☆ जीवनरंग : अपशकुनी – सुश्री माया महाजन ☆
जेव्हा तिच्या पतीचा मृत्यू झाला, शेजार्या-पाजार्यांनी तिचे जगणे मुश्कील करून टाकले होते. पुरुषांची गिधाडाची नजर तिच्यावरच रोखलेली असायची तर बायकांची कुचकट दृष्टी तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून असायची.
आपल्या मुलाबाळांच्या भविष्याच्या काळजीने तिने नोकरी धरली. ऑफिसला जायला ती निघायची तेव्हा आणि परत घरी आल्यावर अनेक शंकेखोर नजरा तिच्यावर रोखल्या जायच्या. या सर्वांकडे दुर्लक्ष करून ती मात्र आपल्या जीवन-संघर्षाला सामोरे जात होती, परंतु अनेक वेळा तिच्यासाठी वापरलेला ‘पांढर्या पायाची’ शब्द तिच्या कानावर पडत होता.
तिला मनापासून वाटे की त्या वासंती काकूना ओरखडावं ज्यांनी तिच्या नोकरीच्या पहिल्या दिवशीच सार्या आळीला ऐकू जार्ईल इतक्या मोठ्याने म्हटलं होतं. ‘‘आग लागो त्या सौंदर्याला ज्याने इतक्या लवकर नवर्याला गिळलं आता रोजच आपला अपशकुनी चेहरा दाखवत जाईल, न जाणे किती नवर्याचे किती अनर्थ घडवेल! हिला तर इथून हाकलूनच द्यावे.’’
आतापर्यंत ती शांत राहिली होती. पण आज तिने निर्णय घेऊन टाकला की आता यापुढे ती काहीही सहन करणार नाही जर तिच्याविषयी कोणाला सहानुभूती वाटत नसेल, तर तिने का म्हणून त्यांचे टोमणे, अपमान सहन करायचे!
आज तिला पाहाताच वासंतीकाकू जशी बडबडली, ती पाहा येतेय अपशकुनी…
त्याच क्षणी ती त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली आणि म्हणाली, ‘‘काकू, अपशकुनी मी नाही, तुम्ही आहात. ज्या दिवशी दुर्घटनेत माझ्या पतीचे प्राण गेले. त्या दिवशी सकाळी मी तुमचेच तोंड पाहिले होते. तुम्हीच चालत्या व्हा आमच्या आळीतून!’’
आश्चर्यचकित झालेल्या वासंतीकाकू काही बोलायच्या आधीच त्यांच्यावर एक जळजळीत नजर टाकत ती पुढे निघून गेली.
मूळ हिंदी कथा – मनहूस- सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा
मो.- ९३२५२६१०७९
अनुवाद – सुश्री माया महाजन
मो.-९८५०५६६४४२
सुस्वागतम् आणि अभिनंदन.
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
सुंदर रचना