श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ पाणक्या… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

( मागील भागात आपण पहिले- ” होय पण या त्या वेळच्या गोष्टी होत्या, त्यावेळी आम्ही इंदूरच्या संस्थानिकांचे रावसाहेब होतो, सध्याची माझी ओळख म्हणजे एका बँकेतून रिटायर झालेला माणूस “.  ” असू दे, पण तुम्ही इंदूरच्या रावसाहेबांच्या पोटी जन्म घेतला हे विसरू नका, माझ्यासारख्या कित्येक आश्रीतांना तिथे अन्न वस्त्र निवारा मिळाला होता. ” आता इथून पुढे )

जेवता जेवता विजयरावांचे आणि श्यामचे बोलणे सुरू होते, इंदूरच्या आठवणी काढल्या जात होत्या, मातोश्रींची  ( विजयरावांच्या आईची ) आठवण निघाली. विजयरावांचे जेवण संपले, तसे ते नेहमीप्रमाणे आपले ताट घेऊन धुवायला घेऊन जात होते एवढ्यात श्याम उठला आणि त्याने त्यांचे ताट आपल्याकडे घेतले.            ” दादासाहेब मी येथे असताना तुमची ताट भांडी तुम्ही धुवायची नाही.’ शेवटी हा काही ऐकायचा नाही म्हणून विजयराव गप्प बसले. श्यामने झटपट भांडी धुतली. ओटा आवरला आणि तो विजय रावांबरोबर हॉलमध्ये गप्पा मारायला आला.

” हं, आता सांग, तू होतास कुठे इतकी वर्ष? “

“सांगतो दादासाहेब, ” श्यामच्या डोळ्यासमोर सर्व बालपण सरकू लागलं, ” दादासाहेब इंदूर जवळच्या एका खेड्यातला एक गरीब मुलगा, घरची अत्यंत गरिबी, वडील देवीच्या साथीत गेले, तुमचे मुनीमजी गावात खंड वसुलीसाठी येत, माझी आई त्यांना हात जोडून म्हणाली, ” माझ्या मुलाला कुठेतरी अन्नाला लावा, नाही तर इथे भूक भूक करत मरेल तो “, दिवाणजी मला घेऊन आले  आणि तुमच्या वाड्यावर ठेवले, तुमच्या वाड्यावर मी पाणी भरायचो, तुमच्या मातोश्रींनी मला कधी उपाशी ठेवलं नाही, घरात जे शिजायचं तेच माझ्या ताटलीत असायचं, एकदा एक प्रसंग घडला कदाचित तो तुमच्या लक्षात नसेल, पण माझं आयुष्य बदलणारा ठरला. तुम्ही कॉलेजात गेलात की मी तुमची पुस्तकं वह्या उघडायचो आणि वाचायचा प्रयत्न करायचो. एकदा तुम्ही अचानक घरात आलात, तर माझ्या मांडीवर पुस्तक उघडलेलं होतं आणि मी वाचायचा प्रयत्न करत होतो, तुम्ही ते पाहिलंत आणि मला विचारलंत, ” श्याम पुस्तक वाचावीशी वाटतात तुला?,  शाळेत जाशील का? जाणार असशील तर मी व्यवस्था करतो. ” मी ‘हो’ म्हंटल, मग तुम्ही मुनीमजींना सांगून माझं नाव शेजारच्या शाळेत घातलेत आणि मी आनंदाने शाळेत जायला लागलो, शाळेत पालकाचे नाव  लिहायची वेळ आली, तेव्हा दादासाहेब तुम्ही तुमचं नाव दिलत, केवढे उपकार तुमचे या अनाथ मुलावर.”

” त्यात विशेष काही नाही श्याम, गोरगरिबांना शिक्षण द्यायचं हे आमच्या संस्थानिकांचं ब्रीद होतं, आम्ही ते पाळत होतो इतकंच ‘                             ” दादासाहेब एकदा शाळेत पालकांचा मेळावा होता, प्रत्येकाने आपल्या पालकांना शाळेत आणायचं होतं, मी हे तुम्हाला सांगितलं, त्या दिवशी तुम्ही तुमच्या कॉलेजात न जाता माझ्या शाळेत माझे पालक म्हणून आलात. “

” अजून हे सर्व तुझ्या लक्षात आहे श्याम “.

” सर्व गोष्टी माझ्या लक्षात आहे दादासाहेब, मी दरवर्षी पहिलाक नंबर मिळवत शाळेत शिकत होतो. तुम्ही त्यानंतर पुढील शिक्षणासाठी नागपूरला गेला होतात. मी दहावीत बोर्डात आलो. स्कॉलरशिप मिळाली आणि पुढील शिक्षणासाठी रायपूरला गेलो, त्याच वेळी माझी आई निधन पावल्याची बातमी आली, मी तिचे शेवटचे दर्शन घेतले आणि रायपूरला गेलो, त्यावेळेपासून तुमचा इंदूरचा वाडा सुटला, बारावीनंतर स्कॉलरशिप घेत लखनऊला गेलो. लखनऊला  “सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन लाँग्वेज ‘ मधून फ्रेंच आणि जर्मन भाषेमध्ये मास्टर्स केले. तेथे पुन्हा स्कॉलरशिप घेऊन फ्रान्समध्ये फ्रेंच तत्वन्यान मध्ये पीएच.डी। केले, आणि मग केंब्रिज विद्यापीठात फ्रेंच तत्वज्ञान शिकवायला लागलो. श्याम बोलत होता आणि विजयराव आ वासून ऐकत होते. खडतर परिस्थितीत श्यामने घेतलेले शिक्षण ऐकून त्यांना त्याचं खूप कौतुक वाटलं, त्याचबरोबर आपला जन्म श्रीमंत घराण्यात होऊन सुद्धा आपण बँकेत नोकरी करण्याएवढीच प्रगती केली याचं त्यांना वैषम्य वाटले.

” श्याम कौतुक वाटतं तुझं, आमच्या वाड्यात पाणी भरणारा मुलगा केंब्रिज विद्यापीठात प्रोफेसर झाला, तुझं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत, मग सध्या तू कुठे असतोस? “

” दादासाहेब, आपलं मुंबई विद्यापीठ फ्रेंच तत्त्वज्ञान विभाग सुरू करत आहे, याकरता मला इथे बोलावून घेतले आहे, पण या आधीची गेली दोन वर्षे  मी दिल्ली विद्यापीठात  फ्रेंच तत्त्वज्ञानाचा विभाग प्रमुख म्हणून काम करत आहे. पण पुढील दोन महिन्यानंतर  मी मुंबई विद्यापीठाचा फ्रेंच तत्त्वज्ञानाचा विभाग प्रमुख म्हणून जॉईन होईल.”

” बापरे शाम तेवढा मोठा माणूस तू, आणि माझ्या घरची भांडी घासलीस आज!”   “मी मोठा जगासाठी असेन कदाचित, पण इंदूरच्या दातेंसाठी नाही “

” मग शाम, तुझं लग्न, बायको…..”

“दादासाहेब माझी बायको इंदोरचीच आहे, ती पण तुमच्या कुटुंबाला ओळखते, साधना तिचं नाव, माझ्यासारखी ती पण लखनऊला जर्मन भाषा शिकण्यासाठी होती.      “मग ती पण केब्रिज ला जर्मन भाषा शिकविण्यासाठी आली. आम्ही त्या काळात लग्न केलं. आम्हाला एक मुलगी आहे, “मिहिरा ” तिचं नाव. मिहिरा दिल्लीत दहावी शिकते, माझी पत्नी साधना सध्या दिल्ली विद्यापीठात जर्मन भाषा शिकवते, पण आता ती माझ्याबरोबर मुंबई विद्यापीठात येईल. “

एवढ्यात विजयरावांना जर्मनीहून त्यांच्या मुलाचा सुनीलचा फोन आला. बोलण्यासाठी श्याम हा विषय होता. त्याच्याविषयी किती बोलू नि किती नको असं विजयरावांना झालं, मग शाम सुनिलशी बोलला, सुनिलच्या बायकोबरोबर जर्मनमध्ये बोलला. ती दोघेही श्यामशी बोलून फारच प्रभावीत झाली.

रात्री 10 ही विजयरावांची झोपायची वेळ. श्याम म्हणाला  ” दादासाहेब तुम्ही बेडरूम मध्ये झोपा, मला चटई आणि चादर द्या मी हॉलमध्ये झोपतो, विजयराव त्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या आधीच शाम बेडरूम मध्ये गेला आणि त्यांच्या बेडवर त्यांची गादी चादर व्यवस्थित करून दिली. बेड खाली असलेली चटई आणि चादर घेऊन तो हॉलमध्ये आला, विजयराव त्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तो काही ऐकणार नाही हे माहीत असल्याने ते गप्प राहिले.

रोज सकाळी सहा वाजता विजयरावांना जाग यायची। आज पण त्यांना जाग आली तेव्हा किचन मधून आवाज ऐकू येत होता. बायको वसुधा गेल्यानंतर ते रोज स्वतःचा चहा स्वतः बनवत असत, मग आज कोण आलं? असा प्रश्न त्यांच्या मनात आला. एवढ्यात काल रात्री श्याम आलेला आहे आणि तो हॉलमध्ये झोपलेला आहे हे त्यांच्या लक्षात आलं.

क्रमश: भाग २ 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments