सुश्री सुमती जोशी
☆ जीवन रंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 4) (भावानुवाद) ☆ सुश्री सुमती जोशी ☆
सनातनचं कोणतच बोलणं अशोकच्या कानात शिरत नव्हतं. त्याच्या डोक्यात फक्त एकच नाव घुमत होतं, ‘भवेश सर.’ सनातनकडे पहात त्यानं विचारलं, “भवेश सर कसे आहेत?”
“सज्जन आहेत. इतरही शिक्षक आहेत, पण भवेश सर सांगतील, त्याप्रमाणे सगळे शिक्षक वागतात.”
“बंगाली पुस्तकांचा निर्णय ते घेतात का?”
गप्पा मारता मारता दोघेजण मोठया भिंतीची तटबंदी असलेल्या देवळापाशी येऊन पोचले. खूप विशाल देऊळ. चारी बाजूला व्हरांडा. देवळाचा दरवाजा बंद होता. अशोकनं हात जोडले.
“कोणाचं देऊळ?”
“शंकराचं. आमच्या शाळेचे संस्थापक परमेश्वर मझुमदार. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे विद्यार्थी. ते मूळचे याच गावचे, पण कोलकात्याला रहात. तेव्हा इथे एकही शाळा नव्हती. परमेश्वर मजुमदार यांनी स्वत: कमावलेल्या निधीतून वडिलांच्या नावानं देणगी दिली आणि खूप कष्ट करून ही शाळा उभी केली. ते कोलकात्याला मोठया हुद्द्यावर नोकरी करत होते. ती नोकरी सोडून त्यांनी या शाळेची जबाबदारी घेतली. तेव्हा ही शाळा अगदी छोटी होती. शिवाय त्यांनी इथे दवाखाना काढला, देऊळ बांधलं, नदीवर घाट बांधला. अनेक सामाजिक कामात लक्ष घातलं.”
“त्या काळी अशी उदार मनाची अनेक माणसं दिसत असत. आता तशी माणसं कुठायत?”
सनातनने मान डोलावली. ‘खरंच भाऊ तुम्ही बरोबर बोलताय. तेव्हा ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यासारखे आदर्श शिक्षक होते, म्हणून आदर्श विद्यार्थी तयार होत. आता शिक्षकांनी आपली सारी कर्तव्यं सोडून दिलीयत. त्यामुळे बघता बघता त्यांच्याविषयीचा आदर कमी होऊ लागलाय.”
अशोकला सनातनचं म्हणणं पटलं. शिक्षकांविषयीचा गेल्या दोन वर्षातला त्याचा अनुभवही काही खास नव्हता. सगळ्या मनाला न पटणाऱ्या गोष्टी कराव्या लागल्या होत्या. विद्यार्थ्यांना धाकदपटशा दाखवून पुस्तकं विकावी लागत. शिक्षक कमिशन घेत. इतकं करून पुस्तकं विकली गेली नाहीत, तर सकाळ संध्याकाळ मालकाची बोलणी खावी लागत. नुकतीच घडलेली एक घटना अशोकला आठवली. एका शाळेत पुस्तकविक्री झाली नाही. तरीही न रागावता त्याला मास्तरांच्या कलानं घ्यावं लागलं होतं. त्या शाळेत शेवटी मास्तरांनीच त्याला धीर दिला, ‘आज शुक्रवार. आज पुस्तकं विकली गेली नाहीत, तरी काळजी करू नकोस. उद्या शनिवार. उद्या माझा तास आहे. सोमवारपासून तुझी पुस्तकं विकली जातील.’
अशोक अवाक झाला. या सुशिक्षित लोकांना काही जादू करता येते की काय? गेल्या एकवीस दिवसात एकही पुस्तक विकलं गेलं नाही आणि आता फक्त तीन दिवसात…!
शनी, रवी, सोम यानंतर मंगळवारी संध्याकाळी पुस्तकांच्या दुकानाचा मालक प्रकाशन संस्थेच्या ऑफिसमध्ये हजर झाला, “सर्व पुस्तकं संपली, आणखी लागतील.”
“असं कसं झालं? मास्तरना जादूटोणा अवगत आहे काय?”
कुत्सितपणे हसत दुकानाचा मालक उत्तरला, “तुम्ही शुक्रवारी शाळेत गेला होतात ना? त्यांच्या प्रेस्टीजला धक्का लागला. कमिशनचे पैसे त्यांनी आधीच घेऊन ठेवले होते आणि पुस्तकांची विक्री करता आली नाही. शनिवारी वर्गात गेल्यावर पहिल्या बाकापासून शेवटच्या बाकापर्यंत प्रत्येक मुलाला वेताच्या छडीनं असं मारलं की दुसऱ्या दिवसापासून घाबरत घाबरत मुलं पुस्तकं खरेदी करू लागली.” अशोकला वाईट वाटलं. अपराधीपणाची भावना त्याच्या मनात घर करून राहिली. आज भवेश सरांना भेटताना या आठवणीने त्याच्या मनाचा थरकाप उडाला.
भावविवशतेचं जग तुम्हाला एका विचित्र वळणावर घेऊन जातं. भवेश मास्तरांकडे गेल्यावर आणखी काय करावं लागेल, कोणास ठाऊक!
आपण सरांच्या घरापाशी आलोय’, हे सनातनचे शब्द ऐकून अशोक भानावर आला. “हे भोवताली बाग असलेलं घर आहे ना, तिथेच भवेश सर राहतात. आज घरी सर एकटेच आहेत. सरांची बायको सकाळीच माहेरी गेलीय. तुम्ही खुशाल सरांच्या घरी जा. तुम्हाला काही अडचण येणार नाही. मला दुसऱ्या दिशेला जायचंय.”
रस्त्याच्या कडेला भवेश सरांचं घर. घराच्या चारी बाजूना मोकळी जागा. घराला मोठा व्हरांडा. चहूबाजूना झाडंझुडपं आणि या सगळ्याला बांबूचं वेष्टण. लहानसं लोखंडी प्रवेशद्वार. कानोसा घेत अशोकनं घरात प्रवेश केला. माणसांची चाहूल लागेना. सगळीकडे शांतता पसरली होती. इकडेतिकडे बघितल्यावर व्हरांडयातल्या खुर्चीवर बसलेली, धोतर नेसलेली, पुस्तक वाचत असलेली एक पाठमोरी आकृती दिसली. पुस्तकामुळे चेहरा नीट दिसत नसला तरी भवेश सरांना ओळखण्यात अशोकची चूक झाली नाही. बॅग खाली ठेवून अशोक हळूहळू पुढे गेला.
क्रमश: ….
श्री चंचलकुमार घोष यांनी लिहिलेल्या ‘मरुद्यान’ या बंगाली कथेचा भावानुवाद.
अनुवाद – सुश्री सुमती जोशी
मोबाईल ९८३३२२२१०६. इ मेल आयडी [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈