हिटलरच्या आईनं त्याला पत्र लिहिण्याच्या काल्पनिक प्रसंगाचा असो किंवा बाहेरचं वातावरण कसंय ते मला तुझ्या शब्दांत सांग असं म्हणल्यावरचा असो, किंवा तिनं बाहेरुन त्याला बर्फ आणून देण्याचा असो, किंवा तळघरात त्यांनी गुप्तपणे ख्रिसमस साजरा करण्याचा असो, किंवा ज्यू लोकांमध्ये शब्द म्हणजे काय हे सांगण्याचा असो… हे प्रसंग अतिशय तरल, काव्यात्मक, उत्कट पण तितकेच खरेही वाटतात.

शिवाय अजून एका प्रसंगाचा तर आवर्जून उल्लेख करायलाच हवा. युद्ध चालू झाल्यावर त्यापासून वाचण्यासाठी सगळेजण एका तळघरात जमलेले असतात आणि तिथे तिला अचानक गोष्ट स्फुरू लागते. ती गोष्टदेखील एका काळ्या रंगाच्या आड लपणाऱ्या भावाची आहे, जो तिच्या बहिणीला भेटत असतो‌. प्रतिकात्मक अशी अत्यंत सुंदर गोष्ट. चित्रपटातील हे सगळे प्रसंग जरी काल्पनिक असले तरी ते अत्यंत खरे वाटतात, कारण प्रतिकूल परिस्थितीत आपल्यातलं  माणूसपण जिवंत ठेवणारे मानवतावादी लोक असं साधं-सोपं, निरलस वागू शकतात किंबहुना वागतात.

लीझल, मॅक्स यांबरोबरच ज्यांच्याकडे हे दोघं आश्रित म्हणून राहत असतात ते हान्स आणि रोझा, लीझलच्या प्रेमात पडलेला तिचा शेजारी मित्र रूडी, त्याचे आई-वडील, नगराध्यक्षाची बायको या सगळ्याच व्यक्तिरेखा अत्यंत जीवन अभिलाषी आणि नात्यांवर विलक्षण प्रेम, विश्वास आणि श्रद्धा असलेल्या आहेत. युद्धकाळात आपापसातल्या अनेक चौकटी विसरून एकमेकांना मदत करण्यासाठी सरसावलेली ही जिवंत माणसं म्हणजेच युद्धातल्या खऱ्या रम्यकथा म्हणाव्यात असं मला वाटतं. आणि म्हणूनच की काय मृत्यूदेखील त्यांच्या नात्यांच्या मोहात अडकलेला आहे.

परीक्षण – ©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

(“जागतिक सिनेमा आणूया मराठीत” या उपक्रमाबद्दल शंकर ब्रम्हे समाज विज्ञान ग्रंथालय,पुणे यांचे विशेष आभार”)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments