डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

।। आंधळी माया ।। – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

अरुंधतीला पहिली मुलगी झाली आणि घरात आनंद पसरला.  दात्यांच्या घरात मुलगी अशी ही पहिलीच. मोठ्या थाटात तिचं बारसं केलं आणि नाव  ठेवलं सावनी!  अरुंधतीला बँकेत छान जॉब होता आणि अमितला,  तिच्या नवऱ्याला एका मल्टिनॅशनल कंपनीत खूपच छान पगाराची नोकरी होती. अशा सुखात भर पडली सावनीच्या बाळ पावलांनी.  दिवसामासानी सावनी वाढू लागली आणि तिच्या बाळलीलानी आजीआजोबा हरखून जाऊ लागले. अरुंधतीने आता एक चोवीस तासाची बाई घरी ठेवली आणि आजींचे,  तिचे काम हलके झाले. मीराबाई सगळं काम अगदी घरच्या सारखं करत आणि सावनीलाही खूप छान संभाळत. सावनी चार  वर्षांची झाली आणि अरुंधतीला मुलगा झाला. सगळं घर आनंदी झालं. सावनी शाळेत जायला लागली आणि  मग हा भाऊ आला घरी.  पहिले चार महिने कोडकौतुकात गेले आणि मग अरुंधतीच्या लक्षात आलं बाळ मान सावरत नाहीये पालथा पडत नाहीये. त्यांनी बाळाच्या डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी नीट तपासले आणि सांगितले, हा  स्लो लर्नर आहे. अगदी पूर्ण मतिमंद नाही पण गतिमंद होईल असं वाटतंय. बघूया तुम्ही लक्ष ठेवा आणि दरमहा  मला दाखवायला घेऊन येत जा. अमित आणि अरुंधतीवर हे ऐकून तर वज्राघात झाला.  सगळं सुरळीत चालू  असताना हे काय संकट आलं त्यांना समजेना. बरं, हे जन्माचेच होते आता. प्रयत्नाने काय होईल ते बघायचे. आठव्या महिन्यात आनंद मान धरायला लागला आणि हळूहळू पुढे सरकायला लागला. ब्रम्हानंद झाला अरुंधतीला. सगळे माईल स्टोन्स उशिरा उशिरा करत आनंद चार वर्षाचा झाला. सावनी शाळेत चमकतहोती. कधी शाळेत मिळालेले बक्षीस आईला दाखवायला आली की  आई म्हणायची,  सावनी,  कित्ती छान ग!शाब्बास!पण ते आनंदला नको दाखवू हं त्याला वाईट  वाटेल ना!’मग हिरमुसून सावनी आजी आजोबा आणि बाबांना तो कप ते मेडल दाखवायची. ते सगळे तिचं तोंडभरून कौतुक करायचे. बाबांची तर जास्तच लाडकी होती सावनी!होतीच ती गुणी मुलगी!  तिलाही आपल्या भावाचं प्रेम होतंच. पण आनंदला तेवढं कळायचं, ताईचे कौतुक जास्त होतं ती हुशार आहे . त्याला ते सहन व्हायचं नाहीआणि मग तो  आक्रमक हिंसक व्हायचा. एकदा त्याने सावनीची वही फाडून टाकली  हे बघितल्यावर अमितने दोन चांगल्या मुस्काडीत ठेवून दिल्यात्याच्या. हे बरं रे समजतं तुला?पुन्हा सांगतो अरुंधती,  ही याची लक्षणं बरी नाहीत. तू त्याला अशी पाठीशी घालत जाऊ नकोस.

तुला नवरा आहे एकसोन्यासारखी मुलगी आहे हे तू पार विसरली आहेस का?का मुद्दाम करतेस  ग तू हे?याचे परिणाम बरे होणारनाहीत. ‘ सगळं ऐकून घेऊन अरुंधती मख्खपणे तिथून निघून गेली.

एक दिवस घरी मुलं नसताना आजीआजोबा आणि अमित अरुंधतीशी बोलायला आले. ‘हे बघ अरुंधती, तू सावनीवर अतिशय अन्याय करते आहेस. आता मान्य करून टाक, आनंद नॉर्मल मुलगा नाहीये. नशिबाने तो गतिमंद आहे म्हणून पुण्यात त्या स्पेशल शाळेत तरी जाऊ शकतो. होईल तोही  ठीक ठीक,  शिकेलही अगदी कॉलेजमध्ये सुद्धा. पण म्हणून तू सावनीवर अतिशय अन्याय करते आहेस. सारखे काय तिला दडपतेस ग? सारखी म्हणतेस,  तुझी बक्षिसं दाखवू नको आनंदसमोर,  त्याला वाईट वाटेल. कधी तिला हौसेने  चांगले कपडे तरी  आणतेस का?का कधी तिच्या शाळेत जातेस पेरेन्ट्स मीटिंग ला?अभिमान वाटावा अशी मुलगी देवाने दिलीय तर नसलेले दुःख कुरवाळत बसू नकोस. झालाय मुलगा असा,  पण सारखं काय त्यालाच बसतेस गोंजारत?तिचंही कौतुक करत जा. ही काय पद्धत आहे ग तुझी?बंद कर असलं वागणं बघू!ते लेकरू एवढं यश मिळवूनही कोपऱ्यात रडत बसलेलं आम्ही बघितलं आहे. लहान आहे ग सावनी सुद्धा. म्हणत होती आजी,  मी आईला आवडत नाही का ग?मी पण आनंद सारखीच मंद झाले असते म्हणजे मग आवडले असते आईला!’पोटात तुटलं हे तिचं बोलणं ऐकून!तिची हुशारी हा तुझ्या दृष्टीनं गुन्हा आहे का ?मूर्खां सारखी वागू नकोस. तिलाही तुझी माया प्रेम मिळू दे. हक्क आहे तिचा तो!अशा वागण्याने तू ही मुलगीही गमावून बसशील बरं!’अमित आणि आजीआजोबा तळमळून म्हणाले. आजी तर रडायला लागल्या. ‘ असं नको करू अरुंधती. मान्य आहे आनंद दुबळा आहे त्याला तुझी जास्त गरज आहे पण  म्हणून सावनीही अजून लहानचआहे. तिलाही तुझी जास्त गरजआहे. विचारकर. ‘अरुंधतीचिडूनम्हणाली,  ,  ‘हो,  तुम्हाला तीच प्रिय असणार. माझा  आनंद कमी बुद्धीचा आहे म्हणून लाज वाटते तुम्हाला त्याची. पण मी करीन कष्टआणि उभा करीन त्याला आयुष्यात. सावनीला माझी गरज नाहीये. ‘हे ऐकून अमित आणि आजीआजोबा तिच्या समोरून निघूनच गेले. बोलण्यासारखे काहीच उरले नव्हते. अमित हताश झाला. बायको म्हणून तर कोणतेही सुख त्याला अरुंधतीकडून मिळत नव्हतेच आणि चोवीस तास आनंदला घेऊन बसलेली अरुंधती बघून तिडीक जायची त्याच्या डोक्यात!कुठे ट्रीपला जाणं नाही,  एवढी ऐपत असून परदेश प्रवास तर आनंद झाल्यापासून केलाच नव्हता त्यांनी!  या सगळ्यात सावनीचं बालपण होरपळून निघत होतं. आनंदला  स्पेशल स्कूल ला घातलं. त्याचा बुध्यांक कमी होता पण तो मतिमंद नव्हता. अरुंधतीने त्याला पेटीच्या क्लासला घातलं. त्यात त्याला चांगली होती गती. काहीही करायचं शिल्लक ठेवलं नाही अरुंधतीने! आनंद आठवीत गेला तेव्हा सावनी  बारावीला बोर्डात आली. अतिशय सुंदर मार्क्स मिळालेल्या सावनीला सगळी दार खुली होती प्रवेशासाठी!सावनीला आय आय टी ला ऍडमिशन मिळाली आणि सावनी पवईला निघून गेली. अमितचं आपल्या लाडक्या लेकीशी इतकं सुंदर नातं होतं की ती गेल्यावर त्याला अतिशय वाईट वाटलं. जायच्या आधी सावनी बाबांना म्हणाली बाबा,  तुम्ही आता फार एकटे पडाल हो. मला खूप काळजी वाटते तुमची!आजीआजोबा आता खूपम्हातारे झालेत,  त्यांनाही तुमची गरज आहे बाबा. आई तर कशातच नसते. सारखं आनंदच्या मागे लागून तो असा किती सुधारणार आहे बाबा? माझाही तो भाऊ आहेचकी!पण असल्या ओव्हरप्रोटेक्शन मुळे तो स्वार्थी आपमतलबी झालाय . हातपाय आपटून तो आईकडून हवं ते मिळवतोच! बाबा,  मला तुमचं फार वाईट वाटतं हो! मी इतकीही लहान नाही  हे समजायला, की कोणतेही संसारसुख तुम्हाला आनंद झाल्या पासून मिळालं नाही. बाबा, थोडे थांबा. मी कायम आहे तुमच्यासाठी!मी आय आय टी मधून डिग्री मिळवली की इथे रहाणार नाहीये. मी माझे  प्लॅन्स ठरवलेत. पण तुम्ही नीट राहा आणि आजी आजोबांची काळजी घ्या. घ्याल ना?’अमितच्या डोळ्यात पाणी आलं’. घेईन मी सावनी काळजी!अग, निदान आजीआजोबांसाठी तरी मला नीट उभं रहायला हवं. तुझी आई असून नसल्यासारखीच आहे घरात. कमाल वाटते मला, अशी आंधळी माया अरुंधतीने करावी?हजारवेळा मी  तिच्या आईवडिलांनीही,  ,  डॉक्टरांनी सांगून झालंय की एका ठराविक लेव्हल पुढे ही मुलं प्रगती करू शकत नाहीत. पण अरुंधतीला हे मान्य नाही. बघूया काय होतं ते!माझ्यानंतर कठीण आहे सगळं!’अमितला अश्रू आवरेनात!किती तरुण होता अमित!अजून पन्नाशीही उलटली  नाही तेवढ्यात हे वैराग्य आले नशिबाला!  आनंद गतिमंद आहे हे समजल्यापासून तर दोघांच्या बेडरुमही वेगळ्याच झाल्या होत्या. अरुंधतीच्या ध्यानधारणा, जपजाप्य यात अमित ला जागा नव्हती. आजीआजोबांचा जीव तुटे आपल्या या एकुलत्या एक मुलाला असे संन्याशासारखे जगताना बघून! सावनी अत्यंत उच्च श्रेणीत पास झाली आणि तिने जीआर ई दिली. सावनीला येल युनिव्हर्सिटीत अमेरिकेला ऍडमिशन मिळाली. अमितच्या आनंदाला सीमा उरल्या नाहीत!

सावनी म्हणाली बाबा,  जपून नीट रहा. आणखी थोडेच दिवस,  मग मी तुम्हाला माझ्याकडे घेऊन जाणार आहे!तेव्हा कोणताही विचार न करता या . माझं एम एस झालं की मग बघूया. ‘ अमित अगदी एकटा पडला सावनी गेल्यावर!इथे ती निदान महिन्यातून एकदा तरी यायची किंवा अमित जायचा तिलाभेटायला. पण आता सात समुद्रापार गेली सावनी!   दरम्यान अचानक आजोबा हार्ट अटॅक ने गेले. आजी खचून गेल्या पण समंजसपणे म्हणाल्या अरे, म्हातारी माणसं रेआम्ही!कोणीतरी आधी,  कोणी नंतर जायचंच अमित!नको एवढं वाईट वाटून घेऊ रे! मीही कधी जाईन सांगता येणारे का बाबा?’ आजोबा गेल्यानंतर  आजी आणखी आणखी निवृत्त होत गेल्या. दिवसदिवस त्यांचं अरुंधतीशी बोलणं होत नसे. आनंदला एका कारखान्यात नोकरी लावून दिली अरुंधतीने! तो कसातरी एसेसी झाला  आणि  अरुंधतीने लाख प्रयत्न करून त्याला ही नोकरी लावून दिली. सावनी एवढी बीटेक् झाली तरी ना कधी अरुंधतीने तिच्या हातावर पैसे ठेवले का कधी तिला ड्रेसचे कापड आणले!सावनीचे सगळे लाड आजीने पुरवले!किती attached होती सावनी आजीला!

–क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments