श्रीमती माया सुरेश महाजन
☆ जीवनरंग ☆ संदेश ☆ श्रीमती माया सुरेश महाजन ☆
मूक-बधिर असलेल्या त्या आकर्षक तरुणीने स्वत:चे बुटिक उघडले होते. ज्यात रेडिमेड कपडे, सोफा कव्हर्स, चादरी, टॉवेल्स वगैरे बरोबरच महिलांच्या प्रसाधनाच्याही वस्तु ठेवल्या होत्या. तिची छोटी बहीण, जी मेडिकल प्रवेशाची तयारी करत होती, नेहमी आपल्या मैत्रिणीबरोबर रमा बरोबर, बुटिकमध्ये यायची तिची मैत्रीण आली की काही न काही वस्तु खरेदी करायचीच गप्पा मारता-मारता एकदा तिने सांगितले की तिला फॅशन डिझायनर बनायची इच्छा आहे, पण आई-वडिलांची इच्छा तिला डॉक्टर बनवायची आहे. परीक्षा झाल्यावर असे समजले की रमाचे पेपर्स काही चांगले नाही गेले. तिला अंदाज आला होता की तिला मेडिकलला प्रवेश मिळणे अशक्यच आहे. दोनच दिवसांनंतर तिने फॅनला लटकून आत्महत्या केली.
मूक-बधिर तरुणीला फारच धक्का बसला. तिने आपल्या डायरीत लिहिले, ‘निसर्गाने ज्यांना स्वस्थ, सुंदर आणि पूर्ण शरीर दिले आहे, अशी माणसेदेखील लहान-मोठ्या अपयशांना घाबरून इतके कुंठित, अवसान घातकी, तणावग्रस्त होऊन जातात की आपली जीवन यात्राच संपवून टाकतात. परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्यच त्यांच्यात नसते. याउलट आमच्यासारखे विकलांग मात्र कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार असतात, कदाचित जीवन-संघर्षाचा धडा आपल्या अपंगत्वामुळे ते लहानपणापासून शिकत असतात. कोणाचाही जरासा स्नेह, सहयोग आणि प्रोत्साहन मिळताच आम्ही स्वत:ला खूप सुखी मानून घेतो तुम्ही कधी ऐकले आहे का कोण्या विकलांग व्यक्तिने जीवनात निराश होऊन, तणावग्रस्त किंवा मतिकुंठित होऊन आत्महत्या केली?’
तिने डायरीत ते पान फाडले आणि डिंकाने आपल्या बुटिकाच्या प्रवेशद्वारावर चिकटवून टाकले.
मूळ हिंदी कथा – लड़का-लड़की – सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा
मो.- ९३२५२६१०७९
अनुवाद – सुश्री माया सुरेश महाजन
मो.-९८५०५६६४४२
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈