☆ जीवनरंग ☆ क्षणिक ☆ एका घटकेचा खेळ – भाग 3 ☆ श्री आनंदहरी ☆ 

खानावळीतून जेवून परतत असताना रस्त्यावरून चालता चालता त्याला त्याची – तिची पहिली भेट आठवली होती. ती त्याला भेटली होती ते प्रवासात.. तो चार दिवस रजा काढून गावी निघाला होता.. बस मध्ये ती नेमकी त्याच्या सीटवर होती.. पण तो अगदी खिडकीकडे सरकून खिडकीतून बाहेर पहात आपल्याच विचारात गुंग झाला होता. बाबांनी अचानक त्याला रजा काढून गावी यायला सांगितलं होतं. कारण सांगितलं नसलं तरी त्याला ते ठाऊक होतं. अलिकडे घरात त्याच्या लग्नाचाच विषय चालू होता.

बस कंडकटर ” तिकीट ss तिकीट ” करीत त्याच्या सीटजवळ आला आणि तो विचारातून भानावर येऊन तिकिटासाठी पैसे काढत असतानाच तिने पैसे देवून तिकीट मागितले. तिचे गाव ऐकून त्याला तसे काही आश्चर्य वाटण्याचे कारण नसूनही आश्चर्यच वाटलं.. तिचे उतरायचे ठिकाण त्याच्या गावाच्या जवळच दोन गावे पुढं होतं.. तिकीट घेऊन त्याने खिशात ठेवत असताना त्याने पुन्हा एकदा तिला पाहिलं.. तो पुन्हा खिडकीतून बाहेर पाहू लागला पण काहीही कारण नसताना मनात तिचा विचार आला. कोण असेल ? इकडे सहज आली असेल की नोकरी करत असेल की पाहुण्यांकडे आली असेल ?  त्याची नजर पुन्हा तिच्याकडे वळली..तेव्हा ती नेमकी त्याच्याकडेच पहात असल्यासारखं  त्याला वाटलं. आपल्याकडेच पहात आहे की खिडकीतून बाहेर पहात आहे हे काही त्याला ठरवता येईना.. पण ती छानच आहे कुणालाही आवडण्यासारखी हे मात्र त्याच्या मनाने तिला पाहता क्षणीच ठरवून टाकलं होतं.

थोड्या वेळातच त्यांच्यात औपचारिक बोलणंही झालं. ती ही गावी निघाली होती. त्याच्यासारखीच ती ही नोकरीच करत होती आणि ती आपल्यासारखीच ‘पाहण्याच्या’ कार्यक्रमासाठी निघाली आहे हे त्याला तिने न सांगताच उमगलं होतं.

स्टॉप आल्यावर तो खाली उतरला आणि तिचा निरोप घेऊन घरी आला होता. गावातले चार दिवस मजेत गेले होते. तो परतताना बसमध्ये चढताच त्याची नजर बसमध्ये फिरली. नेमकी ती त्याच गाडीत होती.. न ठरवूनही ठरवल्यासारखी. त्याला पाहून ती ओळखीचे हसली. तिच्या पलीकडच्या सीटवर जागा होती. तो तिथं जाऊन बसला होता आणि लवकरच तिच्या शेजारची जागा रिकामी होताच तिच्या सीटवरही. वेगवेगळ्या विषयावरच्या मनमोकळ्या गप्पात वेळ कसा गेला हे त्याला समजलेच नाही.

भेटी होत राहिल्या, गप्पा होत राहिल्या. तशी ती चांगलीच होती कुणालाही आवडण्यासारखी..  त्यालाही आवडली होती.. हे आवडणं दुरून डोंगर आवडण्यासारखंच असते हे त्याला ठाऊक नव्हतं. डोंगराचा खडतरपणा, खडकाळपणा हा दुरून कधीच जाणवत नाही.

त्याने फ्लॅट घेतला तेंव्हा कधी नव्हे ते आई -बाबा दोन दिवसासाठी आले होते.. ती ही आली होतीच. आईबाबांनाही ती आवडली होती. आपल्याच भागातली, खेड्यातली हा त्यांच्या दृष्टीने प्लस पॉईंट होता.

तो फ्लॅटवर परतला होता तरी त्याच्या मनातील आठवणींची दृष्यमालिका सुरूच होती.

लग्नानंतर काही काळातच त्याला जाणवले होते की तिची स्वप्ने वेगळी होती.. आवड वेगळी होती.. अपेक्षा वेगळ्या होत्या..अगदी दुसऱ्या टोकाच्या… त्या दोन टोकांवर पूल बांधणे केवळ अशक्य होते ही जाणीव त्यालाही झाली.. तिलाही झाली.. विसंवाद, विवाद आता नकोसे वाटू लागले होते… एके दिवशी ती म्हणाली,

“उद्या मी आईकडे जातेय.. पंधरावीस दिवसांनी परत येईन.. माझी बदली बेंगलोर ला होऊ शकते..मला तिकडे जायचंय…आल्यावर काही दिवसातच जाईन मी . ”

तो काहीच बोलला नव्हता.. बोलू शकला नव्हता.

 क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments