सौ राधिका भांडारकर
आत्मसंवाद –भाग दोन ☆ सौ राधिका भांडारकर
तो..तू तुझ्या साहित्यातील गुरुंसंबंधी सांगत होतीस..
मी .हो. अरविंद ताटके नावाचे माझ्या वडीलांचे विद्यार्थी होते.ते स्वत:साहित्यिक होते.त्यांची काही पुस्तकेही प्रकाशित झाली होती.एकदा असेच त्यांच्या एका कादंबरीवर मी त्यांना पत्र लिहून अभिप्राय कळवला. पत्र वाचल्यावर दुसर्याच दिवशी ते आमच्या घरी आले.आणि मला म्हणाले,”तू पत्र इतकं छान लिहीलं आहेस !!खरोखरच तुझ्यात लेखनगुण आहेत.. लिहीत जा..मेहनत कर. वाचन कर.” अर्थात त्यावेळी मी काही फारसं लिहीत नव्हते. पण ताटके आमच्याकडे नेहमी येत ,आणि प्रत्येक वेळी “लिहीती रहा..कादंबरीच लिही..”वगैरे सांगत..कळत नकळत माझी लेखनवाट नक्कीच आखली जात होती..
तो..एक विचारु का? तू अनेक कथा लिहील्यास..तुझी पुस्तकंही प्रकाशित झाली..
मी.. हो मावळलेले सूर्य,पाऊल,गॅप्स ,अंंतर्बोल हे चार कथासंग्रह आणि नुकताच लव्हाळी हा ललीतलेख संग्रह प्रसिद्ध झाला आहे…एक कवितासंग्रहही प्रकाशनाच्या वाटेवर आहे..ः
तो..मात्र तू कादंबरी हा साहित्यप्रकार हाताळला नाहीस..
मी.. अजुनपर्यंत नाही.मात्र आहे विचार.तुझ्याच रुपाने कीडा आहे डोक्यात.
तो..तुझ्यातले माझे अस्तित्व म्हणजे विवीध विषयच म्हणूया नाही का…नेमकं लिहीताना तुझी मानसिक अवस्था काय असते…
मी…खरोखरच मी खूप अस्वस्थ असते.आतून काहीतरी जाणवत असतं..धक्के देत असतं.. मात्र एक सांगते माझी कुठलीच कथा ही संपूर्ण काल्पनिक नसते.कुठेतरी त्याचं सूत्र सत्यात असतं…कुठल्यातरी संवादातलं एखादं वाक्यही एखाद्या खिळ्यासारखं ठोकलं जातं..आणि त्यातूनच एक सूत्रबद्ध कथा आकार घेते…कधी पेपरात वाचलेली बातमी,भेटलेली माणसं… ओळखीची ..ओळख नसलेली…कुठेतरी त्यांच्याशीही आत्मसंवाद घडतो…त्यांच्या जीवनाशी मी कनेक्ट होते..आणि तिथे माझी कल्पना शक्ती फुलायला लागते…
तो..तुझा आणि तुझ्या वाचकांचा संवाद होतो की नाही….
मी..हो ,नेहमीच होतो. त्याविषयी आपण पुढच्या भागात बोलूया…
क्रमश:..
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈