सुश्री सुमती जोशी
☆ जीवन रंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 5) (भावानुवाद) ☆ सुश्री सुमती जोशी ☆
पावलांचा आवाज ऐकल्यावर पुस्तक बाजूला सारून सरांनी समोर नजर टाकली. डोक्यावर काळे पांढरे केस. जडावलेला चेहरा काळ्या फ्रेमच्या चष्म्यामुळे अधिकच गंभीर वाटत होता.
विषयाला हात घालण्यापूर्वी सरांना खूश करावं म्हणून अशोकनं विचारलं, “सर, तुम्ही कसे आहात?”
काही क्षण भवेश सर अशोकाच्या चेहऱ्याकडे निरखून पहात राहिले. “मी ठीक आहे, पण मी तुला ओळखलं नाही. कसं ओळखणार? आता वय झालंय माझं! किती विद्यार्थी आले आणि गेले, सगळ्यांचे चेहरे लक्षात राहत नाहीत.”
मी त्यांचा विद्यार्थी आहे, असं सरांना वाटतंय. फारच छान! या खोटया नात्यामुळे माझं काम फत्ते झालं तर बरं होईल.
भवेश सर अजूनही अशोकाच्या चेहऱ्याकडे एकटक पाहात होते. हातातलं पुस्तक खाली ठेवून म्हणाले, “अरे, अगदी सुकून गेलाय तुझा चेहरा. पाणी देऊ?”
“हो सर, केव्हापासून तहान लागलीय.”
सर घरात गेले. एक लहान मुलगी, बहुतेक कामवाली असावी, हातात पाण्याची लोटी आणि वाटीत दोन लाडू घेऊन आली. अशोकनं गटागट पाणी पिऊन टाकलं. त्याच्या पाठी सर उभे होते.
“आपल्याला एक विनंती करायची आहे.”
हसून भवेश सर म्हणाले, “विद्यार्थ्यांनं केलेल्या विनंतीला मी नाही म्हणू शकेन का? बोल.”
अशोकनं बॅगेतून दोन पुस्तकं बाहेर काढली.
“ही व्याकरणाची पुस्तकं आम्ही नवीनच प्रकाशित केलीयत. सर, आपण ही पुस्तकं बघता का?”
“ठीक आहे. मी बघतो. तोपर्यंत तू लाडू घे.”
अशोक वरमला. ‘आपला माजी विद्यार्थी’ म्हणून सर किती प्रेम करतायत! आता एकदा पुस्तकं खपली की गंगेत घोडं न्हायलं.
खाऊन झाल्यावर अशोकनं वाटी बाजूला ठेवली आणि हळूच वर पाहिलं. भवेश सर पुस्तक चाळत होते. थोडया वेळानं पुस्तकं बाजूला ठेवत सर म्हणाले, “इतका वेळ आपण बोलतोय, पण मी तुझं नावही विचारलं नाही.”
“अशोक रॉय.”
“अशोक रॉय…’असं मनातल्या मनात पुटपुटल्यावर अचानक भवेश सरांचा चेहरा पडला. काही क्षण गप्प बसल्यावर म्हणाले, “तू आमच्या शाळेतून पास झालास?”
जरा इकडेतिकडे बघितल्यावर अशोक उत्तरला, “हो, सर.”
“किती साली?”
“दोन हजार एक.” सर काहीसे गंभीर झाले. त्यांनी चष्मा काढला.
“येतो सर.” पुस्तकांबद्दल अशोकाला काहीतरी बोलायचं होतं, पण धीर झाला नाही.
“ऐक”
सरांची हाक ऐकून गेटपर्यंत पोचलेल्या अशोकनं चमकून मागे वळून पाहिलं. “सर, आपण मला बोलावलंत?”
“तुझी पुस्तकं आम्ही शाळेकरता घेऊ.”
आनंदातिशयानं अशोकाचे डोळे लकाकले.
“खरंच सर, मी तुमचा आभारी आहे.”
गंभीर आवाजात सर हळूहळू बोलू लागले, “आभार मानायची काही जरूर नाही, पण तू माझ्याशी खोटं बोलतोयस. दोन हजार एक साली आमच्या शाळेतल्या अशोक रॉय नावाच्या एकाच मुलाने माध्यमिक परीक्षा दिली होती. खूप हुशार विद्यार्थी होता तो, पण रिझल्ट लागायच्या तीन दिवस आधी तो बसच्या अपघातात मरण पावला.”
एवढं बोलून भवेश सर क्षणभर थांबले. त्यांच्या चेहऱ्यावरचे गांभीर्य हळूहळू लोप पावले आणि त्याची जागा विषण्णतेनं घेतली. “तो अशोक रॉय कोण होता माहितेय का तुला? तो होता माझा एकुलता एक मुलगा.”
क्षणार्धात अशोकाच्या ह्रद्यात एक तीव्र कळ उमटली. त्याला असह्य वेदना जाणवू लागली. तोंडातून शब्द फुटेना. डोळ्यातून घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या.
समोर भवेश सर उभे होते. आता त्यांचा चेहरा निर्विकार झाला होता. शांतपणे ते म्हणाले, “तू खोटं बोलतोयस, हे समजूनही मी पाठयपुस्तकं का घेतली माहीत आहे? तुझी ओळख खोटी असेल, पण तुझ्या डोळ्यातलं कारुण्य, दिवसभराची वणवण, पोटातला आगडोंब आणि तहानेनं व्याकूळ झालेला तुझा जीव – हे सारं तर खोटं नव्हतं. तुझ्या खोटया ओळखीपेक्षा हे वास्तव अनेक पटींनी दाहक होतं.”
अशोक समोर बघतच राहिला. भवेश सरांच्या मागच्या बाजूच्या भिंतीवर ईश्वरचंद्र विद्यासागरांचा फोटो टांगला होता. या वेळपर्यंत अशोकला तो दिसलाच नव्हता. अनिमिष नेत्रांनी तो त्या फोटोकडे बघत राहिला. बघता बघता डोळ्यासमोरच्या सगळ्या गोष्टी दिसेनाशा झाल्या. कुठे काहीही दिसत नव्हतं. हळूहळू ते दोन्ही चेहरे एकमेकात मिसळत एकरूप झालेले त्याला दिसले.
कथा समाप्त
श्री चंचलकुमार घोष यांनी लिहिलेल्या ‘मरुद्यान’ या बंगाली कथेचा भावानुवाद.
अनुवाद – सुश्री सुमती जोशी
मोबाईल ९८३३२२२१०६. ई-मेल आयडी [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈