श्री उदय गोपीनाथ पोवळे

🎞️ चित्रपटावर बोलू काही 🎞️

☆ मेजर… निर्देशक – शशि किरण टिक्का ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

मेजर संदीप उन्नीकृष्णन

आज दिनांक ६-६-२०२२ ला असा एक सिनेमा बघण्याचा योग आला की तो सिनेमा बघून भूतकाळात घडलेले ते दोन, तीन  दिवस पुन्हा डोळ्यांसमोर आले.

२६-११-२००८ ते २९-११-२००८ ह्या तीन दिवसांत पाकिस्तानमधल्या लष्करे तयबा ह्या इस्लामिस्ट टेररिस्ट ऑर्गनाजेशनच्या दहा अतिरेक्यांनी जवळजवळ १६६ जणांना जीवानिशी मारले होते आणि त्या दिवशी तुकाराम ओंबळे साहेबांमुळे एक अतिरेकी जिवंत पकडला गेला तर बाकीच्या ९ अतिरेकीना मुंबई पोलिसांनी आणि आपल्या NSG कमांडोनी यमसदनास पाठविले होते. जे काही घडले होते आणि ज्यांनी कोणी टीव्ही वर ते पहिले होते, ते कोणीही, कधीही विसरू शकणार नाहीत पण त्या दिवशी ज्यांनी कोणी आपले प्राण पणाला लावून ह्या आपल्या देशासाठी, आपल्या देशातल्या माणसांसाठी आपल्या आयुष्याची आहुती देऊन त्या अतिरेक्यांना मारून शहीद झाले त्यांच्याबद्दल आपल्याला खूप कमी माहिती असते आणि आज आम्ही जो सिनेमा बघितला त्या सिनेमाने आम्हांला आज अशाच एका शहीद झालेल्या आपल्या जवानाची खरी ओळख करून दिली.

अशोकचक्रवीर मेजर संदीप उन्नीकृष्णनवर आलेला सिनेमा,  ” मेजर “. आजपर्यंत आम्ही खूप सिनेमे बघितले. गेले कित्येक वर्षे दर सोमवारी मी आणि रेषा एखादा तरी सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघतोच. आजपर्यंत अनेक हिरो हिरॉइनचे सिनेमे आम्ही बघितले पण आज ” मेजर ” सिनेमा  बघितल्यावर मनापासून आम्हांला दोघांनाही वाटले की ह्या सिनेमाने आज आम्हांला खऱ्या हिरोची ओळख करून दिली. ह्या सिनेमात त्या तीन दिवसांचा आढावा घेण्यात आला असला तरी जास्त फोकस हा मेजर संदीप उन्नीकृष्णनच्या, त्याने जगलेल्या त्याच्या कमी आयुष्याचा आणि त्या दिवशीचा म्हणजेच ताज हॉटेलवर त्या नराधम अतिरेक्यांबरोबर झालेल्या लढाईवर आहे. हो , ती  लढाईच होती. शत्रूने केलेल्या अभ्यासपूर्ण हल्ल्याला आपल्या NSG म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या जवानांनी– ज्यांना ब्लॅक कॅट म्हणून ओळखले जाते त्यांनी— सडेतोडपणे दिलेल्या उत्तराचे ते चित्रण आहे. मेजर संदीप उन्नीकृष्णन हे NSG चे ट्रेनिंग ऑफिसर होते. खरे म्हणजे नियमानुसार ट्रेनिंग देणाऱ्या ऑफिसरने कुठच्याही चढाईवर भाग घ्यायचा नसतो पण मेजर संदीप उन्नीकृष्णन ह्यांनी हट्टाने ह्या मिशनमध्ये नुसता भाग नाही घेतला तर ह्या मिशनमध्ये त्यांनी लीड केले. ” जान दूंगा, देश नही ” म्हणणाऱ्या मेजर संदीप उन्नीकृष्णनच्या खऱ्या आयुष्याची ओळख ह्या सिनेमातून करून दिली ती त्याचा रोल करणाऱ्या अदिवी शेष ह्या तेलगू अभिनेत्याने. त्यानेच ह्या सिनेमाचा स्क्रिनप्लेही लिहिला आहे. डायरेक्टर शशी किरण टिक्का ह्यांनी हा सिनेमा बनवितांना कुठेही तडजोड न करता, जे काही घडले होते तसेच प्रेक्षकांसमोर चांगल्या रितीने मांडले आहे.

ह्या सिनेमाची गोष्ट काय आहे किंवा ह्या सिनेमात कोणी कसे काम केले आहे ह्याबद्दल येथे मला काहीही लिहायचे नाही, कारण तो अनुभव प्रत्यक्ष प्रत्येकांनी घ्यायला हवा.  पण येथे एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते ती म्हणजे सिनेमा बघतांना त्याला मिळालेला लोकांचा प्रतिसाद किती कमी आहे त्याची. पूर्ण सिनेमागृहात आम्ही ६ जणच होतो. त्या खान लोकांच्या सिनेमाला अती प्रतिसाद देणाऱ्या आम्हां भारतीयांना ह्या खऱ्या  हिरोंची ओळख करून घ्यायला उसंत नाही. ह्या सिनेमात त्या ताज हॉटेलवरील हल्ल्याच्या दिवशी आपल्या मीडियाने आपल्या प्रत्येकाच्या चॅनेलचा TRP वाढवण्यासाठी कसा गोंधळ घातला होता आणि ते टीव्हीवर बघून त्याचा फायदा आपला शत्रू कसा घेत होते त्याचे व्यवस्थित चित्रण केले आहे. त्याच मीडियाला ह्या सिनेमाचे प्रमोशन करायला वेळ नाही. खरे म्हणजे असे सिनेमे हे आपल्या सरकारकडून टॅक्स फ्री करून दिले पाहिजेत. प्रत्येक भारतीयाने हा सिनेमा नुसता बघितला नाही पाहिजे, तर आपले सैनिक ह्या आपल्या देशासाठी, आपल्या देशातील लोकांसाठी कसे आपले जीवन समर्पित करतात हे जाणून घेतले पाहिजे. ह्या सिनेमात प्रेक्षकांच्या करमणुकीचा विचार करून गाणी किंवा नाच असे काहीही नाही, आहे ते फक्त मेजर संदीप उन्नीकृष्णनच्या आयुष्याच्या शेवटापर्यंतचे यथार्थ चित्रण.

ह्या लेखाद्वारे मी सगळ्यांना विनंती करतो, आपल्या ह्या रोजच्या धाकधुकीच्या जीवनातून जरा वेळ काढून सिनेमागृहात  जाऊन अशोकचक्र मिळालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन ह्यांच्या जीवनावरील हा सिनेमा जरूर बघावा म्हणजेच त्यांना आपण दिलेली ती आदरांजली ठरेल. हो, सिनेमा बघून झाल्यावर माझ्या हातून नकळत त्यांना एक सॅल्यूट मारला गेला. तुम्हालाही सिनेमा संपल्यावर सॅल्यूट मारावसा वाटला तर लाजू नका. तुमच्याकडूनही त्यांना सॅल्यूट मारला जाईल हयाची मला खात्री आहे.

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

०६-०६- २०२२

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments