सौ राधिका भांडारकर
आत्मसंवाद –भाग दोन ☆ सौ राधिका भांडारकर
तो..तुझ्या लेखनप्रवासाविषयी अजुन काही सांग ना…
मी..एक नक्की की लिहीणं ही माझी पॅशन होत चालली..शाळेतले निबंध..मनातले काहीतरी म्हणून डायरी लिहीणे ..अगदी पत्रलेखन सुद्धा.. यातून एक प्रकारचा रियाज होत गेला..मुंबई आकाशवाणीवर ,वनिता मंडळ या कार्यक्रमात मी “स्मृतीसाठी..”हा आमच्या काळे सरांवरचा लेख प्रक्षेपित झाला होता…त्यानंतर सुप्रसिद्ध लेखिका लीलावती भागवत यांनी मला त्यांच्या कार्यक्रमात स्वरचित कथावाचनाची संधी दिली..भैरवी ही माझी कथा प्रचंड गाजली..
श्रोत्यांची असंख्य पत्रे आली. मुंबई आकाशवाणी ने ती पुन:प्रक्षेपितही केली. त्यानंतरही मी कितीतरी वर्ष सातत्याने मुंबई आकाश वाणीच्या वनिता मंडळ, गंमत जम्मत, युवावाणी वर कथावाचन केले…आकाशवाणीच्या एका कार्यक्रमात मी मान्यवर कवीयत्री शांता शेळके यांच्या सोबत होते.मला लीलावती भागवतांनी सदाफुली या विषयावर लिहायला सांगितले.
फक्त अर्धा तास वेळ होता..मी पूर्ण ब्लँक झाले.एकही शब्द सुचेना..तेव्हां शांताबाई मला म्हणाल्या,”डोळे मिटून घे..स्वत:त बघ.. सदाफुलीचं रुप तुझ्या मनानं बघ….”
माझ्यासाठी तो एक विलक्षण अनुभव होता.. माझं त्यादिवशी लाईव्ह ब्राॅडकास्टींग झालं.. आणि शांताबाईंसहित सर्वांनी खूप प्रशंसा केली….आजही मी जेव्हां पूर्ण रिकामी असते तेव्हां मला शांताबाईंचे हे अनमोल शब्द साथ देतात….
तो..वा!!खरोखरच भाग्याचा क्षण..तुझं मराठी मासिकातही लेखन चालू होतं ना त्या वेळी…
मी..हो.माझी पहिली कथा मी अनुराधा मासिकात पाठवली होती.कथेचं नाव होतं सोबत..एका विधवेच्या जीवनावरची ती गोष्ट होती.त्यावेळी अनुराधा मासिकाच्या सुप्रसिद्ध लेखिका गिरिजा कीर या संपादिका होत्या.
त्यांनी माझ्या लेखन शैलीचे खूप कौतुक केले.
आणि तितकेच मार्गदर्शनही केले.त्यांनी माझ्या कथांना भरपूर प्रसिद्धी दिली.मी त्यांना सदैव माझ्या गुरुस्थानी मानलं.माझ्या लेखनप्रवासातला गिरिजा कीर आणि अनुराधा हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे.त्यांनी मला लेखिका म्हणून ओळख दिली…आजही अनुराधाची लेखिका ही माझी पहिली ओळख आहे..
तो..रत्नाकर मतकरी हे सुद्धा तुझ्या लेखनप्रवासातलं एक महान व्यक्तीमत्व ..हो ना?
मी ..हो!मी बँक आॅफ इंडीयात असताना त्यांचा माझा परिचय झाला. वाचक लेखक
या स्तरांवरआमची मैत्री झाली.त्यांच्या गूढकथा,बालनाट्ये ,व्यावसायिक नाटके यांची
मी प्रचंड चाहती होते..मी त्यांच्याही पुस्तकांवर ,
नाटकांवर समीक्षा (यथाशक्ती) लिहिल्या.पुस्तक
परिचयही लिहीले .तेही माझ्या लेखनाला नेहमी दाद देत…सुधारणाही सांगत.त्रुटी दाखवत..
विषयाचा विस्तार करताना कुठे आणि कशी कमी पडले हे समजावून सांगत…या त्यांच्या मार्गदर्शनाचा मला खूप फायदा झाला.माझं लेखन विकसित होत गेलं…थोडी परिपक्वता यायला लागली…त्यांनी मला अनेक पुस्तके
वाचायला लावली..त्यात आयर्विन वाॅलेस,जेफ्री आर्चर,राॅबीन कुक,एरीच सेगल असेअनेक लेखक होते…या वाचनाने लेखनावर संस्कार होत गेले…अगदी आजपर्यंत त्यांनी मला लेखनाविषयी सतत प्रेरणा दिली…त्यांच्याशी केलेल्या गप्पा ,चर्चा यांनी माझ्या या प्रवासात शिदोरीची भूमिका केली…
ऐकतोस ना? की कंटाळलास…
तो..नाही ग..सांग ..तुझी आणखी कोणती प्रेरणास्थानं…
मी. आता पुढच्या भागात सांगते…
क्रमश:..
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈