☆ जीवन रंग ☆ कथा- निरागस भाग-३ ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

नेहमीप्रमाणेच दोघी फिरायला बाहेर पडल्या. पुन्हा घरात पोहोचेपर्यंत त्यांची एक प्रदक्षिणा पूर्ण व्हायची. घरा जवळच्या कॉर्नर पर्यंत त्या दोघी येऊन पोहोचल्या होत्या. काही-बाही गप्पा चालूच होत्या. हर्षदा एकदम तेथे एका घरासमोर थांबली. फ्रंट यार्ड मध्ये एक युरोपियन गोरी म्हातारी काहीतरी बागकाम करत होती. शरयू ताईंना बस स्टॉप वर पाहिलेल्या वृद्ध महिलांची आठवण आली. तशीच ग्रेसफुल आणि आत्मविश्वासानं ताठपणे चालणारी! आणि…. आश्चर्य म्हणजे एरवी लोकांसमोर बोलताना इतके एटीट्यूड दाखवणारी हर्षदा चक्क हात हलवून तिला “हॅलो ग्रंडमा” म्हणत तिच्यासमोर जाऊन उभी राहिली.

वृद्धेनं चमकून वर पाहिलं. 1, 2 क्षण ती बोललीच नाही‌.मग प्रेमळ नजरेने तिनं

हर्षदा कडे पाहिलं. तिच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर हास्य उमटलं. “हाय बेबी! गॉड ब्लेस यू” उत्तरादाखल तीअगदी मनापासून म्हणाली.

या गोष्टीला आठ दहा दिवस होऊन गेले. एके दिवशी संध्याकाळी डोअरबेल वाजली. ज्योती किचन मध्ये उभी होती. तिथल्या मॉनिटरवर तिला एक गोरी महिला दिसली. “ही कोण बाई इथे उपटली? चर्चसाठी काही चॅरिटी मागायची असेल” ज्योती पुटपुटली.

दरवाज्याजवळ जावून तिला वाटेला लावायचा तिचा विचार होता. पण तिच्या आधीच हर्षदा दरवाज्या जवळ पोहोचली होती आणि कुतूहलानं शरयू ताई पण ! ज्योतीनं दार उघडलं. तिच्या हाताखालून हर्षदा बाहेर पडली.

“गुड इव्हिनिंग ग्रॅन्डमा” ती उद्गारली.

ग्रँडमाला आता घेणे भागच होते. मोठ्या संकोचने तिने आपली अडचण सांगितली. तिच्या चेहऱ्यावरचा केविलवाणे पणा च शरयू ताईंना जाणवला. तिला वृद्धावस्था पेन्शन मिळायची. दर गुरुवारी तिच्या खात्यावर ती जमा व्हायची. आज बुधवार होता आणि तिला $5 उधार हवे होते. इंग्लिश बोलता येत नसलं तरी तिच्या बोलण्याचा साधारण अर्थ हर्षदा ला समजला होता . पळतच ती ड्रॉईंग हॉलकडं गेली.

“डॅडी ऽऽ डॅडी” हातवारे करून तीसांगू लागली, ” अं… तिकडे … समोर एक आजी राहते. तिला ना पाच डॉलर बॉरो करायचे आहेत. आपण देऊ शकतो?”

तिचं लडिवाळपणे आजी म्हणणं शरयू ताईंना खूपच भावलं.

डॅडी कडून पैसे घेऊन ते तिने जेव्हा ग्रँडमाच्या हातात दिले. तेव्हा त्या म्हातारीच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले.

“गॉड ब्लेस यु माय चाइल्ड!” कृतज्ञतेने थँक्स देऊन ती निघून गेली.

तिची पाठ वळताच हर्षदाच्या तोंडासमोर हात ओवाळत ज्योती आईला म्हणाली, ” पाहिलस नां किती ढालगज आहे ही, परस्पर काम उरकून मोकळी!… गोऱ्या लोकांच्या जास्त भानगडीत आम्ही नाही पडत. त्यांच्या जाती-धर्माचे लोक काय कमी आहेत का इथं !पण सरळ तोंड वर करून आपल्याकडे पैसे मागायला यायचे म्हणजे काय?… ‘दिज पीपल आर फ्रेंडली बट नॉट फ्रेंड्स… असुदे, असुदे आता..पाच डॉलर अक्कलखाती खर्च टाकायचे!” ज्योती चांगलीच वैतागली होती.

पण तशी वेळच आली नाही त्या आजी ने दिलेला शब्द पाळला दोन दिवसात आठवणींना ती पैसे परत देऊन गेली… मग काय संध्याकाळी फिरून येताना हर्षदा चा आणखी एक थांबा वाढला.

बहुतेक ती आजी बागेत दिसायची. ती दिसली रे दिसली की हर्षदा तिच्या लॉनवर जायची. हिची भाषा तिला कळायचे नाही आणि तिची भाषा हिला.. पण देहबोली नं दोघी एकमेकींना समजू लागल्या होत्या. ‘ विश’ करताना एकदा शरयू ताईंना आपादमस्तक न्याहाळत आजी म्हणाली होती,” व्हेरी नाईस स्कर्ट!”

आपल्या साडीला ती स्कर्ट म्हणते हे लक्षात आल्यावर आपल्या स्कर्टमध्ये रूप कसे दिसेल या कल्पनेनं त्यांना लाजल्यासारखं झालं. अलीकडे तर आजी लॉनवर खुर्ची टाकून त्यांची वाटच पाहत असायची. आजीला हॅलो म्हणणं, लॉनवर मनसोक्त धावणं, पळणं, फुलं न्याहाळणं, शेवटी बाय् करून घरी येणं. हा हर्षदा चा रोजचा नेमच झाला होता.

तिथल्या रिवाजाप्रमाणे गॅंडमाची जास्त चौकशी करणं ज्योतीला योग्य वाटत नव्हतं . पण कधीतरी इकडून-तिकडून समजलेल्या माहितीनुसार…. तिचं नाव मार्था आहे. तिला कोणीही नातेवाईक नाहीत. 85 वर्षांचे ती वृद्धा स्वतःच्या हाऊसमध्ये एकाकी आयुष्य जगतेय…. इतपत माहिती शरयू ताईंना मिळाली होती.

तीन चार महिन्याचा कालावधी असाच मस्त उलटून गेला. नंतर सलग पंधरा दिवस ती त्यांना बागेत दिसलीच नाही. हर्षदा पळत पळत तिच्या घरासमोर जायची आणि ती दिसली नाही ती चेहरा पाडून उभी राहायची.

क्रमशः…..

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments