सौ. सुनिता गद्रे

☆ जीवन रंग ☆ जिंदगी के साथ (भाग-2) ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

“ए बाई, नौटंकी नकोय. खरं काय ते सांग.”बेला रागातच म्हणाली. समिधानंसांगितलेलं ऐकून ती हादरलीच. समिधानं एक कप डासांना मारायचं हिट घेतलं होतं.त्याचाच तो वास होता.

“पंधरा मिनिटं झाली. पण मला काहीच होत नाहीये.” समिधा भेसूर आवाजात म्हणाली.

“म्हणजे काय व्हायला हवं होतं ? मरायचं होतं तर इथं कशाला धावत आलीस ?घरात पडून राहायचंस ना! जीव देणं येवढ सोपं असतं होय ?”बेला वैतागून म्हणाली खरी, पण आता तिला वाचवायला पाहिजे हाच विचार बेलाच्या डोक्यात आला.

‘आता काय करावं? कुणाची मदत घ्यावी? उपचार तर लवकर सुरू व्हायला हवेत.’ विचार करत करत तिने किरण ला फोन लावला.तिची कादंबरी पूर्ण करायची निकड या गदारोळात निपचित पडून राहिली.

“बेलाअगं आपल्याला संध्याकाळी शॉपिंग ला जावं लागेल. आता आमच्याकडे एक गेस्ट यायचे आहेत.” किरण सांगत होती.

“ए बाई कसंही करून आत्ताच ये.एक शुक्लकाष्ट मागं लागलंय, एकदम एक मोठी इमर्जन्सी आली असं समज.  डेबिट कार्ड आहे माझ्याकडं .पण तू दहा-बारा हजार…जितके असतील तेवढे घेऊन ये. “बेला बोलून मोकळी झाली. अन् थोडी सावरली.

किरण ताबडतोब आली. अन् समिधा चा पराक्रम पाहून घाबरूनच गेली .तिनं तारा बेनला बोलावून आणलं    .

“ताराबेन असं काय घडलं घरात की या मूर्ख बाईनं विष प्यावं?” बेला जाब विचारावा तसं म्हणाली.” समिधानं… विष? त्यांच्या कानावर पडलेल्या शब्दांनी त्या दचकल्या, घाबरल्या, थरथर कापू लागल्या.

“हे भगवान, मी काय करू आता?” बसकण मारत त्या म्हणाल्या. “मी अशी दोन्ही गुडघ्यांनी अधू.. वर्षभराची नात माझ्याजवळ.” ..पुढे म्हणाल्या, “बेला आता तुझ्या हातात आहे सगळं काही.. काहीही कर, किती पैसे लागू देत, पण समिधाला वाचव.”

बेला, किरण विचारात पडल्या. यावेळी अपार्टमेंटमध्ये कोणी पुरुष माणूस नाहीये .इतर कोणी मदतीला येण्याची शक्यता पण नाही. येथून मेन रोड पर्यंत इतका अरुंद बोळ आहे की इथे ॲम्बुलन्स पण येऊ शकणार नाही.प्रत्येक क्षण मोलाचा होता. दोघींनी तिला कोपऱ्यावरच्या गोसावी डॉक्टरांकडं घेऊन जायचं ठरवलं.

“सुदेश मीटिंग मध्ये बिझी आहे तर तुझ्या प्रकाशचं ऑफिस आहे दीड तासाच्या अंतरावर. तेव्हा  देवाचं नाव घेऊन लागू या ‘मिशन जिंदगी के साथ’ या कामाला.” जिना उतरता उतरता बेला म्हणाली. दोघींनी समिधाला दोन्ही हातांनी पकडलं होतं. दहा-पंधरा पावलं पण चालून झाली नव्हती. तेवढ्यात….

“बेला आन्टी मला काही दिसेनासं झालंय.” समिधा घाबरुन म्हणाली. उभीच्या उभी थरथर कापू लागली. ऐकून किरणची सटकलीच.

“भोगा आता आपल्या कर्माची फळं !” किरण तिच्यावर खेकसली. बेलानं तिला खूणेनं शांत राहायला सांगितलं. पण पुढं थोडं अंतर चालून गेल्यावर समिधा एकदम थबकली .

“ऑंटी.. मला..एकही.. पाऊल.. पुढे.. टाकता.. येत नाहीय. माझे.. पाय.. जड.. झालेत .”रडत समिधा म्हणाली. तीला नीट बोलताही येत नव्हतं. त्यांना काही सुचेना. दोघी तिला ओढत ढकलत कशा बश्या दवाखान्यापर्यंत घेऊन आल्या. दवाखाना बंद होता पण डॉक्टर वरच्या मजल्यावर राहत होते.बेला तडक वरती डॉक्टरांच्या घरात गेली.

“डॉक्टर साहेब… जरा प्लीज ऐकता?… बेलानं अडखळत सगळा वृत्तांत सांगितला. त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं. जेवणाच्या ताटावरून उठून ते तिच्याबरोबर खाली आले.

तिथं एक मोठा ‘सीनच’ क्रिएट झाला होता .समिधा फूटपाथवर गडाबडा लोळत होती.जिवाच्या आकांताने ओरडत होती…..अन् ही..मोठी गर्दी गराडा घालून उभी होती. ते बघून बेलाच्या उरात धडकीच भरली.डॉक्टरांनी नाडी बघितली. स्टेथेस्कोपनं चेकिंग केलं. मग जरा काळजी च्या आवाजात म्हणाले,

“विष अंगात भिनायला लागलंय. ताबडतोब हॉस्पिटल गाठावे लागेल तुम्हाला. जस्ट हरीअप्! त्यांनी जवळच असलेल्या कामत हॉस्पिटलच्या स्पेशालिस्ट ला फोन करून सगळी कल्पना दिली.

आता पुढचं काम!… लोकांच्या घोळक्यातून बाहेर पडून त्या रिक्षा थांबवायचा प्रयत्न करू लागल्या. कार वाल्यांना लिफ्ट मागू लागल्या. पण सगळेच बघे निघाले .मदत करायची सोडून काहीजण मोबाईलवर व्हिडीओ घेण्यात गुंतलेले दिसले. नशीब बलवत्तर असंच म्हणायला पाहिजे… एक रिक्षावाला मदतीला पुढे आला. त्यामुळे त्या वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकल्या. स्पेशालिस्ट डॉक्टरांनी विचारलेली सगळी माहिती त्यांनी दिली. आणि इमर्जन्सी

मध्ये ट्रीटमेंट सुरू झाली. बाहेर रिसेप्शनवर फॉर्म लिहून देऊन, पैसे भरून, त्या परत जायला वळल्या.

क्रमशः …

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments