श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ म्हाई… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

शांती भाजीवाली डोक्यावर भाजीची टोपली घेऊन आळीत घरोघरी फिरत होती. दिपूच्या आईचं घर येताच तिने टोपली जमिनीवर ठेवली आणि मोठ्याने हाळी दिली ” ओ दिपूच्या आई, भाजी घेणार काय?’

तिची हाळी ऐकून दिपूची आई पदराला हात पुसत बाहेर आली.

” घेणार का भाजी, कांदापात हाय, माठ हाय, मुळा हाय, कोबी हाय. ”

शांतीला पाहतात दिपूच्या आईला आनंद झाला. तशी दोन दिवसाआड येणारी शांती ही त्यांची मैत्रीणच. दोघी एकमेकांसमोर आपलं मन मोकळ्या करायच्या.

” होतीस कुठे इतकं दिवस? लय दिसानं आलीस?’

” ताप येत होता दादल्याला, त्याला डागदर कडे नेत व्हते ‘.

‘आता बर हाय का?’

” व्हय, घेणार का भाजी?’

” लाल माठ दे दोन जुड्या, “.

शांतीने माठाच्या दोन जुड्या दिपूच्या आईच्या हातात दिल्या.

” दिपूच्या आई, म्हाई येणार की आता लवकरच ‘. “म्हाई ‘ म्हटल्याबरोबर दिपूच्या आईचा चेहरा चिंताग्रस्त झाला.

“काय झालं, गप का रवला? शांतीने विचारले.

” काय सांगावं शांते, घरवाल्यांची नोकरी राहिली नाही, पैसे मिळाले होते फंडाचे ते त्या संस्थेत ठेवले होते नव्हे ‘

“. कुठल्या?’

‘ ती…. ती बुडाली त्या संस्थेत की काय?

” होय बाई, ‘

” लई लोकांचे बुडाले बघा, मग मग आता म्हणणं काय त्यांचं?’

” पैसे मिळणार, बुडायचे नाहीत म्हणत्यात, पण आता”म्हाई ‘ यायची झाली आणि खिशात पैसे नाहीत अशी परिस्थिती. ’

” होय बाई, आणि दिपू अजून लहान हाय. ’

” हो बाई, खूप दिवसांनी झालाय ना तो. ‘

” पण तुम्ही देवीचे मानकरी, म्हणजे तुम्हास्नी  म्हाईचा लई खर्च असणार?’

” होय बाई, आम्ही मानकरी देवीचे, म्हाई आमच्याच घरी येणार, सोबत वीस पंचवीस देवीचे भक्त पण असतात, एवढ्या मंडळीचे जेवण व्हायला पाहिजे. पन्नास – साठ लोकांचे चहापाणी, देवींची पूजा, ओटी भरणे हायचं. ”

‘मग दिपूच्या बाबांनी काहीतरी व्यवस्था केलीच असेल?’

” ते काय करतात, साखर कारखान्यातून रिटायर झालेत, त्यात त्यांचा पगार तो कितीसा होता, पेन्शन वगैरे काही नाही, काय फंड मिळाला तो त्या संस्थेत घातला, चार वर्षात डबल होणार म्हणून सांगितलं, ठेवून दोन वर्षे झाली, सहा लाखाचे बारा लाख होणार म्हणून ठेवले, पण आता संस्था बुडाली म्हणे  “.

” अरे देवा, मग फुड काय व्हायचं ‘.

” बघूया ‘ असं म्हणून दिपूच्या आईने माठाच्या दोन जुड्या घरात नेल्या. शांतीला दहा रुपये दिले तशी शांती गेली.

दिपूच्या आईच्या लक्षात आलं, फेब्रुवारी महिना आला म्हणजे, या महिन्यात  “म्हाई ‘ येणार, त्यात आपण देवीचे मानकरी, उत्पन्न काही नसलं तरी खर्च थांबत नाहीत. तिने डबे उघडले. तांदुळाच्या डब्यातले तांदूळ तळाला टेकले होते. पिठाच्या डब्यात जेमतेम चार दिवसापूर्वी पीठ शिल्लक होते. तेल जवळ जवळ संपले होते. वाटाणे हरभरे शेंगदाणे सर्व संपत आले होते. अजून पंधरा दिवस आहेत  म्हाईला. अजून पंधरा दिवसाला खायला तर पाहिजे.

एका महिन्यापूर्वी तिच्या आईने धान्य पाठवलं होतं. जोंधळे, शेंगदाणे, तांदूळ गहू इत्यादी. आता परत तिच्याकडे कसे मागायचे? आता आईचे काही चालत नाही घरात. भावजई चा कारभार. आणि तेथे सुद्धा रयत फारसे देत नाहीत. आपला भाऊ तसा सतत आजारीच असतो. त्यांची परिस्थिती पण आता फारशी बरी नाही. त्यांच्याकडे परत मागायला नको. तिने नवऱ्याला हाक मारली “अहो, ऐकलंत का, घरातलं धान्य तसेच पीठ संपत आलंय. पाच-सहा दिवसा पुरते आहे. या महिन्यात”म्हाई ‘ येणार, तिच्या पालखीसोबत वीस-पंचवीस माणसे असतात. त्यांना दरवर्षी आपल्याला जेवण खाण करावं लागतं. आणि माणसांना चहा पाणी.

” मग मी तरी काय करू? सगळे पैसे त्या संस्थेच्या बोडक्यावर टाकलेत ना?      ” पण मी म्हणत होते, असल्या संस्थेमध्ये पैसे ठेवू नका, ते पैसे घेतात आणि मग  खाका वर करतात, ”

” बघू, आबा म्हणत होता, रिझर्व बँक काहीतरी करेल.

” त्या आबावर विश्वास ठेवून पैसे ठेवलेत ना, मग मग आबाला सांगा आमचे पैसे दे म्हणून ‘.

” आबा काय देतो, त्याचा पोरगा त्या संस्थेत मॅनेजर होता म्हणून तो सर्वांना तेथे पैसे ठेवायला सांगायचा, आता सर्वजण त्याला विचारतात, तेव्हा तो रिझर्व बँकेकडे बोट दाखवतो  “.

” म्हणजे पैसे मिळवले ह्या लबाडानी आणि पैसे कोण देणार म्हणे तर रिझर्व बँक. ते काही नाही, तुम्ही या पतसंस्थेच्या तालुक्याच्या ऑफिसात जाऊन खडसावून विचारा, म्हणावं आम्ही खावं काय? आमचे फंडाचे सर्व पैसे विश्वासाने तुमच्याकडे ठेवले, पैसे तुम्ही खाल्ले आणि ठेवीदारांच्या तोंडाला पाने पुसलात “.

” जातो मी उद्या’. ”

“जावाच आणि खडसावून विचारा, त्यांना सांगा पंधरा दिवसांनी आमच्याकडे  “म्हाई ‘ येणार आहे, आम्हाला मोठा खर्च आहे, तोपर्यंत आम्हाला काहीतरी पैसे द्या ‘. शेवटी मानकरी ना तुम्ही देवीचे, उत्पन्न काही नसले तरी मानकरी, जमीन सगळी  कुळांना गेली. पण मान फक्त तुम्हालाच. खर्च फक्त तुम्ही करायचे “.

दिपू च्या आईचा संताप संताप झाला. खरं तर ती आपल्या नवऱ्याला जास्त बोलायची नाही. कारण तिला माहीत होते आपला नवरा स्वभावाने गरीब आहे. त्यांचा जन्म झाला जमीनदाराच्या कुटुंबात पण चुलत भावांनी फसविले. घरातील दाग दागिने, सोने, रोख रक्कम घेऊन पळाले. मोठ्या शहरात जाऊन स्थायिक झाले. आता ढुंकूनही गावाकडे पाहत नाहीत. कुळांकडे असलेल्या जमिनी आपल्या नवऱ्याकडे आल्या. कुळ कायद्याने त्या जमिनी गेल्या. राहिले फक्त फुकटचे मोठेपण. हे जुने मातीचे पडणारे घर सोडून दुसरे काही नाही. आपल्या नवऱ्याचे शिक्षण फारसे झाले नाही. या जमीनदार कुटुंबाकडे पाहून आपल्या वडिलांनी आपल्याला या घरात दिले. त्यावेळी घर गजबजलेले होते. येणे जाणे होते. कुळाकडून वसुली करण्यासाठी घोडे ठेवले होते. स्त्रियांसाठी मेणे होते. सर्व गेले. राहिली फक्त भोके. उत्पन्न काही नाही.

नशीब त्यावेळी खासदार जयवंतराव नवीन साखर कारखाना काढत होते. आम्ही या गावचे मानकरी म्हणून देवीला नमस्कार करून सरळ ते आमच्या घरी आले. मी त्यांना आमची परिस्थिती सांगितली. आमच्याकडे उत्पन्नाचे काही साधन नाही हे त्यांना सांगितले. त्यांनी नवऱ्याला कारखान्यात नोकरी देण्याचा शब्द दिला. दोन वर्षांनी कारखाना उभा राहिला तेव्हा जयवंतरावांना मी परत भेटले. त्यांनी आपल्या नवऱ्याला नोकरीला ठेवले. पण शिक्षण जास्त नसल्याने उसाच्या वजन काट्यावर वजन नोंदवून ठेवण्याचे काम दिले. थोडाफार पगार घरात येऊ लागला आणि संसार टुकूटुकू का होईना चालू झाला.

बारा वर्षांपूर्वी दिपू चा जन्म झाला, दोनाची तीन माणसे झाली. पण दोन वर्षांपूर्वी आपला नवरा निवृत्त झाला आणि पगार थांबला. दिपू शाळेत. उत्पन्न काही नाही. फंडाची रक्कम आली ती गावातल्या आबांना कळली. त्यांच्या रोज सायंकाळी फेऱ्या वाढू लागल्या. चार वर्षात डबल पैसे होतील, तुझ्या दिपूच्या पुढच्या शिक्षणासाठी पैसे येतील अशी आश्वासने देऊ लागले. आम्हाला ते खरेच वाटले, त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आता हा पश्चाताप झाला. नवऱ्याने पतसंस्थेचे सर्टिफिकेट दाखवली तेव्हा आपण पण खुश झालो. आपले शिक्षण पर फारसे नाही. बाहेरच्या लबाड जगाची एवढी कल्पना नव्हती. पैसे डबल झाले म्हणजे दिपूला शिकवायचं, मग घर बांधायचं, मग दिपूला नोकरी मिळेल, मग दिपूचं लग्न….

पतसंस्था अडचणीत आल्याचे कळले, लोकांचे पैसे मिळत नाहीत याची कल्पना आली आणि पायाखालची वाळू सरकली. मग संस्थेत आपल्या नवऱ्याच्या रोज खेपा सुरू झाल्या. आपल्यासारखे शेकडो लोक रोज संस्थेत येत होते. मॅनेजरला भंडावून सोडत होते. मॅनेजर हाता पाया पडून पुढची आश्वासने देत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या एसटीने तालुक्याच्या गावी गेले. त्या संस्थेच्या मुख्य ऑफिसमध्ये जाऊन साहेबांना भेटले.

म्हाई – क्रमश: भाग १

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments