सुश्री शुभदा साने

? आत्मसंवाद –भाग २ ☆ सुश्री शुभदा साने ?

( मागील भगत आपण पहिलं – शब्द – ए, जरा तुझ्या प्रौढ साहित्याबद्दलही बोलू या का?

मी – हो.sss बोलूया की….आता इथून पुढे

मी – माझ्या लग्नांनंतरही माझं कथालेखन चालू राहिलं. म्हणजे नेटाने ते चालू ठेवलं. सासरी आल्यावर माझं अनुभव विश्व जास्त समृद्ध झालं, असा मला तरी वाटतं. तसे आपल्या अवती – भवती  बारे-वाईट प्रसंग नेहमीच घडतात. सगळ्यांच्याच मनावर त्या प्रसंगांचा परिणाम होत असतो. पण त्यातला एखादा हृदयस्पर्शी प्रसंग  लेखकाच्या मनात आतपर्यंत जाऊन पोचतो. तिथेच तो रुजतो. मग या प्रसंगाच्या आधी काय घडलं असेल? नंतर काय घडेल, हे लेखक त्याच्या कल्पनाशक्तीच्या आधारे ठरवतो. आणि  कथा तयार होते.

शब्द – हे पण आम्हाला माहीतच आहे. तू एकदा तुझ्या कथाकथनाच्या कार्यक्रमात तू, ‘कथा कशी सुचते’, हे सांगितलं होतस. आम्हीच तर तुझ्या तोंडून बोलत होतो. बरं! तू

तुझ्या प्रौढ वङ्मायाबद्दल बोलत होतीस ना!      

मी – हो. लग्नांनंतरही मी माझं लेखन नेटाने चालू ठेवलं, पण लेखनासाठी सासरी फारसा वेळ मिळायचा नाही. सारखं कुठलं ना कुठलं तरी काम असेच.

 शब्द – ए, पण काम करतानाही तुला एखादं  कथाबीज तुला साद घालतच असायचं. नाही का?

 मी – हो अगदी बरोबर! माझ्या एका कथेची सुरुवात तर मला केर काढताना सुचली.

 शब्द – आणि केर काढणं थांबवून तू आम्हाला साद घातलीस आणि घाईघाईने आम्हाला कागदावर उतरवलंस आणि ‘बाळ चालणार आहे’, ही कथा आकाराला आली.   

मी – हो आणि या कथेला चक्क ‘इंदू साक्रीकर पुरस्कार मिळाला. शब्दमित्रांनो तुम्हाला सगळं स्पष्ट आठवतय बर का, इतक्या वर्षापूर्वीचं. नंतर माझ्या कथा वेगवेगळ्या  मासिकातून , दिवाळी अंकातून प्रसिद्ध होऊ लागल्या. सत्यकथेत कथा प्रसिद्धा झाल्यावर मला विशेष आनंद व्हायचा. कारण सत्यकथा या मासिकाची गणना दर्जेदार मासिकात व्हायची ना! माझ्या ३ कथांचे हिन्दी गुजराती आणि कानडी भाषातून अनुवाद झाले आहेत. झुळूक, वर्तमान, आणि माणूस या त्या तीन कथा.

शब्द – तुझ्या एका कथासंग्रहालाही तू ‘माणूस नाव दिलं आहेस.

मी –   हो. आणि त्या कथासंग्रहावर माझी मैत्रीण उज्ज्वला केळकर हिने अतिशय सुरेख असे आस्वादात्मक लेखन केले होते. आपण लिहिलेलं वाचकांना आवडतं, याची पावती होती ती!

शब्द-  मला वाटतं हा तुझा पहिला कथासंग्रह.

मी –  नाही… नाही…’चित्रांगण’ हा माझा पहिला कथासंग्रह. ‘माणूस’ हा दुसरा. …’चित्रांगण’ प्रकाशित झालं तेव्हा मी अगदी भारावून गेले होते. 

शब्द  – स्वाभाविक आहे. पहिल्या वहिल्या गोष्टीचा प्रत्येकाला अप्रूप असतं.

मी – आणि बरं का, प्रसिद्ध कवी-गीतकार अशोक जी परांजपे ह्यांनी त्यावर चांगला अभिप्राय मला लिहून दिला होता. शब्दांनो, तुम्हाला सांगते, माझ्या दृष्टीने तो मला मिळालेला पुरस्कारच होता. माझी मैत्रीण उज्ज्वला हिने या पुस्तकावरही केलेले आस्वादात्मक लेखन वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते. शिवाय काही वाचकांनी फोन करूनही कथा आवडल्याचे संगितले. वाचकांचे आलेले असे अभिप्राय लेखकांना पुरस्काराप्रमाणेच वाटतात.

शब्द – तुझ्या इतर पुस्तकांबद्दल सांग ना!  किती झाली असतील ग तुझी पुस्तकंआत्तापर्यंत?

मी – बालवाङ्मय , प्रौढ वाङ्मय मिळून माझी आत्तापर्यंत ५० पुस्तके झालीत.

शब्द – बहुतेक सगळे कथासंग्रहच आहेत नाही का?

मी – हो. पण ललित लेख, विनोदी लेख, कथा असे सगळ्या प्रकारचे लेखन मी केलेले आहे. 

शब्द – तुला पुरस्कारही बरेच मिळाले आहेत.

©  सुश्री शुभदा साने

मो. ७४९८२०२२५१

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments