श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ पाणक्या… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
विजयराव देवाचे स्तोत्र म्हणत होते, सायंकाळचे सात वाजले होते, स्तोत्र म्हणता म्हणता विजयरावांच्या डोक्यात विचार येत होते, थोड्या वेळाने कुकर लावू, दुपारी हॉटेल मधुरमधून मागवलेली आमटी व भाजी आहे, फ्रिजमध्ये दही आहे. विजयरावांची ही नेहमीची पद्धत, सायंकाळी सातच्या सुमारास देवापुढे निरंजन लावायचे, मग स्तोत्र म्हणायचे. वसुधा आजारी पडेपर्यंत देवाचे सर्व तीच पहायची. त्यामुळे रात्री आठ पर्यंत विजयराव पार्कमध्ये फिरत. वसुधा आजारी पडली आणि विजयरावांचे फिरणे थांबले. बाहेर पडायचे ते फक्त बाजारहाट करण्यासाठी, आता बऱ्याच गोष्टी ऑनलाइन होतात, त्यामुळे बाहेर जाणे कमीच, पेन्शन बँकेत जमा होते, सुनील चा फोन रात्री नऊ वाजता नेहमीचाच, तोपर्यंत जेवून घ्यायचे आणि त्याच्या फोनची वाट पाहायची, असा त्यांचा दिनक्रम.
सव्वासाच्या सुमारास बेल वाजली, विजयरावांनी होल मधून बाहेर पाहिले, मध्यम वयाचा एक गृहस्थ बाहेर उभा होता.
कोण पाहिजे? विजयरावांनी विचारले.
” दादासाहेब एवढ्या वर्षांनी तुम्ही ओळखणार नाही मला.’
” दादासाहेब ‘ ही हाकच इंदोरची. इंदूरच्या घरात सर्वजण त्यांना दादासाहेब म्हणत.
” तुम्ही इंदोरहून आलात का,? दादासाहेबांनी विचारले.
“नाही ‘, दादासाहेब मी शामू, तुमच्या इंदोरच्या वाड्यात कामाला होतो लहानपणी.
“कोण शामू? अरे तू म्हणजे……., दादासाहेब थोडं थोडं आठवू लागले.” दादासाहेब मी शामू “पाणक्या’, तुमच्या दातेंच्या वाड्यावर मी पाणी भरायचो। आठवलं नाही का?’
” अरे तू शामू?’, दादासाहेबांनी संपूर्ण दार उघडलं.
” कुठे होतास इतकी वर्ष?
शामू आत आला आणि दादासाहेबांच्या पाया पडला.
” अरे एवढा मोठा झालास तू, माझ्या पाया काय पडतोस, ये. ये. बस.’
” नाही दादासाहेब पहिल्यांदा तुम्ही बसा ‘.
” बर बाबा ‘, म्हणत विजयराव कोचवर बसले. त्याच क्षणी शामू येऊन त्यांच्या पायाकडे बसला आणि त्यांचे पाय चुरू लागला.
” अरे शामू काय करतोस हे?, माझे पाय दाबतोस, केवढा मोठा झालास तू.’ “मोठा झालो इतरांसाठी, तुमच्यासाठी नाही दादासाहेब. अजून मी ” पाणक्या ‘ शामूच आहे तुमच्यासाठी. तुम्ही माझे अन्नदाते मालक, तुमच्या वाड्यावर मिळणाऱ्या तुकड्यावर माझे बालपण गेले, ते कसे विसरू?”
” ते जुने दिवस होते रे बाबा, इंदूर मध्ये आम्ही रावसाहेब, संस्थानिकांचे सरदार होतो. पण ते सर्व संपले आता. या मुंबईत आम्हाला कोण विचारतो?’
” कोणी विचारू न विचारू, तुम्ही माझे अन्नदातेच आहात,”
” ते असू दे, तू आधी त्या खुर्चीवर बस पाहू “.तसा शामू एका लहानशा स्टुलावर बसला.” कुठे होतास इतकी वर्ष? माझ्या अंदाजाने 35 40 वर्षानंतर दिसतोयस तू मला.”
” हो दादासाहेब, इंदूरला तुमच्या वाड्यावर होतो तेव्हा आठ नऊ वर्षाचा होतो. आणि तुम्ही कॉलेजमध्ये होतात.“
” हो बहुतेक तेव्हा मी एम. कॉम.ला होतो. मग मी बँकेत लागलो आणि मग भारतभर बदल्या. शेवटी मुंबईत येऊन स्थायिक झालो.”
” मग इंदूरचा वाडा आणि त्यातले संस्थानिकांचे सरदार सरदार, एवढी माणसं? नोकर मंडळी? “
” सगळा पोकळ वासा होता तो, संस्थानिकांचे सरदार म्हणून सगळा खर्च सुरू होता. आमच्या पाच-सहा पिढ्यांनी नुसतं बसून खाल्लं. तळ्यात साठवलेलं पाणी किती दिवस पुरणार? त्यासाठी झरा हवा असतो, तो झरा तलाव रिकामा करू देत नाही., आमच्या कुटुंबात झराच नव्हता. शेवटी मी निर्णय घेतला, कर्ज अंगावर येत होतं, सगळे डाम दौंल बंद केले. नोकर चाकर कमी केले, आई वडील गेल्यावर मी बँकेत नोकरी धरली.”
” आणि दादासाहेब एवढा मोठा वाडा? “
“वाडाही कोसळत होता मागून, तो विकला, आता त्या ठिकाणी मॉल उभा राहिलाय, कालाय तस्मै नमः”
“हो दादासाहेब, मी पाहून आलो.“
” तू इंदूरला गेला होतास? “
” हो तर, तुमच्या शोधात होतो मी, दोन वर्षांपूर्वी खूप वर्षांनी भारतात आलो, पहिल्यांदा इंदूरला गेलो तर वाड्याच्या ठिकाणी मॉल उभा,, शेवटी तुमचा पत्ता शोधत शोधत या ठिकाणी आलो.”
” मग पत्ता मिळाला कसा?”
” इच्छा असली तर मार्ग सापडतो दादासाहेब, मी इंदोरहून बाहेर पडलो तेव्हा तुम्ही कोणत्यातरी बँकेत नोकरीला लागला होतात, हे माहीत होतं, मात्र कुठली बँक हे माहीत नव्हतं, मग मी भारतातील प्रमुख बँकांच्या ऑफिसमध्ये पत्र लिहून तुमचा पत्ता विचारला, पण तुमचा सध्याचा पत्ता कोणाला माहित नव्हता. इंदूर मध्ये चौकशी केली तेव्हा कोणी अचलपूर, नागपूर तर कोणी पंढरपूरचा पत्ता दिला, या प्रत्येक शहरात तुमचा पत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही, शेवटी मुंबईत जीपीओ मध्ये या नावाचे पत्र कोणत्या पत्त्यावर देता अशी चौकशी केली आणि हा सांताक्रूझ चा तुमचा पत्ता मिळाला.”
” धन्य आहे तुझ्यापुढे! एवढी आठवण ठेवून तू येथे पोहोचलास याचे मला कौतुक वाटते, तू भेटलास आणि दादासाहेब अशी हाक मारलीस, मी इंदूरला असल्यासारखे वाटले. रम्य आठवणी असतात रे त्या. आता मी मुंबईत एकटाच राहतो, बायको वसुधा चार वर्षांपूर्वी गेली, मुलगा सुनील जर्मनीत स्थायिक झालाय, तिथल्या मुलीशी लग्न करून तेथेच सेटल झालाय. इंदूरचा वाडा विकला मी कारण कर्ज फार झालं होतं. रावसाहेबांचा तोरा मिरवताना खर्च सुरूच होते. उत्पन्न नव्हते. आता परत इंदूरमध्ये जाऊन छोट्या घरात राहणे कमीपणाचे वाटते, नोकरीत शेवटचा स्टॉप मुंबई होता, सुनील चे शिक्षण पण होते, या दृष्टीने मुंबईत सेटल झालो, पण इंदूर ते इंदूर, तिथली मजा मुंबईत नाही, स्वच्छ शहर, खाण्यापिण्याची लय लूट, गाणे संगीत भरपूर. “अरे शामू पण तू मुंबईत राहतोस कुठे?” ” दादासाहेब, आता यापुढे मी मुंबईतच राहणार आहे. त्याविषयी सर्व सांगतो नंतर, पण दादासाहेब, आज मात्र मी या घरी रहाणार आहे.” ” अरे रहा ना, मी पण इथे एकटाच,आहे. बोलायलाही कोणी नाही. सुनील चा रोज रात्री नऊ वाजता फोन येतो, त्याची मुलगी आहे पाच वर्षाची ती पण बोलते., कधी कधी सून बोलते, बरं दुपारची आमटी भाजी आहे, दही आहे, भात लावतो थोडा.”
” मी लावतो दादासाहेब, तुम्ही बसा. मला फक्त तांदळाचा डबा दाखवा.”
” अरे मी करतो भात मला रोजची सवय आहे. “
” नाही दादासाहेब, मी असताना तुम्हाला कसलेही काम करू देणार नाही, तुम्ही बसा. “
विजयरावांनी शामला तांदळाचा डबा दाखवला. त्यातून तोडे तांदूळ घेऊन शामने गॅसवर भात लावला. फ्रिज उघडून दही बाहेर काढलं, फ्रिज मधून दोन अंडी बाहेर काढून त्याचे हाफ आमलेट तयार केले. छोट्या पातेल्यात सकाळची आमटी भाजी झाकून ठेवली होती. ती गॅसवर गरम केली. भांड्याच्या स्टॅन्ड वरून ताटे, वाट्या, ग्लासेस बाहेर काढले, आणि दोन ताटे तयार केली. त्यातील एक टेबलावर ठेवले. शेजारी पाणी ठेवले आणि म्हणाला, “दादासाहेब बसा.” विजयराव टेबलावर जेवायला बसले, त्यांनी पाहिलं दुसरे ताट घेऊन श्याम खाली फरशीवर बसला होता.
” अरे शाम वर बस जेवायला.’
“नाही दादासाहेब, तुम्ही जेवत असताना याआधी मी कधी तुमच्या सोबत बसलो नाही आणि यापुढे बसणार नाही. “
“अरे शाम, ते दिवस गेले, मागचे विसरायचे आता. “
” नाही विसरणार दादासाहेब, एका खेड्यातल्या अनाथ मुलाला तुमच्या घरात आश्रय मिळाला, “पाणक्या ” होतो मी. तुमच्या घरात आडावरून पाणी भरत होतो, रोज प्रत्येकाच्या खोलीत पाण्याचा तांब्या नेऊन ठेवत होतो, तुम्ही कॉलेजमधून किंवा खेळून आलात की मला हाक मारत होतात, मी तुम्हाला पाण्याचा तांब्या आणून देत असे, जेवणाची वेळ झाली की तुमचे ताट तुमच्या खोलीत आणून देत असे, मग तुमच्या खोलीत माझी जेवणाची ताटली घेऊन येत असे आणि खाली बसून जेवत असे.”
” होय पण या त्या वेळच्या गोष्टी होत्या, त्यावेळी आम्ही इंदूरच्या संस्थानिकांचे रावसाहेब होतो, सध्याची माझी ओळख म्हणजे एका बँकेतून रिटायर झालेला माणूस “. ” असू दे, पण तुम्ही इंदूरच्या रावसाहेबांच्या पोटी जन्म घेतला हे विसरू नका, माझ्यासारख्या कित्येक आश्रीतांना तिथे अन्न वस्त्र निवारा मिळाला होता. “
क्रमश: भाग १
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈