श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ जीवनरंग ☆ आय लव्ह यू फ्लाय बॉय (उत्तरार्ध) (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
27 जानेवारी : पीरपंजालच्या बरोबर वर
संध्याकाळचे पाच वाजू लागले आहेत. हेलीकॉप्टरचं पूर्ण नियंत्रण मेजरने आपल्या ताब्यात घेतलय. थोड्या वेळापूर्वी बेफिकीर वाटणारा कॅप्टन आता उत्तेजित झालाय. धुकं आणि षड्यंत्री ढगाच्या टोळीशी झुंजत झुंजत हेलीकॉप्टर आता पीरपंजालच्या बरोबर वर आहे. मेजरला बेसकडून, त्याच्या बरोबर खाली चाललेल्या चकमकीविषयी आणि या चकमकीच्या दरम्यान घायाळ झालेल्या जवानाविषयी रेडिओ- सेटवर संदेश मिळतो. बेस अद्यापही अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. अंधारही वाढतोय. मेजरच्या मनात संभ्रम आहे. कायद्यानुसार तो आपल्या बेसच्या दिशेने उडू शकतो. त्याच्यावर कोणताही दबाव नाही. नियम आणि आदेशानुसार त्याला आपलं हेलीकॉप्टर साडे पाच वाजता बेसवर लॅंड करायला हवं. महागडं हेलीकॉप्टर आणि दोन प्रशिक्षित पायलट यांच्या सुरक्षिततेचा विचार करता ते आवश्यक आहे. संभ्रमाच्या या पराकोटीच्या अवस्थेत त्याला आपल्या मेजर दोस्ताची सक्सेनाची आठवण होते. त्यांचा जिगरी दोस्त. तो त्या राष्ट्रीय राइफल्स बटालियनमधेच आहे आणि अचानक हेलीकॉप्टरची दिशा बदलते. पीरपंजालच्या जंगलाच्या दिशेने ते वळतं. कॅप्टनच्या विरोधस्वरूप बडबणार्या ओठांकडे दुर्लक्ष करत, मेजर आपल्या कपाळावर डावा हात फिरवत त्यावर उमटलेल्या वाकड्या तिकड्या रेषा, स्लेट पाटीवर आखलेल्या वेड्या-वाकड्या रेषा पुसून टाकाव्या, तसा मिटवून टाकतो.
27 जानेवारी : पीरपंजालच्या खाली दक्षिणी काश्मीरी घाटीचा निबीड जंगलाचा एक भाग
संध्याकाळचे सव्वा पाच वाजले आहेत. जंगलातल्या या आतल्या भागात संध्याकाळ जरा लवकरच उतरून आलीय. रातकिड्यांच्या किरकिरीत विव्हळण्याचा आवाजही मिसळलाय त्या घायाळ लांस नायकाच्या अवती भवती असलेल्या त्याच्या साथीदार सैनिकांच्या नजरा वारंवार आकाशाकडे वळताहेत. घेरून येणार्या अंधारात विव्हळणार्या नायकाचा आवाज मंदावत चाललाय. रातकिड्यांच्या करकरीत मधेच एक आवाज आकाशातून येतो. झाडांच्या वर दिसणारं हेलीकॉप्टर, त्याचे मोठे फिरणारे पंख, निराश लांस नायकासाठी संजीवनी घेऊन आले आहेत. पृष्ठभागापासून थोड्या उंचीवर थांबेलेलं हेलीकॉप्टर सगळ्या जंगलाला थरथरायला लवतय. घायाळ लांस नायक आणि त्याचा एक साथीदार, हेलीकॉप्टरमध्ये बसलेले मेजर आणि कॅप्टन यांच्या साथीला येतात. झाडांना, वृक्षांना हलवत, डोलवत हेलीकॉप्टर अंधारात आपला मार्ग शोधत आपल्या बेसच्या दिशेने उडू लागतं. कॉकपिटमध्ये चमकणारं घड्याळ ठरलेल्या वेळेपेक्षा १५ मिनिटे जास्त झाल्याची चेतावणी देतं.
२८ जानेवारी: मध्य काश्मीर घाटीतील एव्हिएशन – बेसची छावणी
सकाळचे सात वाजलेत. घायाळ लांस नायकतज्ज्ञ चिकित्सकांच्या देखरेखीखाली गेले बारा तास आय. सी. यू मध्ये सुरक्षित श्वास घेऊ लागलाय.
मेजर वर्मा आपल्या बिछान्यात गाढ झोपलेत. त्यांचा मोबाईल वाजतो. चिडून, वैतागून, अस्वस्थ होत ते मोबाएल स्क्रीनकडे टवकारून पाहतात. स्क्रीनवर त्यांचे जिगरी दोस्त मेजर सक्सेनांचा नंबर फ्लॅश होतो. अस्वस्थ होत ते मोबाईल उचलतात.
मेजर वर्मा : हा! बोल!
मेजर सक्सेना : कसा आहेस तू?
मेजर वर्मा : थॅंक्स म्हणायला फोन केलायस का?
मेजर सक्सेना : नाही.
मेजर वर्मा : मग?
मेजर सक्सेना : आय लव्ह यू, फ्लाय-बॉय!*
मेजर वर्मा : चल… चल…
आणि मोबाईलच्या दोन्ही बाजूंनी एकदमच खदा खदा हसण्याचा आवाज गुंजत राहातो.
समाप्त
* फ्लाय-बॉय – हेलीकॉप्टर चालवणार्याला फ्लाय-बॉय म्हणतात.
मूळ कथा – आय लव यू फ्लाय ब्वाय मूळ लेखक – गौतम राजऋषि
भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈