☆ जीवन रंग ☆ जिंदगी के साथ (भाग-1) ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

पहाटेच्या साखरझोपेतनं बेलाला जाग आली तीच मुळी तिला सुचलेल्या कादंबरीच्या क्लायमॅक्सनं.व्वाव तिचं मन आनंदानं ‘बल्ले बल्ले ‘करुन नाचायला लागलं.तिची कुरुक्षेत्र ही कादंबरी एका मासिकातून क्रमशः प्रकाशित होत होती. वाचकांचा उदंड प्रतिसादही मिळत होता. मनासारखा क्लायमॅक्स न सुचल्याने गाडी शेवटच्या भागावर येऊन अडली होती. इतक्या चांगल्या कलाकृतीचा शेवट पण दर्जेदार हवा असं तिला वाटत होतं. पण प्रतिभा राणी रुसून बसली होती. तिचं मन बेचैन झालं होतं. कारण संपादकांनी दिलेली कादंबरीच्या शेवटच्या भागाची डेडलाईन संपत आली होती. कित्येक दिवसापासूनची तिची चिडचिड सुदेशच्या सुद्धा लक्षात आली होती.

पण आजची सकाळ वेगळाच उत्साह घेऊन आली होती. लगबगीने ती उठली. स्वयंपाक घरात गेली. भरभर सकाळची कामं आवरून लिहायला बसायचंय…..  ‘कुरुक्षेत्र चा शेवटचा भाग संपादकांना पाठविला की मनावरचं मोठं ओझं उतरणार.’ विचार करत… लिहायच्या  शब्दांशी खेळत आपल्याच तंद्रीत वावरणाऱ्या तिचा पाय फरशी वरून सटकला…. टेबलाच्या पायात अडकला… ती पडलीआणि पाय मुरगाळून बसली.

“अगं जरा हळू” म्हणत चहाचा कप बाजूला ठेवत सुदेश उठला. त्यांनं तिला आधार देऊन खुर्चीवर बसवलं. फ्रीजमधून कोल्ड तयार पॅक  काढून तिच्या मुरगळलेल्या पावलावर लपेटून ठेवला.

“आता सूज नाही येणार व्यवस्थित थंड शेक घे” तो म्हणाला.

आणि तो लगोलग चारुला तयार करून स्कूल बस मध्ये बसवून आला.उरलं सुरलेलं स्वयंपाकाचं काम आवरून त्यांनं बेलालाही नाश्ता दिला. आणि किचन कट्टा छान आवरून तो आपल्या ऑफिसला जायच्या तयारीला लागला.

हे सगळं लांबून निरिक्षण करणार्‍या बेलाला एकदम गहिंवरून आलं. त्याचं आपल्यावरचं प्रेम… त्याचं ‘केअरिंग नेचर’ नेहमीच बेलाला सुखावत असे आणि त्याचं मिष्किल बोलणं… तिची थट्टा करणं.. तिला चिडवणं हेही तिला आवडत असे.

“कादंबरीचा शेवटचा भाग काही दिलेल्या मुदतीत पूर्ण होत नाही.” त्याचं चिडवणं सुरू झालं. “सांग संपादक महोदयांना मुदत अजून वाढवून हवीय म्हणून.” तुम्ही महान लेखक मंडळी मूडी असता… नाहीय  आत्ता मूड..!”

“नाही, असं होणारच नाही. आज संध्याकाळपर्यंत संपादकांच्या मेल आयडी वर शेवटचा भाग पोहोचलेला असेल.” ती पण ठासून म्हणाली.

“नामुमकीन लागली पैज” त्याचं चिडवणं चालूच होतं. “आज डान्स क्लास,शॉपिंग काही जमणार नाही.. तरी पण पाय दुखतोय ना म्हणून आराम. उद्या आणखी काहीतरी तरी, न लिहिण्याचा वेगळा बहाणा.”

“छोड यार, बेला के लिये आज सब मुमकीन है…. त्यामुळे तुझं चॅलेंज मी स्वीकारतेय… कितीची पैजसांग?” तीपण रंगात आली. कारण पैज मीच जिंकणार आहे.

“ऑल द बेस्ट” म्हणत हसत -हसत तो ऑफिसला निघून गेला.

‘चला बेलाजी आता हे तीन-चार तास तुमचेच’. लिहायला बसताना तिनं मनाला बजावलं… आणि छानपणे  लेखनात रंगून गेली… अचानक डोअर बेलच्या आवाजाने ती भानावर आली. लेखन सोडून उठायची तिची अजिबात इच्छा नव्हती. इतका छान मूड लागलाय,अर्ध्या पाऊण तासाचं तर काम उरलंय. विचार करत वैतागानं लंगडत जाऊन तिनं दार उघडलं.

एकदम वाऱ्याच्या वेगानं ताराबेनची सून आत आली आणि आपल्याबरोबर रॉकेल सारखा उग्र वासही घेऊन आली. बघताक्षणीच ती बेलाच्या गळ्यातच पडली. भेदरून रडायला लागली.

“हेय् समिधा व्हॉट् हॅपन्ड” बेल स्वतःच गोंधळून म्हणाली. समिधा तशीच घुटमळत राहीली. आणि मग विचित्र आवाजात रडत कसंबसं बोलू लागली.” ऑंटी मला जगायचं नाहीय. माझ्या मीनुला आता तुम्ही सांभाळा.’बां’वर माझा विश्वास नाहीय.”

तो उग्र वास आणि तिचं बोलणं… बेला वेगळीच शंका आली. ‘अंगावर रॉकेल ओतून घेऊन ती इथं स्वतःला पेटवून घ्यायला तर ती आली नाहीये ना?’

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments