श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ प्रेमानं मन जिंकावं… भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
रात्रीचे दहा वाजत आले होते. कमलताईंची ही रोजची झोपायची वेळ. मिताहार, नियमित झोप, सकाळचं फिरणं, योगा आणि वाचन. अगदी कशी आखीव रेखीव दैनंदिनी, त्यात फरक नाही. त्यांनी वयाची पंच्याहत्तरी केव्हाच ओलांडली आहे तरी त्या अजूनही दैनंदिन जीवनात कमालीच्या सक्रिय आहेत.
येत्या वीस ऑक्टोबरला ‘राणीज किचन’ला पंचवीस पूर्ण होत आहेत, त्यामुळे आज त्यांची झोप काहीशी चाळवलेली होती. त्यांच्या डोळ्यांसमोर गतस्मृतींनी एकच गर्दी केली होती.
कारेकरांच्या कुटुंबात सामील होऊन त्यांना साठेक वर्ष होत आली असावीत. लग्न झालं त्यावेळी कमल मॅट्रिक परीक्षा पास झालेली अठरा वर्षाची कन्या होती. सासरे बाळकृष्णपंत कारेकर, हिंदीचे प्राध्यापक आणि नावाजलेले साहित्यिक होते. त्यांचे पती नरहरपंत ह्यांचे इंग्रजी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. पदव्युत्तर शिक्षण सुरू असतानाच नरहरपंत एका शाळेत शिक्षकही होते.
दरम्यान पहिलं अपत्य सुधीर आणि त्यानंतर कन्या मेधाचा जन्म झाला. नरहरी एमएची परीक्षा पास होऊन शहरातल्या एका नामांकित महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. त्यानंतर ते सुटाबुटातले साहेब झाले. त्यांचं व्यक्तिमत्वच पार बदलून गेले. नरहरींना मॅट्रिक पास कमल खटकायला लागली. कमलनं पुढं शिकावं म्हणून त्यांनी रेटा लावला.
कमलला पुढं शिकायची इच्छा नव्हती. सुनेची ही घालमेल सासऱ्यांच्या नजरेतून सुटली नाही.
एके दिवशी त्यांनी नरहरीला सुनावलं, ‘नरहरपंत, मला मान्य आहे की तुम्ही उच्चविद्याविभूषित झाला आहात. प्रतिष्ठित लोकांत तुमची उठबस असते. मॅट्रिक पास झालेली कमल तुम्हाला खटकत असावी. ती सामान्य गृहिणी असेल हे कबूल. परंतु ती एक आज्ञाधारक पत्नी, प्रेमळ आई आणि उत्तम सुगरण आहे. सगळ्यांची पोटं सांभाळताना, ती मोठ्यांची मनंही सांभाळते. ते सगळं सोडून तिनं फक्त तिच्या महत्वाकांक्षेकडे भर दिला तर तुम्हाला चालेल का, हे आधी ठरवा. तुमचं तिच्यावर प्रेम असेल तर तिला स्वेच्छेने आणि तिच्या सवडीने विकसित होऊ द्या. तुमच्या इच्छेखातर जबरदस्तीने तिच्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करू नका.
तिनं मनात आणलं तर ती कुठलंही कार्यक्षेत्र गृहक्षेत्राइतकंच उत्तमरीत्या सांभाळू शकेल, हे मी खात्रीने सांगतो. समोरच्यांची मनं प्रेमानेच जिंकावी लागतात, त्यांचा दु:स्वास करून नव्हे. कमल जशी आहे तशी स्वीकारण्यातच तुमचं सुख दडलेलं आहे. तिला सुखी ठेवा आणि तुम्हीही सुखी व्हा.’
त्यानंतर नरहरीपंतांनी कमलवर कसल्याही बाबतीत सक्ती केली नाही. कमलमध्ये मात्र आमूलाग्र बदल घडत गेला.
नरहरपंत त्यांच्या रात्रीच्या वाचनासाठी महाविद्यालयाच्या लायब्ररीतून इंग्रजी कादंबऱ्या आणायचे. एकदा सहज म्हणून कमलनं पर्ल बकचं ‘द गुड अर्थ’ पुस्तक चाळलं. त्या कादंबरीनं तिच्या मनाचा ठावच घेतला. त्यानंतर अनेक ग्रंथ ती धडाधड वाचत गेली.
एकदा कमलला लिओ टॉलस्टायची ‘ॲना करेनिना’ कादंबरी वाचताना नरहरीपंतांनी पाहिलं आणि ते इतके आनंदून गेले की तिचे हात हातात घेऊन त्यांनी तिला गर्र्कन फिरवली. त्यानंतर त्या उभयतांत पुस्तकांवरच्या चर्चा झडत गेल्या. नरहरपंत पुन्हा एकदा कमलच्या प्रेमात पडले.
चिरंजीव सुधीर आणि कन्या मेधा ह्यांची अभ्यासात उत्तम प्रगती सुरू होती. कारेकर कुटुंबियांच्या मस्तकांवर साक्षात सरस्वतीचा वरदहस्त असावा. सायन्स विभागात सुवर्णपदक मिळवत द्विपदवीधर झालेल्या सुधीरला खूप ठिकाणाहून बोलावणी आली. परंतु त्याने स्वतंत्र क्लासेस सुरू करणेच पसंत केले. आपल्या ज्ञानाचा उपयोग एकाच महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना न होता शहरातल्या सगळ्याच गरजू विद्यार्थ्यांना व्हावा हा एकमेव शुद्ध हेतू त्यामागे होता. पैसा कमवणे नाही. लवकरच कन्या मेधाचे लग्न झाले आणि त्यानंतर ती विदेशात स्थायिक झाली.
कोणतं निमित्त होतं, ते आठवत नाही. परंतु एके दिवशी नरहरीपंतांनी त्यांच्या महाविद्यालयातील मोजक्या प्राध्यापक मंडळींना आणि प्राचार्यांना घरी जेवायला बोलावले होते. सगळ्यांनी स्वयंपाकाचं मनापासून कौतुक केले.
पुढच्याच आठवड्यात प्राचार्यांच्या घरी कुठला तरी कार्यक्रम होता आणि त्यांना आदल्या आठवड्यात आस्वाद घेतलेल्या भोजनाचाच मेनू हवा होता. त्यांनी कमलताईंना गळ घातली. त्यांचा आग्रह मोडवला नाही. कमलताईंनी ते आव्हान स्वीकारलं आणि त्यांनी पंचवीस लोकांचं जेवण पहिल्यांदा पुरवलं. ती कमलताईंची पहिली कमाई होती. आणि अगदी अनपेक्षितपणे ‘राणीज किचन’ची मुहुर्तमेढ रोवली गेली. तारीख होती वीस ऑक्टोबर!
मग हळूहळू विविध कार्यक्रमाच्या ऑर्डरी येत राहिल्या. दुपारी ऑफिसात डबे पुरवायचं काम आलं. नरहरीपंतानी बंगल्याच्या मागच्याच बाजूला असलेल्या हॉलमध्ये अद्ययावत अशा किचनची व्यवस्था करून दिली. व्यवसायात नरहरीपंतांची साथ-सोबत होती. सगळंच कसं आलबेल चाललं होतं. कमलताईंचा संसारगाडा सुरळितपणे सुरू होता.
अचानक एके दिवशी देवाजींनी नरहरीपंतांच्यासाठी खास पालखी पाठवली. कसलं दुखणं नाही, खुपणं नाही. नरहरपंत अचानक देवाघरी गेले. प्रिय पतीला, जिवलग मित्राला भगवंतानंच नेलं तर कमलताईंनी तक्रार तरी कुणाकडे करायची?
‘राणीज किचन’मुळे आयुष्याचं रहाटगाडगं चालू राहिलं. बघता बघता नरहरीपंतांना जाऊन पाच वर्ष झाली आणि पुढच्या आठवड्यात ‘राणीज किचन’ला पंचवीस वर्षे होतील. असा विचार करता करता निद्रादेवीनं कमलताईंच्या डोळ्यांवर अलगद शाल पांघरली.
दुसऱ्या दिवशी सकाळी कमलताई ब्रेकफास्ट घेत होत्या. तेवढ्यात सुधीरनं त्यांच्या हातात एक पाकिट देत सांगितलं, “आई, ह्या रविवारी संध्याकाळी पन्नास लोकांच्यासाठी ऑर्डर आहे. ते पाच हजार रूपये ॲडव्हान्स देऊन गेले. उरलेले पैसे ते त्या दिवशी संध्याकाळी देतो म्हणाले. फूड डिलिव्हरी ते स्वत: घेऊन जाणार आहेत.”
कमलताईंनी कॅलेंडरकडे पाहिलं. कपाळावर बारीकशा आठ्या उमटवत त्या म्हणाल्या, “सुधीर बाळा, ऑर्डर घ्यायच्या आधी मला विचारायला हवं होतंस किंवा राणीला विचारायला हवं होतंस. बरं असू दे. आज तू पहिल्यांदाच ऑर्डर घेतलीस. ह्यापुढे कस्टमरला माझ्याकडे किंवा राणीकडे पाठवत जा.”
‘होय आई’ म्हणून सुधीर तिथून सटकले.
काही तरी आठवल्यासारखं करून कमलताईंनी सुनेला आवाज दिला, “अगं ए राणी, तुझ्या त्या बॉबकटवाल्या, बिन-टिकलीच्या सुनेचा फोन आला होता का ग? ती येणार आहे का इतक्यात?”
सुहासिनी स्वयंपाकघरातून बाहेर येत म्हणाल्या, “होय सासूबाई. काल रात्री तिचा फोन आला होता. तिनं तुम्हाला नमस्कार सांगितलाय. तुमचं काही काम होतं का तिच्याकडे? तिला फोन करायला सांगू का तुम्हाला?.”
कमलताई फाडकन् म्हणाल्या, “ती तुझी सून आहे. माझं काय काम असणार आहे त्या बिन-टिकलीकडं? म्हणे फोन करायला सांगू का !”
खरं तर, सुहासिनीनं पहिल्यांदा रश्मीचा बॉबकटवाला फोटो कमलताईंना दाखवला होता तेव्हाच त्यांनी नाक मुरडलं होतं. रश्मीला पाहायला जातानादेखील यायला त्यांनी साफ नकार दिला होता. ‘मी माझी सून लाखात एक आणलीय. बघू तू कशी निवडतेस तुझी सून. मी नाही येणार जा.’ असं म्हणून त्या फुरंगटून बसल्या होत्या.
हसतमुख, उच्चशिक्षित एमबीए केलेली, संस्कारी कुटुंबातल्या चुणचुणीत रश्मीला प्रत्यक्ष पाहिल्यावर, तिच्याशी संवाद साधल्यावर सुहासिनीच तिच्या प्रेमात पडल्या होत्या. सगळ्यांनाच रश्मी खूप आवडली. मुलगी आपल्या नातवालाच पसंत आहे म्हटल्यावर कमलताई काही बोलल्या नाहीत. रोहन आणि रश्मीचं लग्न थाटामाटात पार पडलं.
– क्रमशः भाग पहिला
© श्री व्यंकटेश देवनपल्ली
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈