श्री आनंदहरी

? आत्मसंवाद ? 

☆ लेखक हा आधी वाचक असावा लागतो…. – भाग 2 ☆ श्री आनंदहरि  

मी :- पहिली कथा किंवा कविता कधी आणि कुठे प्रसिद्ध झाली.

आनंदहरी :-  नोकरीच्या व्यापातून लिहिणे आणि प्रसिद्धीला पाठवणे तसे जमलेच नाही. त्यात स्वभाव भिडस्त त्यामुळे पुढे होऊन स्वतःबद्दल बोलणे, सांगणे, स्वतःला प्रमोट करणे जमायचे नाही, अजूनही जमत नाही. प्रारंभीच्या काळात एक दोन मासिकांना कथा आणि कविता पाठवल्या होत्या पण त्या प्रसिद्ध झाल्या नाहीत. त्यामुळे आपले लेखन अजून प्रसिद्धीयोग्य नाही असे वाटयाचे. नंतरही लिहीत होतो पण ते सारे वहीत असायचे. १९९५ ला सिंधुदुर्ग विभागात बदली झाली. लहान विभाग असल्याने कामाचा ताण कमी होता. वाचन आणि लेखन होऊ लागले. विभागीय मुख्यालय कणकवली येथे असल्याने तेथील आप्पासाहेब पटवर्धन नगरवाचनालयात साहित्यिक कार्यक्रम होत असत त्याला उपस्थित राहू लागलो. त्या दरम्यानच दै. पुढारीची सिंधुदुर्ग आवृत्ती सुरू झाली. शशी सावंत हे आवृत्तीप्रमुख होते. माझे कार्यालयीन सहकारी कवी सुरेश बिले यांच्यामुळे त्यांचा परिचय झाला होता. मी काहीतरी लिहितो हे त्यांना समजले होते. त्यांनी पुढारी आवृत्ती सुरू करतानाच ‘नवांकुर ‘ही साहित्यिक पुरवणी सुरू केली होती. त्यासाठी माझ्या कथा, कविता मागितल्या. ‘ नवांकुर ‘या साहित्यिक पुरवणीतून माझे साहित्य नियमित प्रसिद्ध होऊ लागले. सिंधुदुर्ग येथील साहित्य वर्तुळात नाव परिचित होऊ लागले. लिहिण्याचा उत्साह वाढला. मी नवांकुरमध्ये ‘प्रतिबिंब’ नावाचे सदर लिहीत होतो. ते अनेकांना आवडल्याचे अभिप्राय पुढारीकडे येत होते. गंमतीची गोष्ट म्हणजे नाव परिचित झाले असले तरी मी या नावाने लिहितो हे मोजका मित्रपरिवार वगळता कुणालाच ठाऊक नव्हते. त्यामुळे मला व्यक्तिशः कुणी ओळखत नव्हते.

मी :- मराठी साहित्यात टोपणनाव घेऊन विशिष्ठ साहित्यप्रकार लिहिण्याची एक समृद्ध परंपरा आहे अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर गोविंदाग्रज, केशवकुमार, कुसुमाग्रज, ठणठणपाळ . तुम्ही टोपणनाव का घेतलेत ?

आनंदहरी :- हे सारे दिग्गज प्रातः स्मरणीय, वंदनीय आहेत. माझ्या सुरवातीच्या काही कथा,कविता या नावाने प्रसिद्ध झाल्या होत्या पण त्यादरम्यान नोकरीतील वरिष्ठानी नाराजी दर्शवत नियमावर बोट ठेवत व्यवस्थापकीय संचालकांची पूर्व परवानगी न घेतल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांचा मुद्दा चुकीचा नव्हता. त्या दरम्यान पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या ‘श्रीमत् संजीवनी गाथा ‘ यावर मी प्रदीर्घ लेखमाला लिहावी असे शशी सावंत यांना वाटत होते. त्यांना अडचण सांगितल्यावर, त्यांनी सुचवल्यानुसार टोपण नावाने सर्व लेखन करायचे ठरवले आणि पुढील सर्व लेखन याच नावाने प्रसिद्ध झाले.

सांगण्यासारखी गमतीची गोष्ट म्हणजे नंतर एका कार्यक्रमात तत्कालीन जिल्हाधिकारीं भूषण गगराणी यांनी ‘प्रतिबिंब ‘ या सदरलेखनाचे आणि ज्येष्ठ साहित्यिक कै. प्रा. विद्याधर भागवत यांनी साहित्यलेखनाचे कौतुक केले होते. ते समजताच त्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतःच्या कक्षात सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कौटुंबिक सत्कारही केला.

मी :- तुमच्या नोकरीचा तुम्हांला साहित्यलेखनाच्या दृष्टीने काही उपयोग झाला का ?

आनंदहरी :- निश्चितच झाला. आपला भोवताल हाच आपला प्रेरणास्रोत असतो आणि तोच आपल्या साहित्यात येत असतो. क्षणाक्षणाला आपण अनेक नवनवीन अनुभवांनी आणि अनुभूतीनी संपन्न होत असतो.. तेच आपल्या साहित्यलेखनात  उतरत असते. मला नोकरीत वेगवेगळी व्यक्तिमत्वे जवळून पाहता, अनुभवता आली त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उपयोग झालाच. प्रामुख्याने माझे आयुष्य हे ग्रामीण आणि अर्धनागर भागात गेल्याने तेच भवताल जास्त प्रमाणात साहित्यात आलेले आहे आणि मला वाटते प्रत्येक साहित्यिकाबाबत असेच असते.

मी :- तुम्ही साहित्यलेखनाबरोबर साहित्यिक चळवळीत सक्रिय असता त्यामागे नेमका कोणता विचार आहे ?

आनंदहरी :-  खरेतर आपण कुणाचे तरी बोट धरून या अंगणात चालायला सुरुवात केलेली असते, चालायला शिकलेलो असतो. आपणही नंतर कुणाचे तरी बोट धरून त्याला इथे चालायला शिकवणे, चालताना सोबत करणे हे आपले कर्तव्य आहे असे मला वाटते. ‘जे जे आपणांसी ठावे, ते सकलांशी सांगावे..’

खरे सांगायचे तर मी साहित्यिकांपेक्षा साहित्य-समाज चळवळीतील एक साधा, छोटा कार्यकर्ता आहे असे मला वाटते. साहित्यिक हा समाजाचे मानसिक, वैचारिक नेतृत्व करीत असतो आणि त्याने ते तसे करणे अपेक्षित आहे असे माझे मत आहे. एकटे पुढे जाऊन काय साध्य होणार ?  साहित्यिकाने आपल्यासोबत इतरांनाही सोबत घेऊन जायला हवे.  ‘ काफिला बनता गया’ अशी स्थिती होण्याची वाट न पाहता ‘ काफ़िला ‘ बनवून त्यासोबतच पुढे जायला हवे असे मला वाटते. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप वर्षे काढली त्यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या एक कार्यकर्ता म्हणून आवडीने कार्यरत होतो.. नंतरही आणि त्याआधीही  छोटासा कार्यकर्ता म्हणून साहित्यिक, सांगीतिक कार्यक्रमात असायचो, आहे. सध्या पेठ जि.सांगली येथील तिळगंगा साहित्यरंग परिवारामध्ये आणि सामाजिक कार्यात स्वयंसेवक म्हणून कार्यरत असतो. खरंतर यासाठी सर्वस्व त्यागून काम करण्याची आवश्यकता नसते. जेव्हा आपल्याला थोडाफार वेळ मिळतो त्यावेळी स्वयंप्रेरणेने, स्वेच्छेने आणि निरपेक्ष भावाने जे शक्य असेल ते करावे असे मला वाटते. आपण या समाजाचे, या मातीचे देणे लागत असतो याची जाणीव मनात ठेवायलाच हवी. त्याची उतराई होणे शक्यच नसते पण आपण या प्रकारे कार्यरत राहून त्यांचे ऋण मान्य करू शकतो.

क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments