श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ म्हाई… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(मागील भागात आपण पहिले – आपल्यासारखे शेकडो लोक रोज संस्थेत येत होते. मॅनेजरला भंडावून सोडत होते. मॅनेजर हाता पाया पडून पुढची आश्वासने देत होता.दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या एसटीने तालुक्याच्या गावी गेले. त्या संस्थेच्या मुख्य ऑफिसमध्ये जाऊन साहेबांना भेटले. आता इथून पुढे)
” साहेब मी गरीब माणूस. कारखान्यातून मिळालेली सर्व फंडाची रक्कम तुमच्या संस्थेत ठेवली. आम्हाला पेन्शन वगैरे काही नाही. आमच्या पैशांचे काय? पंधरा दिवसांवर आमच्या गावातली “म्हाई ‘ आली. आम्ही देवीचे मानकरी. आम्हाला दरवर्षी मोठा खर्च असतो. तातडीने काहीतरी पैशाची व्यवस्था करा.
” अहो काका, इथे रोज शेकडो माणसे येऊन गर्दी करतात. सर्वांचेच पैसे अडकले. अडकले याचा अर्थ बुडाले असे नव्हे. पैसे मिळणार पण ते केव्हा ते मी सांगू शकत नाही. रिझर्व बँकेने तात्पुरते निर्बंध घातलेत. आपले चेअरमन जाऊन दिल्लीला अर्थमंत्र्यांना भेटलेत. सर्व व्यवस्थित होणार काळजी करू नका ‘.
” पण साहेब पंधरा दिवसावर आमची म्हाई आली. खर्चाला आमच्याकडे पैसे नाहीत ‘.
” हो का केव्हा आहे तुमची म्हाई?’
” या महिन्याच्या 22 तारखेला साहेब ‘. 22 तारखेला ठीक आहे, मी 22 तारीख ची तुमची व्यवस्था करतो. तुम्हाला 22 तारीख चा स्टेट बँकेचा चेक देतो. त्यादिवशी येऊन बँकेतून पैसे घेऊन जा ‘. साहेब यांनी 50 हजाराचा चेक लिहून दिला. खाली आपली जोरदार सही केली. दिपूचे बाबा खुश झाले. दुपारच्या एसटीने गावी आले. घरी आल्याबरोबर त्यांनी दिपूच्या आईला पन्नास हजाराचा चेक दाखवला. ती पण खुश झाली. आता निर्धास्तपणे 22 तारखेच्या म्हाईची तयारी सुरु केली.
गावात सगळीकडे लगबग सुरू होती. देवीच्या देवळात झाडलोट केली गेली. देवळाला नवीन रंग दिला. देवीची पालखी तसेच भांडीकुंडी सर्व काही झकपक झाले. गावातील प्रत्येक घराघरात म्हाईची तयारी सुरू झाली. घरांची साफसफाई झाडलोट सुरू होती.
दिपूच्या घरी दिपूच्या आईने घर वर पासून खालपर्यंत झाडलं. प्रत्येक भांड धुतलं. घरातली अंथरूण पांघरून पुन्हा टाकली. घराकडे येणाऱ्या पानंदी स्वच्छ केल्या. नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले लोक आपल्या गावात यायला लागले. वर्षभर बंद असलेली घर उघडून साफसूफ करायला लागले. गावाला जाग आली. अनेक चाकरमानी गावात दिसायला लागले.
दिपूचे बाबा परत परत तो 50000 चेक पाहत होते. त्या खालची ती झोकदार सही पाहत होते. 22 तारखेला सकाळी आठच्या गाडीने दिपूचे बाबा तालुक्याच्या गावी गेले. दिपूच्या घरची तशी सर्व तयारी झाली होती. फक्त घरात धान्य सामान आणि साखर वगैरे नव्हते. पैसे आले की ताबडतोब वासूच्या दुकानातून सर्व सामान आणण्याची तयारी दिपूच्या आईने केली. सामान घरात आले की ताबडतोब जेवण करायला सुरुवात करायची. दिपूच्या आईने दिपूला कागद पेन घेऊन लिहायला सांगितले. दिपूच्या आईने यादी करायला घेतली.
तांदूळ पाच किलो, गव्हाचे पीठ पाच किलो, साखर पाच किलो, वाटाणे दोन किलो, बटाटे दोन किलो, कांदे दोन किलो, गोडेतेल दोन लिटर, शेवया दोन पॅकेट, वेलची 100 ग्रॅम, गूळ दोन किलो.
दिपूच्या आईने दोन चुली तयार केल्या. चुली सारवून ठेवल्या. टिपूला मदतीला घेऊन परसातील लाकडे जमवून ठेवली. अगदी आगपेटी पण तयार ठेवली. आता पैसे आले की दुकानातून सामान आणायचे आणि रात्र 11 पर्यंत स्वयंपाक पुरा करायचा, एवढेच बाकी होते.
दिपूच्या आईने अंगण शेणाने सारवले. पानंदीपासून घरापर्यंत रांगोळी घातली. आता तिचे लक्ष येणाऱ्या एसटीवर होते. कधी एकदा पैसे हातात येतात आणि दुकानाचे मन आणतो असे तिला झाले होते.
त्यांच्या गावात एसटी नदीपलीकडे थांबत असे. टिपूच्या घरातून गाडी आल्याचा अंधुकसा आवाज येत असे. इतक्या वर्षाच्या सरावाने गाडी थांबल्याचा आणि वळण्याचा आवाज कळत असे.
दोन वाजायला आले आणि दिपूची आई आत बाहेर करू लागली. पण दुपारच्या गाडीने दिपूचे बाबा आले नाहीत. पण तिला निश्चित माहित होते चारच्या गाडीने ते येणारच. पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा तिच्या आत बाहेर सुरु झाल. साडेपाचच्या सुमारास गाडीचा आवाज आला तशी ती बाहेर येऊन उभी राहिली. लांबून तिला दिपूचे बाबा येताना दिसले. तसा तिला खूप आनंद झाला, तिने दिपूला हाक मारली ” दिपू ती सामानाची यादी आणि पिशव्या घेऊन ये बाहेर. बाबा आले, त्यांचे कडून तीन चार हजार घे आणि यादी घेऊन दुकानात जा. आणि सर्व सामान व्यवस्थित आण.’
” हो आई येतो, म्हणत दिपू यादी आणि पिशव्या घेऊन आला. तोपर्यंत दिपूचे बाबा घराजवळ पोहोचले होते. पण तिच्या लक्षात आले त्यांचा चेहरा पडलेला दिसत होता.
” मिळाले ना पैसे? दिपूच्या आईने विचारले. बाबा रडविले होत म्हणाले ” नाही, बँकेत त्यांच्या अकाउंट वर पैसेच नाही ‘.
” काय? दिपूची आई रडविली होत किंचाळली.
” सकाळपासून बँकेत होतो, स्टेट बँकेच्या अकाउंट वर त्यांच्या अकाउंटला फक्त 220 रुपये होते, म्हणून परत त्या संस्थेच्या ऑफिसमध्ये गेलो. तेव्हा तेथे मॅनेजर म्हणाले ” काळजी करू नका, आजच एक मोठा चेक पास होऊन गेला म्हणून पैसे कमी झाले. मी दोन वाजता पुन्हा पैसे भरतो. तुम्ही दोन नंतर तुमचा चेक पास करा. म्हणून न जेवता परत दोन पासून बँकेत उभा. अडीच वाजता चेक बँकेत दिला तर तो बँकेचा माणूस म्हणाला अहो या लोकांनी अनेकांना असे चेक दिलेत, सर्वांचे चेक परत गेलेत, यांच्या अकाउंटला काही रक्कम नाहीच आहे. त्यामुळे कुणाचे चेक पास झालेले नाहीत.’ मी परत या संस्थेच्या ऑफिसमध्ये गेलो तर ऑफिसला भले मोठे कुलूप. चार वाजेपर्यंत मी तेथे वाट पाहिली आणि शेवटी कंटाळून एसटी पकडली “.
दिपूच्या बाबांचे शब्द दिपूच्या आईच्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हते. तिच्या लक्षात आले आपल्या डोळ्यासमोर अंधार येतोय. आता आपण निश्चित खाली पडणार हे तिला कळत होते.पण तिच्या मनाने उसळी घेतली.” छे छे, मला खाली पडून चालणार नाही. आपला नवरा साधा आहे. तो हातपाय गळून बसेल. आपल्याला धडपड करायलाच हवी ‘. पटकन ती सावरली. खुर्चीला धरून उभी राहिली. आईला बरं वाटत नाही हे पाहून दिपू घरात धावला आणि पाणी घेऊन आला. त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास तिने तोंडाला लावला आणि घटाघटा पाणी प्यायली. दिपूचे बाबा डोकं धरून बसले. शेवटचा प्रयत्न म्हणून ती दिपूला म्हणाली ” दिपू ही यादी घे आणि वासूच्या दुकानात दे, म्हणावं आज म्हाई येणार आमच्याकडे,. एवढे द्या आणि पैसे लिहून ठेवा ‘.
म्हाई – क्रमश: भाग २
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈